पावसाळापूर्व गटार सफाईचे काम 65 टक्के पूर्ण - कामाला वेग देण्याचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे निर्देश
यावर्षी पावसाळा नेहमीपेक्षा उशीरा सुरु होणार असल्याचे अंदाज वर्तविण्यात आले असले तरी हवामान बदलांमुळे ठिकठिकाणी व नवी मुंबईतही अवकाळी पाऊस पडत असल्याचे लक्षात घेऊन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार पावसाळापूर्व गटार सफाई कामे लवकरच एप्रिल महिन्याच्या आरंभापासून सुरु करण्यात आलेली आहेत.
पावसाळापूर्व गटार सफाईमध्ये गटारांमधील गाळ साफ करणे व पाण्याच्या प्रवाहाला कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या कामाचा समावेश असून हे काम दैनंदिन सफाई कामात समाविष्ट आहे. दैनंदिन साफसफाई करणा-या 96 गटांतील ठेकेदारांमार्फत हे काम सुरु करण्यात आले असून 65 टक्के काम पूर्ण झाले आहे.
पावसाळापूर्व गटार सफाईमध्ये गटारांमधील सुकी माती अथवा ओली माती अर्थात गाळ काढून गटारांच्या कडेला ठेवला जात असून सुकी माती 24 तासात व ओली माती अर्थात गाळ सुकल्यानंतर लगेचच उचलून घेऊन जाण्याचे निर्देश ठेकेदारांना देण्यात आलेले आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही असे निर्देशित करण्यात आले असून त्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याचेही सूचित करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या 8 विभागांमध्ये एकूण 5,94,583 रनींग मीटर गटारांची सफाई केली जात असून या कामावर संबंधित विभागाचे स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. गटारे सफाई झाल्यानंतर 31 ऑक्टोबरपर्यंत गटारातील पावसाचे पाणी वाहून जाण्यास प्रतिबंध होईल अशाप्रकारे पाण्याच्या प्रवाहातील अडथळे असल्यास ते दूर करण्याची जबाबदारीही संबंधित ठेकेदाराची असणार आहे.
ज्या ठिकाणी गटार सफाईचे काम सुरु आहे तेथे कामाचे फलक प्रदर्शित करणे गरजेचे असल्याचे सर्व ठेकेदारांना सूचित करण्यात आले असून सफाई काम करणा-या कामगारांना हातमोजे, गमबूट असे सुरक्षा साहित्य पुरविण्याची जबाबदारीही ठेकेदाराची आहे. काही ठिकाणी सुरक्षा साहित्य दिले असूनही कामगार ते न वापरता काम करीत असल्याचे निदर्शनास येत असून जागरुक नागरिकांकडून तशा प्रकारची छायाचित्रे प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने कामगारांना देण्यात आलेले साहित्य हे त्यांच्या सुरक्षेसाठी व आरोग्यासाठी हितावह असल्याचे कामगारांच्या लक्षात आणून देऊन त्याचा वापर त्यांच्याकडून केला जावा याकडे लक्ष देण्याच्या सूचना ठेकेदार व महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक यांना देण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे कामगारांनी जेवणापूर्वी साबणाने हात स्वच्छ धुणे आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे असून त्याकरिता आवश्यक साहित्यही त्यांस पुरविण्याचे निर्देश ठेकेदारांस दे्ण्यात आले आहेत. तसेच सध्याच्या तापमान वाढीचे प्रमाण लक्षात घेऊन कामगारांना टोपी व अनुषांगीक बाबी पुरविण्याच्याही सूचना देण्यात आलेल्या आहेत. एखाद्या कामगारास सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळल्यास त्यास त्वरित नजिकच्या महानगरपालिका नागरी आरोग्य केंद्रात अथवा रुग्णालयात नेऊन तपासणी करून घ्यावी असेही ठेकेदारांस निर्देशित करण्यात आले आहे.
पावसाळी गटारांची झाकणे सफाई करण्यासाठी उघडल्यानंतर काम पूर्ण झाल्यावर ती झाकणे दररोज संध्याकाळी व्यवस्थित बंद करावीत असेही निर्देशित करण्यात आले आहे. गटारांची सफाई संपूर्ण झाल्यानंतर गटारावरील झाकणांवर वर्तुळात 23 अंक हा पिवळ्या रंगाने 2023 वर्षाचे प्रतिक म्हणून लिहिला जातआहे. याबाबतची प्रत्यक्ष पाहणी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्याकडूनही केली जात आहे.
पावसाळापूर्व कामातील गटारे सफाई हे एक महत्वाचे काम असून ते लवकरात लवकर पूर्ण करावे असे निर्देशित करीत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी या कामाचे पर्यवेक्षण करणा-या प्रत्येक घटकाने हे काम योग्य रितीने विहीत वेळेत पूर्ण होईल याची काटेकोर दक्षता घ्यावी असे निर्देश दिले आहेत.
Published on : 19-04-2023 12:06:47,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update