सीएसआर निधीतून सुका कचरा संकलनासाठी शेड व 2 ई टेम्पो घनकचरा व्यवस्थापन सेवेत दाखल
स्वच्छतेमध्ये सातत्याने देशातील मानांकन उंचाविणारे शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकिक होत असताना प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण स्वच्छता संकल्पना व उपक्रम राबविण्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच आघाडीवर राहिली आहे. शून्य कचरा हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने अनेक अभिनव उपक्रम राबविले असून झोपडपट्टी भागातील कच-याची त्याच भागात विल्हेवाट लावली जावी यादृष्टीने प्रायोगिक स्वरुपात 5 झोपडपट्ट्यांमध्ये सुरु केलेला झिरो वेस्ट स्लम मॉडेल हा उपक्रम राष्ट्रीय पातळीवर नावजला गेला आहे. केंद्रीय स्तरावरून इतरांनी अनुकरण करावा असा प्रकल्प म्हणून त्याची वाखाणणी झाली आहे असे सांगत नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेत स्त्रीमुक्ती संघटनेच्या कचरा वेचक महिलांनी केलेल्या सेवाभावी कामाचा गौरव केला.
सेक्टर 21 सीबीडी बेलापूर येथील उड्डाणपुलाजवळील जागेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने रिचाल्ड कंपनीच्या सीएसआर फंडामधून, रोटरी क्लब ऑफ नेरुळ सी साईड चॅरिटेबल ट्रस्टच्या सहयोगातून, कचरावेचक महिलांकरिता सुका कचरा संकलनासाठी शेडची उभारणी तसेच सुका कचरा ने-आण करण्यासाठी 2 ई टेम्पो देण्यात आलेले आहेत. नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या हस्ते या सुविधांचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी महानगरपालिकेचे शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजाळे, बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त श्री. शशिकांत तांडेल, स्त्रीमुक्ती संघटनेच्या मुख्य समन्वयक प्रा. वृषाली मगदूम, रोटरी क्लबचे पदाधिकारी श्री. अनिल करता, श्री. अशोक गोपालन व श्री. सिन्हा आणि इतर पदाधिकारी तसेच माजी नगरसेविका श्रीम. सरोज पाटील व अन्वय प्रतिष्ठानचे डॉ. अजित मगदूम उपस्थित होते.
स्त्री मुक्ती संघटनेचे कार्य हे केवळ कचरा निर्मूलन आणि स्वच्छता यापुरते मर्यादित नाही तर कचरावेचक महिलेच्या कुटुंबाचा विकास करण्याकडे संस्थेमार्फत विशेष लक्ष दिले जाते ही प्रशंसनीय बाब असल्याचे सांगत आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सध्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभर सुरु असलेल्या केंद्र सरकारच्या थ्री आर या अभियानाला शेडच्या माध्यमातून हातभार लागणार असल्याचे सांगितले. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून दर सहा महिन्यांनी या महिलांसाठी आरोग्य शिबिर व मुलांसाठी शिष्यवृत्ती सुरू करण्याबाबत आयुक्तांनी सूतोवाच केले. स्तुती काते या कचरावेचक महिलेच्या मुलीने दहावी एसएससी परीक्षेत 91 टक्के गुण संपादन केल्याबद्दल या मुलीचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.
स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त वृषाली मगदूम यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे कचरा वेचक महिलांच्या पाठीशी असणारे सहकार्य व पाठबळ यामुळे या महिलांचा आर्थिक विकास होत असल्याचे सांगितले. रोटरी क्लबच्या पुढाकारातून मिळालेल्या शेड व दोन ई टेम्पो मुळे महिलांच्या जीवनात अमुलाग्र बदल होणार असून महिलांमधील नेतृत्वाची क्षमता पुढे येऊन आगामी फळी तयार होत आहे असे सांगत त्यांनी महानगरपालिका व रोटरी क्लब यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली,
उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजाळे यांनीही नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून गेली दोन दशके कचरावेचक महिलांना सहकार्य केले जात आहे, प्रोत्साहन दिले जात आहे, त्यांच्या अडचणी समजून घेऊन मदत केली जात आहे असे सांगितले. थ्री आर आर उपक्रमातही त्यांना सामावून घेतले जाईल असेही असेही त्यांनी सांगितले.
रोटरी क्लब ऑफ नेरूळ सी साईडचे अनिल करता यांनी शेडसाठी रिचाल्ड कंपनीच्या माध्यमातून व्यक्तीश: लक्ष देऊन शेड व दोन ई टेम्पो हे कचरा वेचक महिलांच्या सक्षमीकरणासाठी देण्याची संधी लाभल्याबद्दल समाधान व्यक्त करीत या पुढील काळातही अशीच मदत करत राहू असे सांगितले. परिसर सखी विकास संस्थेच्या अध्यक्ष श्रीम. रुक्मिणी पॉल यांनी आभार मानताना सर्वांच्या सहकार्याने असा उपक्रम सुरु होणे हे आमच्यासाठी स्वप्नवत आहे व आम्ही सर्वांच्या प्रयत्नाचे चीज करू असे सांगितले. यावेळी विविध विभागातील परिसर भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Published on : 05-06-2023 10:00:01,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update