जीवनातील असे एकही क्षेत्र नाही जिथे बाबासाहेबांच्या विचारांचा स्पर्श झालेला नाही – श्री.राजीव खांडेकर
महापुरूषांच्या स्मारकाबदद्ल त्या काळात बाबासाहेबांच्या मनात असलेल्या संकल्पना अगदी यथार्थपणे नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या बाबासाहेबांच्या स्मारकात साकारलेल्या असून बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले समृध्द ग्रंथालय ही या स्मारकातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्या अनुषंगाने सर्वच सुविधांच्या बाबत देशभरातील विविध स्मारकांपेक्षा हे अत्यंत वेगळे व सर्वोत्तम स्मारक असल्याचे सांगत एबीपी न्यूज व एबीपी माझाचे मुख्य संपादक श्री. राजीव खांडेकर यांनी हे स्मारक पाहिले आणि भारावून गेलो, स्तिमित झालो अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. आपण या स्मारकाला भेट देतो तेव्हा येथील एक एक गोष्ट पाहून बाबासाहेबांच्या आभाळाएवढ्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंचा प्रत्यय येतो. त्यामुळे प्रत्येकाने याठिकाणी आवर्जून भेट देऊन प्रेरणा घ्यावी व इतरांनाही भेट देण्यास सांगावे असे आवाहन त्यांनी केले.
ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसर आयोजित केलेल्या ‘जागर 2023’ या व्याख्यानमालेच्या शुभारंभाचे ‘सर्वव्यापी आंबेडकर’ या विषयांवरील व्याख्यानपुष्प गुंफताना त्यांनी स्मारक अवलोकन केल्यानंतरच्या भावना व्यक्त केल्या. समाजविकास विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार यांच्या शुभहस्ते, उपआयुक्त श्री. योगेश कडुस्कर यांच्या उपस्थितीत मुख्य संपादक श्री. राजीव खांडेकर यांचा सन्मान करण्यात आला.
आपल्या जीवनातील असे एकही क्षेत्र नाही जिथे बाबासाहेबांच्या विचारांचा स्पर्श झालेला नाही असे सांगत श्री. राजीव खांडेकर यांनी ‘सर्वव्यापी आंबेडकर’ या मालिकेचे 12 भाग करता आले ही अत्यंत समाधान देणारी गोष्ट असल्याचे सांगितले.
लहानपणापासून वाचनाची आवड असणा-या बाबासाहेबांना प्रसंगी घरातले दागिने गहाण ठेवून पुस्तकासाठी पैसे देणारे वडील लाभले, केळुसकर गुरूजींसारखे त्यांच्यातील हुशारी ओळखणारे मार्गदर्शक लाभले, यातून तयार झालेले त्यांचे वाचनप्रेम इतके अफाट होते की परदेशात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असतानाही त्यांनी पुस्तकांना प्राधान्य दिले असे सांगताना श्री. राजीव खांडेकर यांनी पुस्तकांसाठी घर बांधणारे ते एकमेव अशा शब्दांत बाबासाहेबांच्या ग्रंथप्रेमाचा अनेक उदाहरणे देत आदराने उल्लेख केला.
वैयक्तिक पातळीवर जाऊन बाबासाहेबांची माणसे जपण्याची आवड तसेच मित्रप्रेम यावरही विविध गोष्टी, पत्रव्यवहाराचे दाखले देत श्री. राजीव खांडेकर यांनी बाबासाहेबांच्या जवळच्या मित्रपरिवाराची माहिती दिली.
