नागरी सेवा सुविधांची गुणवत्ता राखण्यासोबतच कालबध्दतेकडेही विशेष लक्ष देण्याचे नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे निर्देश
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना पुरविण्यात येणा-या सेवा सुविधा उत्तम दर्जाच्या असण्याकडे विशेष लक्ष देतानाच त्यांची पूर्तता विहित वेळेत करण्याकडेही काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश देत नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी विभागप्रमुखांच्या विशेष बैठकीत प्रत्येक विभागामार्फत सुरु असलेल्या कामांचा व कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे आणि इतर विभागप्रमुख उपस्थित होते.
महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी असलेली मार्केट्स कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरु असून त्याला गती देण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. मार्केटमधील ओटल्यांचे वाटप झाल्यानंतर पुन्हा मार्केटच्या बाहेरच्या बाजूस फेरीवाले बसणार नाहीत याकडेही काटेकोर लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. ओटले वाटपाचे काम नियोजनबध्द रितीने पूर्ण करावे व पावसाळयापूर्वी हे वाटप करुन नागरिकांची व विक्रेत्यांची सोय होईल याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. फेरीवाला धोरण होणे अत्यंत महत्वाचे असून त्याबाबतच्या कार्यवाहीला गती द्यावी असेही आयुक्तांनी निर्देशीत केले.
घणसोली येथील रात्र निवारा केंद्र कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी तसेच कोपरखैरणे येथील केंद्राबाबतही निर्णय घ्यावा असे आयुक्तांनी निर्देश दिले. सीवूड येथील जेष्ठ नागरिक निवारा केंद्र कार्यान्वित करण्याबाबतच्या कार्यवाहीला गती द्यावी व तेथील फर्निचरचे सुरु असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करावे असेही आयुक्तांनी सूचित केले. सेक्टर 3 वाशी येथील बहुउद्देशीय इमारत लवकरात लवकर वापरात आणण्याच्या दृष्टीने कार्यवाहीच्या सूचना आयुक्तांनी केल्या.
जून महिन्यात शाळा सुरु होण्यापूर्वी शाळा इमारतींची आवश्यक दुरूस्ती करण्याची सुरु असलेली स्थापत्य कामे 31 मे पर्यंत पूर्ण करावीत असेही आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सूचित केले. यामध्ये कोपरी व जुहूगाव शाळांचे दुरुस्ती काम मोठे असल्याने त्याठिकाणी अधिक मनुष्यबळ लावून काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागाला दिल्या.
घणसोली से. 6 येथील नवीन नागरी आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन घेण्याची कार्यवाही प्रशासन विभागाच्या समन्वयाने आरोग्य विभागामार्फत जलद व्हावी असे सूचित करतानाच तेथील फर्निचर व्यवस्था व औषधसाठा उपलब्ध करुन घेण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले.
महापालिका अधिकारी, कर्मचारी यांचे वेतन बायोमॅट्रीक हजेरीनुसार व्हावे या अनुषंगाने तांत्रिक बाबी समजून घेत आयुक्तांनी वेतन देयकासोबत बायोमॅट्रीक हजेरीची प्रत प्रत्येक विभागाने प्रशासन व लेखा विभागाकडे दरमहा वेतन देयकासोबत सादर करावी असे निर्देश दिले. तसेच विभागप्रमुखांनी आपापल्या विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या कार्यालयातील आगमन – निर्गमन वेळेवर नियंत्रण ठेवावे व त्यांच्या उपस्थितीचा अहवाल विभागप्रमुखांच्या पुढील बैठकीत सादर करावा असेही निर्देशीत केले.
अधिकारी कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण कटीबध्द आहोत असे सांगत आयुक्तांनी नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांची सेवानिवृत्तीनंतरची पेन्शन लवकरात लवकर मिळण्याच्या दृष्टीने त्यांच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याची कार्यवाही सेवानिवृत्तीच्या दिनांकाच्या 6 महिने आधीपासूनच सुरू करावी असे निर्देश प्रामुख्याने आरोग्य विभाग व इतर सर्व विभागांना दिले.
विदयार्थ्यांना महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणा-या शिष्यवृत्ती वितरणाच्या कार्यवाहीचा आढावा घेताना सन 2021 – 22 च्या शिष्यवृत्तीसाठी विदयार्थ्यांनी सादर केलेली कागदपत्रे ही सन 2022-23 च्या शिष्यवृत्तीलाही चालतील हे लक्षात घेता सन 2022-23 ची शिष्यवृत्ती जलद वितरीत करावी असे निर्देश आयुक्तांनी समाजविकास विभागास दिले. सन 2021-22 मधील शिष्यवृत्तीकरिता प्राप्त 34 हजार अर्जांपैकी 20 हजारहून अधिक अर्जदारांना शिष्यवृत्तीचे वितरण झाले आहे. त्यामधील विविध कारणासाठी प्रलंबित असलेले अर्ज तत्परतेने निकाली काढावेत व पुढील सन 2022-23 च्या शिष्यवृत्तीचेही वितरण जलद पूर्ण करावे असे आयुक्तांनी निर्देशित केले.
अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या तृतीयपंथी व्यक्ती, शरीरविक्रय करणा-या महिला, आदिवासी घटक, दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी नियोजन केलेल्या योजनांची व उपक्रमांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने तत्परतेने नियोजन करावे असेही आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सूचित केले.
कोपरखैरणे येथील ऑर्किड स्कुल हे त्यांच्या शाळा व्यवस्थापनाने अचानक बंद केल्याने 32 मुलांच्या शिक्षणाचा निर्माण झालेला प्रश्न सोडवणूकीसाठी व त्यांना इतर शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा असेही आयुक्तांनी निर्देशीत केले.
युलू बाईकमुळे शहरातील नागरिकांना अत्यंत उत्तम सुविधा प्राप्त झाली असून या उपक्रमास अतिशय चांगला प्रतिसाद लाभताना दिसत आहे. तथापि ॲपव्दारे युलू बाईक चालविण्यासाठी घेतल्यानंतर ती निश्चित केलेल्या जागांवरील युलू स्टॅडवर न सोडता ती अनेकदा शहरात कुठेही सोडून दिली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच या बाईक लहान मुलांकडूनही वापरल्या जात असल्याचे आढळून येत आहे. या अनुषंगाने युलू बाईकची वापर नियमावली तयार करावी व त्या ॲपमध्ये युलू वापरासाठी वयाचे बंधन असावे अशा प्रकारच्या कार्यवाहीसाठी तत्पर प्रयत्न व्हावेत असेही आयुक्तांनी निर्देशीत केले. अशाचप्रकारे नवी मुंबई शहराचे पार्कींग धोरण तयार करण्याच्या कार्यवाहीला गती देण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या.
केंद्र व राज्य सरकारच्या पीएमपोर्टल, सीएम पोर्टल, आपले सरकार अशा तक्रार निवारण प्रणालीच्या पोर्टलवर नवी मुंबई महानगरपालिकेशी संबधित तक्रारींमधील प्रलंबित तक्रारी तत्परतेने निकाली काढाव्यात असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
पावसाळापूर्व कामांचा आढावा घेताना नैसर्गिक मोठ्या नाल्यांच्या साफसफाईची कामे 40 टक्के तसेच बंदिस्त गटारे साफसफाईची कामे 90 टक्के पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आल्यानंतर आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सदर कामे 25 मे पर्यंत पूर्ण व्हावीत याचा पुनर्उच्चार करीत या कामांची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे सांगितले.
Published on : 15-05-2023 14:31:22,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update