बाबासाहेबांची हुशारी आणि उज्ज्वल भविष्य ओळखणारे सयाजीराव गायकवाड हे युगद्रष्टे महाराजा – साहित्यिक श्री. बाबा भांड
जगातील 85 देश फिरल्यानंतर आणि दोनशेहून अधिक जागतिक वारसा स्थळे पाहिल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पाहिले आणि हे स्मारक त्या तोडीचे असल्याचे जाणवले असे अभिप्राय व्यक्त करीत महाराष्ट्र शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीचे सचिव तथा सुप्रसिध्द साहित्यिक श्री. बाबा भांड यांनी या स्मारकातून बाबासाहेबांच्या प्रेरक विचारांना दिलेले महत्व पाहता याठिकाणी वारंवार भेटी द्यायला आवडेल असे मत व्यक्त केले.
‘महाराजा सयाजीराव गायकवाड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर साहित्यिक, विचारवंत श्री. बाबा भांड यांचे महाराजा सयाजीरावांच्या जयंतीदिनाच्या निमित्ताने ‘विचारवेध’ या शृंखलेंतर्गत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात संपन्न झालेल्या या व्याख्यानामध्ये त्यांनी सयाजीरावांच्या महनीय कार्याचा आढावा घेत सयाजीराव आणि बाबासाहेब या दोन युगपुरूषांच्या परस्पर जिव्हाळ्याच्या आणि आदराच्या संबंधांविषयी विविध ऐतिहासिक दाखले देत प्रकाशझोत टाकला.
आठवीत असताना बाबासाहेबांचे चरित्र हाती आले आणि मी थरारून गेलो असे सांगताना श्री. बाबा भांड यांनी या दोन्ही युगपुरूषांच्या अनेक आठवणी संदर्भ वर्षासह सांगितल्या. बाबासाहेबांमधील हुशारी, उज्ज्वल भविष्य सयाजीरावांना आधीच ओळखले होते, त्यामुळे बाबासाहेबांच्या उच्चशिक्षणासाठी सयाजीरावांनी संस्थानाच्या शिष्यवृत्तीबाबतच्या नियम पालनाचे वरिष्ठ अधिका-यांचे अभिप्राय नस्तीवर असतानाही शिष्यवृत्ती मर्यादेचे नियम ओलांडून बाबासाहेबांना 4 वेळा शिष्यवृत्ती प्रदान केली. सयाजीरावांनी आपल्या हयातीत त्याकाळी 89 कोटी रक्कमेच्या शिष्यवृत्त्या प्रदान केल्या व अनेकांची भविष्ये घडविली असाही दाखला त्यांनी दिला.
शिक्षण हेच प्रगतीचे साधन आहे हे जाणणा-या सयाजीरावांनी सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. त्यातही मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. समाजसुधारणेची सुरूवात स्वत:पासूनच करायला हवी असे मानत अस्पृश्योध्दार कायद्यासह वाईट रूढी परंपरा बदलण्यास सुरूवात केली व त्यासोबतच समाजविकासाच्या अनेक बाबींना प्राधान्य दिले. त्यांच्याइतका द्रष्टा आणि काळाच्या पुढचा विचार करणारा पुरोगामी राजा अलौकिक आहे अशा शब्दात श्री. बाबा भांड यांनी महाराजा सयाजीरावांच्या कार्याची महती अनेक उदाहरणे देत सांगितली.
क्रांतीकारी चळवळीला अदृष्य रूपात गनिमी काव्याने मदत करण्यात सयाजीराव नेहमीच आघाडीवर राहिले. आपल्या देशाप्रती अत्यंत निष्ठा आणि अभिमान असणा-या या राजाने ब्रिटिश सत्तेविरूध्द कधी मान झुकवली नाही असे सांगताना नुकताच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असताना या पुरोगामी विचारांच्या राजाची व त्यांच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या कार्याची साधी आठवणही कुणी काढली नाही याची खंत श्री. बाबा भांड यांनी व्यक्त केली.
सयाजीरावांनी आपल्या संस्थानात केलेले कायदे हे युरोप, अमेरिकेपेक्षा पुढारलेले होते असे मत घटनाकार बाबासाहेबांनी व्यक्त केलेले असून त्यांना सयाजीरावांचे चरित्र लिहायचे होते व तसे त्यांनी 1951 मध्ये सयाजीरावांचा वारसा चालविणा-या नातवालाही पत्र लिहून कळविले होते अशी माहिती देत श्री. बाबा भांड यांनी तसे झाले असते तर सयाजीरावांच्या कार्याची ओळख सर्वदूर पसरली असती असे मत मांडले.
गोलमेज परिषदेतील बाबासाहेबांचे भाषण ऐकून अतिशय प्रभावित झालेल्या सयाजीरावांनी आपली शिष्यवृत्ती सार्थकी लागली असे कृतार्थ मत आपल्या पत्नीकडे व्यक्त केले होते व बाबासाहेबांसाठी एक पार्टी आयोजित केली होती. त्यावेळी बाबासाहेबांच्या सामाजिक कार्यासाठी 150 पौंड दिले होते अशीही आठवण त्यांनी सांगितली.
सयाजीरावांनी अनेकांना सढळ हस्ते मदत केली. त्यात 12 भारतरत्न आहेत. बाबासाहेबांनी 1936 साली लिहिलेल्या निबंधामध्ये सयाजीरावांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असल्याचा संदर्भ त्यांनी सांगितला. पहिल्या जागतिक धर्म परिषदेचे अध्यक्षस्थान स्वामी विवेकानंद यांनी भूषविले होते तर दुस-या धर्म परिषदेचे अध्यक्ष सयाजीराव होते हे फारसे सांगितले जात नाही याबदद्लही त्यांनी खंत व्यक्त केली. सयाजीरावांनी त्याकाळी 6000 ग्रंथ प्रकाशित केले हा प्रकाशन क्षेत्रातील जागतिक विक्रम असल्याचे सांगत त्याचीही दखल फारशी घेतली जात नाही याचा खेद त्यांनी व्यक्त केला.
आपल्या देशावर प्रचंड प्रेम आणि निष्ठा असणा-या या देशाभिमानी व सर्वधर्मसमभावी महाराजांनी युवक हे आपले भविष्य असल्याचे जाणत आपला देश प्रगती करण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे व कष्टाने काम केले पाहिजे, शेजा-याची आठवण ठेवली पाहिजे आणि देशाचे नाव खराब होईल असे काही करू नये या तीन गोष्टी करण्याची गरज सांगितली होती. याप्रमाणे आचरण करणे हीच सयाजीरावांना खरी श्रध्दांजली ठरेल असे मत श्री. बाबा भांड यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीने प्रकाशित केलेल्या सयाजीरावांच्या चरित्राचे 62 खंड स्मारकातील ग्रंथालयास प्रदान केले. उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार यांनी महानगरपालिकेच्या वतीने श्री.बाबा भांड यांचे स्वागत केले. जनसंपर्क अधिकारी श्री. महेंद्र कोंडे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, माजी महापौर श्री. सुधाकर सोनवणे, माजी शिक्षण मंडळ सदस्य श्री. अंकुश सोनावणे, कार्यकारी अभियंता श्री. प्रवीण गाडे, माजी उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार व श्रीम. संध्या अंबादे, समाजविकास अधिकारी श्री. सर्जेराव परांडे उपस्थित होते.
Published on : 12-03-2023 08:59:02,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update