नमुंमपा आयोजित ‘थ्री आर’ विषयक वेबिनारमध्ये देशापरदेशातील 600 हून अधिक स्वच्छताप्रेमी अभ्यासकांचा वैचारिक सहभाग

केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘माझे जीवन, माझे स्वच्छ शहर’ (Meri Life Mera Swachh Shahar) या संकल्पनेतून ‘थ्री आऱ’ हा उपक्रम जाहीर करण्यात आलेला असून नवी मुंबई महानगरपालिकेने यामध्ये सक्रीय सहभाग घेतला आहे. ‘थ्री आऱ’ च्या अनुषंगाने महानगरपालिकेमार्फत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात असून ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ उपक्रमांतर्गत ‘थ्री आर’ विषयावर जागतिक पातळीवरील वेबिनारचे आयोजन केले होते.
एका मोठ्या पातळीवर ‘थ्री आर’ विषयी खुली चर्चा व्हावी व यामधून ‘शून्य कचरा’ संकल्पनेला व्यापक स्वरुप लाभावे यादृष्टीने नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शाश्वत भविष्याच्या दृष्टीने जबाबदारीने घनकचरा व्यवस्थापन (Driving a Sustainable Future with Responsible Waste Management)’ या विषयावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये जगभरातील 600 हून अधिक संस्था प्रतिनिधींनी सहभागी होत ‘थ्री आर’ विषयक चर्चेत सहभाग घेतला. यामध्ये नगरपालिकांचे मुख्याधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, रिसायकलर्स, व्हेंन्डर्स, पर्यावरण क्षेत्रात काम करणारे संस्था प्रतिनिधी यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होत विस्तृत चर्चा केली.
नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी बदलत्या काळानुसार पर्यावरणाच्या जपणुकीसाठी आपल्या वर्तनात बदल घडविणे आवश्यक असल्याचे सांगत कचरा कमी करणे व करीत असलेल्या कच-याची निर्मितीच्या पातळीवरच विल्हेवाट लावणे या दोन्ही गोष्टीकडे जबाबदारीने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. असा दृष्टीकोन नागरिकांमध्ये निर्माण करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका कटिबध्द असून आजच्या वेबिनारमधूनही शाश्वत घनकचरा व्यवस्थापनासाठी सुयोग्य पर्याय पुढे येतील असा विश्वास व्यक्त केला.
आजच्या आधुनिक युगात मोठ्या प्रमाणावर निर्माण होणा-या ई कच-याच्या विल्हेवाटीची फार मोठी समस्या उभी असून या वेबिनारमध्ये ई वेस्ट बाबत आणि बॅटरी वेस्टबाबत पॅनल डिस्कशन झाले. यामध्ये ई वेस्ट व बॅटरी वेस्ट संकलनाचे, विल्हेवाटीचे, पुनर्प्रक्रियेचे पर्याय यावर सविस्तर विचार विनिमय झाला. यामध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया ईआरआय चेआरमन जॉन शेगेरिऑन, इको रिसायकलींग लि.चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक श्री. बि. के. सोनी व रिटेक एन्व्हायरोटेक प्रा. लि. चे प्रादेशिक अधिकारी श्री. सिध्दार्थ शिवकुमार यांनी विविध मुद्दे मांडले.
एस प्लस पीएस आर्किेटेक्टचे संस्थापक श्री. पिंकीश शहा यांनी कच-यापासून तयार केलेल्या विटांच्या गृहनिर्मितीसाठी वापराच्या दीर्घकाळ टिकणा-या अनेक पर्यायांची माहिती दिली. पारसिक हिलवर अशाच प्रकारे श्री. नारायण भार्गव यांच्या बंगल्याचे बांधकाम रिसायकल साहित्यापासून केलेले असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे टिकाऊ शौचालय निर्मितीसाठी कच-यापासून तयार झालेले बांधकाम साहित्य याबाबत इको इलेक्ट्रीकचे प्रमुख रिसायकलमॅन म्हणून ज्यांचा गौरव होतो अशा डॉ. बिनीश देसाई यांनीही आपल्या अभ्यासपूर्ण सादरीकरणातून या वेगळ्या विषयाची माहिती दिली.
