*नवी मुंबईच्या विकासाकरिता महाराष्ट्र शासनाचे संपूर्ण सहकार्य राहील – मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे* *237 कोटी रक्कमेच्या प्रकल्पांचे मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते लोकार्पण व भूमिपूजन*

केवळ टोलेगंज इमारती म्हणजे विकास नाही तर नागरिकांना आवश्यक असणा-या दर्जेदार सुविधा पुरविणे म्हणजे खरा विकास असल्याचे मत व्यक्त करीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांनी लोकाभिमुख निर्णय घेण्यासाठी कटिबध्द असणारे हे आपले सरकार नवी मुंबईच्या अधिक वेगवान विकासासाठी संपूर्ण सहकार्य राहील असे मत व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 19 नेरुळ येथील वंडर्स पार्कच्या नुतनीकरणाचा लोकार्पण समारंभ, कोपरखैरणे व ऐरोली येथील अत्याधुनिक टर्शिअरी ट्रिटमेंट प्लांटचा लोकार्पण समारंभ, सेक्टर 3 वाशी येथील महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीभवन बहुउद्देशीय इमारतीचा लोकार्पण समारंभ तसेच सेक्टर 11 सानपाडा येथील सेंट्रल लायब्ररीचा भूमिपूजन समारंभ मुख्यमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.शंभुराज देसाई, ऐरोली विधानसभा सदस्य आ.श्री. गणेश नाईक, बेलापूर विधानसभा सदस्य आ.श्रीम. मंदाताई म्हात्रे, विधानपरिषद सदस्य आ.श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय मुखर्जी, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. मिलिंद भारंबे, ठाणे जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे, माजी महापौर श्री. जयवंत सुतार, माजी नगरसेवक श्री. रविंद्र इथापे व इतर मान्यवर उपस्थित होते.
या 4 लोकोपयोगी सुविधांच्या माध्यमातून नवी मुंबईकरांसाठी 237 कोटी रक्कमेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न होत असताना मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिका शहराचा सर्वांगीण विकास करत असताना येथील सर्वसामान्य नागरिकाचा विचार करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. उद्याने, पार्क ही सध्याच्या धकाधकीच्या काळाची गरज असून वंडर्स पार्क सुरु झाल्यानंतर मुलांच्या चेह-यावरील आनंद पाहून समाधान वाटल्याचे सांगत मुख्यमंत्री महोदयांनी याठिकाणी असलेल्या जगातील 7 आश्चर्यांच्या प्रतिकृती व इतर अनेक गोष्टी याचा उपयोग लहानथोरांच्या विरंगुळ्यासाठी होईल असे सांगितले.
टर्शिअरी ट्रिटमेंट प्लांटसारखी अत्याधुनिक सुविधा सुरु होत असल्याने सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागतो आहेच शिवाय पिण्याच्या पाण्याचीही बचत होत आहे याबद्दल प्रशंसा करीत नवी मुंबई महानगरपालिकेने आधुनिकतेचा केलेला अंगिकार नागरिकांच्या व पर्यावरणाच्या दृष्टीनेही लाभदायी असल्याचे मत मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्त केला.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने असलेल्या स्मृतीभवनातून सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समारंभांसाठी स्वस्त दरात सभागृहाची सुविधा उपलब्ध होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करित मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी नागरिकांसाठी गरजेच्या गोष्टींची पूर्तता करीत असल्याबद्दल महानगरपालिकेच्या जनहिताय दृष्टीकोनाचे कौतुक केले.
सानपाडा येथे उभारल्या जात असलेल्या भव्यतम सेंट्रल लायब्ररीव्दारे वाचन संस्कृतीच्या विकासासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबद्दल मुख्यमंत्री महोदयांनी समाधान व्यक्त केले व यामधून विशेषत्वाने तरूणाईला प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते जनहिताय उत्तम सुविधा निर्मितीबद्दल महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर व शहर अभियंता श्री. संजय देसाई त्याचप्रमाणे या चारही प्रकल्पांशी संबंधित अभियंते व वास्तुविशारद आणि कंत्राटदारांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना ऐरोली विधानसभा सदस्य आ.श्री. गणेश नाईक यांनी लोकार्पण होत असलेल्या सुविधा नवी मुंबईकर नागरिकांसाठी लाभदायी असल्याचे सांगत नागरी सुविधांसाठी सिडकोमार्फत देण्यात येणा-या भूखंडांचा प्रश्न मांडला व याविषयी आणि शहराच्या दृष्टीने इतर महत्वांच्या विषयांबाबत शासन स्तरावर बैठक आयोजित करण्याची विनंती केली.
बेलापूर विधानसभा सदस्य आ.श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईमध्ये वंडर्स पार्क सारखी नागरिकांना व पर्यटकांना बघण्यासाठी अनेक ठिकाणे असल्याचे सांगत सर्वसामान्य नवी मुंबईकरांची आरोग्यविषयक गरज लक्षात घेऊन सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभे राहण्यासाठी आत्तापर्यंत मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त करीत यापुढील काळातही असेच सहकार्य करण्याची विनंती केली.
महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी एकूण 237 कोटी रक्कमेच्या नवी मुंबईतील 4 महत्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन मुख्यमंत्री महोद्यांच्या शुभहस्ते होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करीत वंडर्स पार्क, महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीभवन व नियोजित सेंट्रल लायब्ररी हे लोकोपयोगी प्रकल्प तसेच टर्शिअरी ट्रिटमेंट प्लांट हा पर्यावरणपूरक आणि लाभदायी प्रकल्प नवी मुंबईच्या विकासाला नवी गती देणारा असल्याचे सांगितले.
Published on : 31-05-2023 13:59:06,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update