आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांची ऑन द स्पॉट स्वच्छता पाहणीआयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांची ऑन द स्पॉट स्वच्छता पाहणी
शहर स्वच्छतेकडे संबंधित सर्व घटकांनी काटेकोर लक्ष द्यावे असे आढावा बैठकीत निर्देशित करतानाच नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी विविध भागांना प्रत्यक्ष भेटी देण्यास सुरुवात केली असून आज सकाळपासून त्यांनी शिरवणे मार्केटपासून सुरुवात करीत कोपरखैरणे - घणसोली नाल्यापर्यंत विविध भागांमधील स्वच्छता स्थितीची ऑन द स्पॉट जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
या भेटी दरम्यान कोपरखैरणे – घणसोली नाल्याची सफाई समाधानकारक झाली नसल्याचे निदर्शनास आल्याने व नाल्याच्या प्रवाहात आणि काठावर मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक आढळल्याने तेथील स्वच्छता अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे आदेश दिले.
या पाहणी दौ-यात आयुक्तांसमवेत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे डॉ. बाबासाहेब राजळे, सहाय्यक संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकाण, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पाहणी दौ-यामध्ये आयुक्तांनी नेरुळ, शिरवणे, जुईनगर, सानपाडा, तुर्भे, एपीएमसी, वाशी तसेच कोपरखैरणे या विभागातील विविध सेक्टर्स, वाणिज्य भाग यामधील स्वच्छता स्थितीची पाहणी केली. स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने सर्व सोसायट्यांच्या बॅकलेन कायम स्वच्छ राहतील याकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.
दररोज 100 किलो पेक्षा जास्त कचरा निर्माण करणा-या सोसायट्या, संस्था (BWG) यांनी त्यांच्या ओल्या कच-यावर त्यांच्याच आवारात प्रक्रिया करावी व विल्हेवाट लावावी यादृष्टीने सजग राहण्याचे निर्देश आयुक्तांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले. या प्रकल्पांची केवळ सुरुवात करून भागणार नाही तर ते नियमित कार्यान्वित राहतील याबाबतही काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
सेक्टर 29 वाशी येथील प्रेसिडेंट पार्क तसेच सेक्टर 14 कोपरखैरणे येथील ब्रेव्हर्ली पार्क या सोसायट्या घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण असून त्याठिकाणच्या प्रक्रियेची आयुक्तांनी पाहणी केली.
विविध सेक्टर्समधील अंतर्गत भागात आयुक्तांनी चालत जाऊन स्वच्छता कार्याची पाहणी केली व पदपथ, रस्त्यांची सफाई करताना रस्त्यांच्या कडेला ठिकठिकाणी लावलेल्या लीटर बीन्सची सफाई करावी तसेच लीटर बीन्स नादुरुस्त असल्यास किंवा लावलेल्या जागेवर नसल्यास त्याची माहिती त्वरित आपल्या विभागाच्या अभियंत्यांना द्यावी व लीटर बिन्स बसवून घ्यावीत असेही स्वच्छता निरीक्षकांना निर्देशित करण्यात आले.
ब्लू डायमंड हॉटेल, कोपरखैरणेसमोरील सार्वजनिक शौचालय पाणी नसल्याने बंद आढळल्याने संबधितांना जाब विचारत कोणतेही शौचालय नागरिकांना वापरता येणार नाही अशाप्रकारे बंद ठेवलेले आढळल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल असे स्पष्ट करित आयुक्तांनी त्याठिकाणच्या केअर टेकरकडून होत असलेला कंटेनरचा निवासी वापर तात्काळ बंद करण्याचे निर्देश विभाग अधिकारी यांनी दिले.
बंदिस्त गटारे, नैसर्गिक नाले यांची सफाई झाली असून त्याठिकाणी प्रवाहात कचरा येऊ नये व असल्यास तो एका ठिकाणी अडकून सहजपणाने साफ करता यावा म्हणून लावण्यात आलेले स्क्रिन फिल्टर कार्यान्वित असल्याबाबत तपासणी करून घ्यावे तसेच ते व्यवस्थित रहातील याची दक्षता घेण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.
कुठेही, कशाही प्रकारे लागलेल्या होर्डींमुळे शहराचे विद्रुपीकरण होते ही गोष्ट गांभिर्याने घेऊन होर्डींगविरोधी मोहिमा तीव्रपणे राबवाव्यात असेही निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले.
वाणिज्य संकुल भागात अतिक्रमण नसावे याबाबत यापूर्वीच दिलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास येत असल्याने या बाबीकडे गंभीरपणे विशेष लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
नागरिकांकडून विविध माध्यमांतून व प्रसारमाध्यमांतून आपल्यापर्यंत पोहचणा-या स्वच्छतेबाबतच्या तक्रारी याकडे सकारात्मकतेने लक्ष देऊन त्या शहराच्या स्वच्छता सुधारणेसाठी महत्वाच्या आहेत हे लक्षात घेत त्यांचे तत्परतेने निवारण करावे असे निर्देश दिले.
नवी मुंबईकर नागरिक स्वच्छतेबाबत अत्यंत जागरूक व सकारात्मक आहेत हे आपल्या शहराचे बलस्थान असून नागरिकांच्या स्वच्छता कार्यातील सहभाग वाढीवर भर द्यावा अशाही सूचना आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी दिल्या.
Published on : 08-06-2023 14:36:50,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update