*'वसुधैव कुटुंबकम् योग' करीत नवी मुंबईकरांनी उत्साहात साजरा केला जागतिक योग दिन*
'वसुधैव कुटुंबकम् करिता योग'' या संकल्पनेवर आधारित नववा “आंतरराष्ट्रीय योग दिवस” नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, सिडको व द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहकार्याने, सिडको प्रदर्शनी हॉलमध्ये विशेष उपक्रमाव्दारे अत्यंत उत्साहात पार पडला.
याप्रसंगी बेलापूर विधानसभा सदस्य आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे व श्रीम. सुजाता ढोले, शहर अभियंता श्री. संजय देसाई यांच्यासह नमुंमपा अधिकारी, कर्मचारी तसेच 750 हून अधिक योग संस्थांचे पदाधिकारी व सदस्य तसेच योगप्रेमी नागरिक, विद्यार्थी सहभागी झाले होते. द आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग प्रशिक्षक श्री. प्रमोद कोकणे यांच्यासह सर्वांनी विविध योगप्रकार करीत आत्मिक शांती व समाधानाचा अनुभव घेतला.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी तणावमुक्त जगण्यासाठी योग महत्वाचा असल्याचे सांगत मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी जागतिक योग दिनाची मांडलेली संकल्पना आज संपूर्ण जगभरात उत्साहाने साजरी केली जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडकोने हा आरोग्यदायी उपक्रम आयोजित केल्याबद्दल कौतुक करीत आ. श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी उपस्थित मोठी विद्यार्थी संख्या पाहून आनंद व्यक्त केला व लहान वयातच मुलांमध्ये योगाचे महत्व रूजविण्यात येत आहे हे मुलांच्या आणि शहराच्या आरोग्यपूर्णतेसाठी चांगली गोष्ट असल्याचे सांगितले.
महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी मा. पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेतून व केंद्र आणि राज्य शासनाच्या पाठींब्याने आयोजित करण्यात येत असलेला आंतरराष्ट्रीय योग दिवस नवी उमेद जागविणारा असल्याचे सांगत आजच्या धकाधकीच्या युगात योग ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. योगाचे शारीरिक, मानसिक असे खूप लाभ असून केवळ आजच्या एका दिवसापुरता नाही तर योगाचा अंगिकार नियमित करावा असे आयुक्तांनी आवाहन केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘वसुधैव कुटुंबकम् करिता योग’ या संकल्पनेवर आधारित प्रत्येक घरी अंगणी योग या घोषवाक्यास अनुसरून "सिडको" तसेच “द आर्ट ऑफ लिव्हींग” या संस्थेच्या सहकार्याने अत्यंत उत्कृष्ट असे नियोजन करण्यात आले. यावेळी ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने शिलादिदी यांनी मनोयोगाची ध्यानधारणा करून घेतली.
Published on : 21-06-2023 13:04:29,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update