आपल्या दैनंदिन जीवनात विविध पद्धतींनी कचरा कमी करणे आणि पर्यावरण संवर्धन करणे या बाबींमध्ये कच-याच्या पुनर्वापराव्दारे टिकाऊपणाचा समावेश करून प्रत्येकाने स्वच्छ आणि निरोगी भविष्यासाठी योगदान दिले पाहिजे हा संदेश या वेबिनारच्या माध्यमातून दिला गेला आहे. या अत्यंत सविस्तर संवादामुळे ‘थ्री आर’ विषयक नवनव्या संकल्पना पुढे आल्या व हेच या वेबसंवादाचे यश असल्याचे मत व्यक्त करीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत या वेबिनारमध्ये देशापरदेशातून सहभागी झालेल्या 600 हून अधिक स्वच्छता आणि पर्यावरण विषयक जागरूक विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अधिकारी व्यक्तींचे आभार मानले.
या मोहीमेपूर्वीच शहरात 92 ठिकाणी ‘थ्री आऱ’ सेंटर्स कार्यान्वित करण्यात आली आहेत. या मोहीमेअंतर्गत या सेंटर्समधील लोकांनी आणून ठेवलेल्या वस्तू व्यवस्थित मांडण्याचे काम व त्यावर लक्ष ठेवण्याचे काम बिंदुरा सेवाभावी संस्थेमार्फत केले जात असून ‘मानवतेचे देणे – घेणे’ अर्थात ‘घरातील नको असलेल्या वस्तू सेंटर्समध्ये ठेवाव्यात व ज्यांना त्या हव्या आहेत त्यांनी त्या घेऊन जाव्यात’ ही अभिनव संकल्पना नागरिकांच्या सहयोगाने यशस्वी झालेली आहे.
या सोबतच या मोहिमेअंतर्गत घरातील नको असलेला सुका कचरा मार्ट किंवा बाजारामध्ये दिल्यानंतर त्यावर पॉईंट्सची कुपने देऊन त्या कुपनांव्दारे त्याच मार्टमध्ये नवीन खरेदी केलेल्या वस्तूंवर तेवढ्या पॉईट्सच्या रक्कमेची किंमतीमध्ये सवलत देण्याच्या अभिनव संकल्पनेला डि मार्ट सीबीडी बेलापूर येथे रिसायकल मार्ट व सीवूड नेरुळ येथे अपना बाजार मधील रिसायकल बाजार नावाने सुरुवात करण्यात आलेली आहे.
याव्दारे कचरा या कधीही न संपणा-या समस्येवर मार्ग काढण्यात आला आहे. यामुळे ‘शून्य कचरा’ संकल्पपूर्तीकड़े वाटचाल सुरु झालेली आहे.
याशिवाय स्र्कॅपनेस्ट या संस्थेच्या माध्यमातून ‘थ्री आर ऑन व्हील्स’ या अभिनव उपक्रमाला प्रोत्साहित करण्यात आले असून याव्दारे नागरिक त्यांच्याकडील विविध प्रकारचा सुका कचरा विक्री करू शकतात. या ॲपमध्ये अनेक विक्रेते उपलब्ध होत असल्यामुळे ग्राहकांना त्यांच्या कच-याची तुलनात्मक चांगली किंमत उपलब्ध होऊ शकते. तसेच विक्रेत्यांनाही सहजपणाने ग्राहक उपलब्ध होऊ शकतात. ही संकल्पनादेखील नागरिकांना पसंतीस पडू लागल्याचे दिसून येत आहे.
अशा विविध उपक्रमांमध्ये यापुढील काळात वेबिनारमध्ये मांडल्या गेलेल्या नव्या संकल्पनांचा अंतर्भाव करता येईल व यामधून नवी मुंबई शहर स्वच्छतेच्या व पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक चांगले काम करता येईल असा विश्वास नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला.
Published on : 20-06-2023 14:35:10,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update