आयकर विभागामार्फत नमुंमपा अधिकारी, कर्मचारीवृंदाला टीडीएस व आयकराबाबत विशेष प्रशिक्षण

अदा केल्या जाणा-या रक्कमांवर योग्य रितीने कर कपाती केली जावी यादृष्टीने आयकर विभागाच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये टीडीएस व आयकराबाबतच्या तरतूदींविषयी विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आलेले होते.
नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, लेखा विभागप्रमुख मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सत्यवान उबाळे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या आयकरविषयक प्रशिक्षण सत्रात लेखाविषयक कामकाज पाहणा-या महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारीवृंदाने मोठ्या संख्येने उपस्थित रहात टीडीएस व आयकराची प्रणाली समजून घेतली.
आयकर विभागाचे उपआयुक्त श्री. सुरेंद्रसिंग चरण यांनी सादरीकरणाव्दारे टीडीएस व आयकर कपातीबाबतच्या नियमांची सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी विचारलेल्या शंकांचे विस्तृत विवेचन देत निरसन केले.
याप्रसंगी व्यासपिठावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सत्यवान उबाळे, क्रीडा विभागाच्या उपआयुक्त श्रीम. मंगला माळवे, आयकर अधिकारी श्री. हेमंत कुमार, श्री. महेश एस., श्री. लखविंदर सिंग उपस्थित होते. या प्रशिक्षण सत्राचा लाभ घेण्यासाठी परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. चंद्रकांत तायडे तसेच लेखाधिकारी सर्वश्री मारोती राठोड, दयानंद कोळी, दर्शन तांडेल, दिपक पवार आणि इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सत्यवान उबाळे यांनी आयकर विभागाने हे प्रशिक्षण सत्र नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारीवृंदासाठी आयोजित करून टीडीएस व आयकराबाबत सविस्तर माहिती दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
Published on : 09-06-2023 12:25:53,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update