नवी मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीत – आज 473 द.ल.लि. पाणीपुरवठा
एमआयडीसीमार्फत 2 व 3 जून रोजी दुरूस्ती कामांसाठी शटडाऊन घेण्यात आले होते तसेच 7 जून रोजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरण मुख्य जलवाहिनीवर व भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथे मान्सूनपूर्व पाणीपुरवठा संबंधी आवश्यक कामे करण्याकरिता शटडाऊन घेण्यात आले होते.
त्यातच दि. 10 जून रोजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरण प्रकल्पाची २०२४ मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी आदई गावाजवळ फुटल्यामुळे नमुंमपा क्षेत्रास कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला होता. सदर दुरूस्ती काम तातडीने हाती घेण्यात येऊन अहोरात्र काम करून युध्दपातळीवर पूर्ण करण्यात आले.
अशा रितीने मागील आठवडाभर तांत्रिक अडचणींमुळे विस्कळित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. या कालावधीत अडचणी समजून घेऊन नवी मुंबईकर नागरिकांनी महापालिका प्रशासनास चांगले सहकार्य केले.
पाणीपुरवठा वितरणामधील तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा विभागामार्फत आवश्यक कामे तत्परतेने करून घेण्यात आली असून शहर अभियंता श्री. संजय देसाई यांच्या नियंत्रणाखाली, अतिरिक्त शहर अभियंता श्री. मनोज पाटील व पाणीपुरवठा विभागाने नियोजन करून संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणा पूर्ववत कार्यान्वित केलेली आहे. आज 12 जून पासून नवी मुंबईतील पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला असून 472.87 द.ल.लि. पाणीपुरवठा करण्यात आलेला आहे
नवी मुंबईकर नागरिकांनी पाणीपुरवठा यंत्रणेमध्ये आलेल्या आकस्मिक अडचणींमुळे पाणीपुरवठा व्यवस्थेवर झालेला परिणाम लक्षात घेऊन जे सहकार्य केले त्याबद्दल आभार व्यक्त करीत पाऊस अजूनही सुरू झालेला नसल्याने नैसर्गिक परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी आपल्याला उपलब्ध होणा-या पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 12-06-2023 13:58:24,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update