*नवी मुंबईतील सुविधा कामांना आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्यामार्फत आढावा बैठकीव्दारे गती*
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध विभागांमध्ये बांधण्यात आलेल्या मार्केटच्या वास्तू वापरात आणण्याच्या दृष्टीने नियोजनबध्द कार्यवाही करावी व एप्रिल महिना अखेरपर्यंत सर्व मार्केट कार्यान्वित होतील याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी दिले.
नवी मुंबई महानगरपालिकेतील सर्व विभागांच्या साप्ताहिक आढावा बैठकीप्रसंगी आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी प्रत्येक विभागातील सुरु असलेल्या कामांचा तसेच नियोजित कामांचा सविस्तर आढावा घेतला आणि कामांची सद्यस्थिती जाणून घेत गतीमान कार्यवाहीचे निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे तसेच इतर विभागप्रमुख उपस्थित होते.
बेलापूर, नेरूळ, कोपरखैरणे, सानपाडा, ऐरोली विभागांमध्ये मार्केटची बांधकामे पूर्ण झाली असून त्यापैकी अनेक मार्केटच्या वास्तू अभियांत्रिकी विभागाकडून मालमत्ता विभागाकड़े हस्तांतरित करण्यात आलेल्या आहेत. या प्रत्येक वास्तूच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेत आयुक्तांनी ते मार्केट कार्यान्वित होण्याकरिता वास्तुनिहाय कार्यवाहीचे आदेश दिले. महानगरपालिकेच्या परवानाधारक विक्रेत्यांना प्राधान्याने संधी देऊन जागा वाटप करण्याचे निर्देशित करतानाच ज्या मार्केटच्या जागांमध्ये परवानाधारक फेरीवाले नाहीत त्याविषयीची कार्यवाही नियमानुसार संबंधीत विभाग कार्यालयामार्फत करून घेण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले.
वाशी येथील मंगल कार्यालय इमारत लवकरात लवकर नागरिकांच्या वापरात येण्याच्या दृष्टीने कार्यालयीन कार्यवाहीला गती देण्याचे सूचित करतानाच आयुक्तांनी रात्रनिवारा केंद्र वापरात येण्याच्या दृष्टीने निविदा प्रक्रिया तत्परतेने करण्याचे समाजविकास विभागाला सूचित केले.
शहरामध्ये ठिकठिकाणी सिडको, जिल्हाधिकारी तसेच विविध प्राधिकरणांचे मोकळे भूखंड असून त्यांच्याकडे संबंधीत प्राधिकरणांचे लक्ष नसल्यामुळे त्याठिकाणी कचरा टाकणे, डेब्रीज टाकणे असे प्रकार आढळून येतात. ही बाब शहर स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत घातक असून अशा भूखंडांची पाहणी विभाग कार्यालयांमार्फत करण्यात येऊन पुढील बैठकीत त्याचा तपशिलवार आढावा सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दोन्ही परिमंडळांना दिले.
सार्वजनिक मैदानात कार्यक्रम केल्यानंतर आयोजक संस्था तेथील स्वच्छतेकडे पुरेसे लक्ष देत नाही व मैदान कार्यक्रमासाठी भाड्याने घेण्याची अनामत रक्कम अल्प असल्याने ती जप्त झाली तरी चालेल असे गृहीत धरून मैदाने तशीच अस्वच्छ ठेवतात. यामुळे शहर स्वच्छतेला बाधा पोहचते या गोष्टीवर पुन्हा सविस्तर विचार विनिमय करण्यात आला व आयोजक संस्थेला स्वच्छतेचे महत्व कळावे आणि शहरातील स्वच्छता अबाधीत रहावी यादृष्टीने मैदान वापराच्या अनामत रक्कमेत वाढ करण्याबाबत प्रक्रिया सुरु करावी असे सूचित करण्यात आले.
