जलजागृती सप्ताहानिमित्त नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे जलबचतीचे आवाहन
जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन यांचे निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत दि. 16 मार्च ते 22 मार्च 2023 या कालावधीत जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येत असून जलजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
या अनुषंगाने नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी समाजमाध्यमांवरून नागरिकांशी संवाद साधला असून नागरिकांना 22 मार्च रोजीच्या जागतिक जलदिनाच्या शुभेच्छा देत सध्याची जागतिक जलस्थिती व पर्यावरणस्थिती पाहता जलबचतीचे आवाहन केले आहे.
ग्लोबल वॉर्निंगमुळे एका बाजूला पावसाचे प्रमाण घटत असून दुस-या बाजूला तीव्र उष्णतेमुळे पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाण वाढते चाललेले दिसत असल्याचे नमूद करीत आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी आपल्याकडे उपलब्ध पाणीसाठ्याचा परिणामकारक व सयुक्तिक वापर करण्याची गरज विषद केली आहे.
पाण्याला जीवन म्हणतात, म्हणूनच आपण पाणी वाचवू शकलो तर जीवन वाचू शकेल हे लक्षात घेऊन प्रत्येकाने आपल्या परीने प्रयत्न करावेत असे आवाहन करीत आयुक्तांनी दैनंदिन जीवनात अनेक साध्या साध्या गोष्टींतून आपण जलबचत करू शकतो हे सांगितले आहे.
यामध्ये, घरच्या गाड्या धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये तसेच पाईप लावून गाड्या धुवू नयेत, दाढी करताना किंवा बाथरूममध्ये सतत नळ सुरू ठेवण्याची आपली सवय बदलावी आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, अनावश्यक पाणीसाठा करू नये व केल्यास पाणी शिळे होते हा गैरसमज मनातून काढून टाकून ते दुस-या दिवशी टाकून देऊ नये अशा दैनंदिन व्यवहारातील अनेक गोष्टींमध्ये पाण्याचा अकारण होणारा अपव्यय टाळावा असे आयुक्तांनी सूचित केले आहे.
मोरबे धरणामुळे नवी मुंबई शहर जलसमृध्द आहे. मात्र आसपासच्या इतर शहरांतील जलस्थितीचा गांभीर्याने विचार करून सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सर्वांनी कटिबध्द रहावे असे आवाहन आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
Published on : 21-03-2023 09:38:53,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update