लोकसत्तेत असताना दिल्लीमध्ये माईसाहेबांच्या भेटींतून बाबासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला असे कथन करताना श्री. राजीव खांडेकर यांनी कलाप्रेमी बाबासाहेबांचे अनेक पैलू सांगितले. स्वयंपाक उत्तम करता येणारे बाबासाहेब, व्हायोलीन वादनात गती असणारे बाबासाहेब, वयाच्या 63 व्या वर्षानंतर त्यांनी हाती ब्रश घेतला आणि बुध्दांच्या अनेक भावमुद्रा चित्रांकित केल्या असेही वेगळे पैलू त्यांनी सांगितले. एका आयुष्यात माणूस किती वैविध्यपूर्ण गोष्टी करू शकतो व त्याही सर्वोत्तम याचे बाबासाहेबांचा जीवनपट पाहिल्यावर आश्चर्य वाटत राहते असे ते म्हणाले.
अर्थतज्ज्ञ, कृषितज्ज्ञ म्हणून बाबासाहेबांनी केलेले वेगळ्या प्रकारचे काम, रिझर्व्ह बॅंकेचे संकल्पनाकार ही बाबासाहेबांची भूमिका यावेळी विविध दाखले देत त्यांनी अधोरेखीत केली. आधी ब्रिटीश कौन्सिलचे सदस्य आणि स्वातंत्र्यानंतर कायदेमंत्री म्हणून बाबासाहेबांनी राज्यघटना निर्मितीप्रमाणेच जल व ऊर्जा व्यवस्थापन, खनीज व्यवस्थापन, रोजगार व श्रम, बांधकाम, कामगार व महिला कल्याणकारी कायदे, नदीजोड संकल्पना, जलवाहतुक अशा विविध क्षेत्रात देशाच्या भविष्याचा विचार करून मांडलेल्या नाविन्यपूर्ण व दूरगामी लाभदायी प्रकल्प, योजनांविषयीच्या विस्तृत कामाची माहिती श्री. राजीव खांडेकर यांनी यावेळी दिली. ‘एक राज्य, एक भाषा’ या बाबासाहेबांच्या महत्वाच्या संकल्पनेची त्यांनी उकल करून दाखविली.
नवी मुंबई महानगरपालिका या स्मारकामध्ये सतत विविध मान्यवर व्यक्तींना पाचारण करून त्यांची व्याख्याने आयोजित करीत आहे ही सध्याच्या काळात अत्यंत वेगळी गोष्ट असून या माध्यमातून जो विचारांचा जागर घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे तो कौतुकास्पद असल्याचे मत श्री. राजीव खांडेकर यांनी व्यक्त केले. या व्याख्यानांना मिळणार प्रतिसाद व श्रोत्यांची सभागृहात आल्यानंतर व्याख्यान ऐकण्यातील तल्लीनता बघून भारावून गेलो असल्याचेही ते म्हणाले.
स्मारकातील व्याख्यानांना मिळणारा उदंड प्रतिसाद बघता जागर 2023 मधील व्याख्याने अनुभवण्यासाठी नागरिकांची गर्दी होणार हे लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या वतीने स्मारकाबाहेर एलईडी स्क्रीन लावण्यात आली होती व त्यावर व्याख्यानांचे थेट प्रक्षेपण (Live Telecast) व्यवस्था ठेवण्यात आली होती. श्रोत्यांनी भरगच्च भरून सभागृह हाऊसफुल्ल झाल्यानंतर अनेकांनी बाहेरील स्क्रीनवर या व्याख्यानाचा लाईव्ह अनुभव घेतला.
13 एप्रिलपर्यंत राबविण्यात येत असलेल्या ‘जागर 2023’ व्याख्यानमालेमध्ये यापुढील दुसरे व्याख्यानपुष्प बुधवार, दि. 5 एप्रिल रोजी, सायं. 6 वाजता बीबीसी मराठी, नवी दिल्लीचे प्रतिनिधी तथा सुप्रसिध्द लेखक श्री. नामदेव काटकर (अंजना) भूषविणार असून ‘वाचायचं कशासाठी?’ या विषयावर ते जीवनतील वाचनाच्या महत्वाविषयी सुसंवाद साधणार आहेत. या व्याख्यानाप्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 05-04-2023 06:31:01,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update