अशाच प्रकारे महानगरपालिकेची मंगल कार्यालये, समाजमंदिरे विविध कार्यक्रमांसाठी भाड्याने घेतली जातात. तेथेही अनामत रक्कम अत्यल्प असल्याने कार्यक्रम झाल्यानंतर सभागृह स्वच्छ करून देण्याची आपली जबाबदारी टाळून आयोजक अस्वच्छ सभागृह ठेवून निघून जातात. त्याचप्रमाणे सभागृहातील विज वापराबाबतही निष्काळजीपणा दाखविला जातो. या सर्व बाबी लक्षात घेता वीज देयकासाठीची अनामत रक्कम व सभागृह वापराबाबतची अनामत रक्कम वेगवेगळ्या घ्याव्यात याविषयी देखील सविस्तर विचार विनिमय करण्यात आला.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात होर्डींग धोरणानुसार मोठे होर्डींग लावण्यात आलेले आहेत. त्यावर अनेक ठिकाणी एलईडी लावलेले आढळून येतात. त्या अनुषंगाने जाहिरात धोरण व कार्यप्रणाली पुन्हा एकदा तपासून घ्यावी असे निर्देश आयुक्तांनी परवाना विभागास दिले.
दिव्यांगांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे अर्थसंकल्पाच्या भाषणाच्या वेळी आयुक्तांनी जाहीर केले होते. त्याची कार्यपूर्तता करण्याच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यात कोपरखैरणे सेक्टर 8 येथील महिला सक्षमीकरण केंद्रांत काही प्रशिक्षण सत्रे दिव्यांगांकरिताही सुरु करण्याबाबत नियोजन करावे व त्या बाबतचा अहवाल पुढील बैठकीत सादर करावा असे आयुक्तांनी यावेळी निर्देश दिले.
माझी वसुंधऱा अभियान हा महानगरपालिकेच्या प्रतिष्ठेचा विषय असून अभियानाच्या पोर्टलमध्ये संबंधीत विभागांनी भरावयाची माहिती 2 दिवसात भरून घ्यावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
महिला शौचालयांमध्ये लावलेल्या सॅनिटरी पॅड्सच्या मशीन्स अनेक ठिकाणी कार्यान्वित नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याच्या अनुषंगाने सर्व विभाग कार्यालयांनी आपापल्या क्षेत्रातील महिला शौचालयांमध्ये लावलेल्या सॅनिटरी पॅड्स मशीन्सची सद्यस्थिती स्वच्छता निरीक्षकांमार्फत तपासून घ्यावी व त्याचा अहवाल सादर करावा असे निर्देशित करतानाच आयुक्तांनी त्या मशीन्स नियमित कार्यान्वित राहतील अशाप्रकारची कार्यप्रणाली आखण्याचे निर्देश दिले.
स्वच्छ सर्वेक्षण 2023 च्या अनुषंगाने ‘महिला आयकॉन्स लिडींग स्वच्छता (विन्स) पुरस्कार 2023 (Women Icons Leading Swachhata (WINS) Award- 2023)’ प्रदान करून महिलांच्या स्वच्छता कार्यातील योगदानाचा सन्मान करण्याचे केंद्र सरकारमार्फत सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने "स्वच्छोत्सव-2023" हा अभिनव उपक्रम जाहीर केला असून 5 एप्रिल पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा यादृष्टीने या पुरस्कार प्रणालीची जास्तीत जास्त प्रसिध्दी करावी असे आयुक्तांनी निर्देशित केले. त्याचप्रमाणे या अनुषंगाने घ्यावयाच्या स्वच्छता मशाल मार्चचेही भव्यतम नियोजन करावे असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
समाजविकास विभागामार्फत देण्यात येणा-या शिष्यवृत्ती प्रक्रियेतील अडचणी दूर करून लवकरात लवकर शिष्यवृत्तीची रक्कम बॅंक खात्यात जमा होण्याच्या दृष्टीने कार्यवाहीला गती देण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या.
विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत झालेल्या चर्चेच्या व दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने विहित वेळेत कार्यवाही करण्याची दक्षता संबंधितांनी घ्यावी असे स्पष्ट निर्देश आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले.
Published on : 27-03-2023 13:58:48,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update