नवी मुंबईकर रसिकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात रंगली 'स्वच्छंद काव्य संगीत संध्या'
'घनकचरा अन ओला कचरा रोज करू वेगळा, नियमाने वागता तुम्हाला मान मिळे आगळा, पाठ शुद्ध पर्यावरणाचा आमच्याकडूनी शिका, सांगत आहे तुमची आमची नवी मुंबई महापालिका' - अशा शब्दात कवी श्री. अरुण म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत करीत असलेल्या कामाची महती सांगितली आणि 'स्वच्छंद काव्य संगीत संध्या' एकाहून एक सरस कवितांनी उत्तरोत्तर रंगत गेली.
स्वच्छ आणि सुंदर शहर ही नवी मुंबईची ओळख असून केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच राज्यात प्रथम क्रमांक कायम राखला असून देशातील मानांकन सतत उंचावत ठेवले आहे. मागील वर्षी 'स्वच्छ सर्वेक्षण 2022' मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने देशात तृतीय क्रमांकाचे मानांकन पटकावले होते. यावर्षी 'स्वच्छ सर्वेक्षण 2023' ला सामोरे जाताना 'निश्चय केला, नंबर पहिला' हे ध्येयवाक्य नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षणाला सामोरी जात आहे. महानगरपालिकेच्या व नवी मुंबईकर नागरिकांच्या या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी मुंबई दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक व निर्माते श्री.जयू भाटकर यांच्या 'वैष्णो व्हिजन' या कलानिर्मिती संस्थेच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात 'स्वच्छ सर्वेक्षण 2023' अंतर्गत 'स्वच्छंद काव्य संगीत संध्या' आयोजित करण्यात आली होती. यामध्ये नामवंत कवी प्रा.अशोक बागवे, श्री.अरुण म्हात्रे, डॉ.महेश केळुसकर आणि संगीतकार श्री.कौशल इनामदार हे नामांकित साहित्यिक, कलावंत सहभागी झाले होते.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छतेच्या दृष्टीने करीत असलेल्या प्रयत्नांना महाराष्ट्रातील नामवंत कवी आणि संगीतकार यांनी स्वयंस्फूर्तीने कार्यक्रम करून जो उत्स्फूर्त पाठिंबा दिला ही गोष्ट आमचा उत्साह वाढवणारी असल्याचे सांगितले. स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने महानगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण कामांची माहिती देतानाच आयुक्तांनी नवी मुंबईत ठिकठिकाणी रेखाटलेल्या चित्रकविताभिंतींमुळे तसेच मागील वर्षी राष्ट्रीय पातळीवर नोंद घेतल्या गेलेल्या स्वच्छ कवी संमेलनामुळे नवी मुंबईची ओळख 'कवितांचे शहर' म्हणून होऊ लागली असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
संगीतकार श्री.कौशल इनामदार यांच्या अत्यंत गाजलेल्या कविवर्य सुरेश भट लिखित, 'लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी' या मराठी भाषा अभिमान गीताने सुरू झालेल्या मैफिलीत 'कवी बोलतो जेव्हा प्राणातून तेव्हा त्याला नसतं हसायचं, कवी बोलतो जेव्हा प्राणातून तेव्हा आपण कवितेसारखं बसायचं' या कवी आणि रसिक यांच्यामधील नाते अधोरेखित करणाऱ्या प्रा. अशोक बागवे यांच्या कवितेने रसिकांना साद घातली आणि 'स्वच्छंद काव्य संगीत संध्या' श्रोत्यांच्या 'वाहव्वा!, क्या बात है!' अशा अभिप्रायांची आणि उत्स्फुर्त टाळ्यांची दाद घेत बहरत गेली.
डॉ. महेश केळुसकर यांच्या खास मालवणी बोलीतील 'तीळफुलाच्या शेतात' या कवितेने कोकणची काव्यसफर घडविली तसेच त्यांच्या 'झिनझिनाट' या अत्यंत गाजलेल्या कवितेच्या खास ढंगातील सादरीकरणाने रसिकांना भुरळ घातली.
श्री. अरुण म्हात्रे यांच्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या 'ती वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे' या कवितेने श्रोत्यांना नॉस्टेल्जिक बनविले. त्याचप्रमाणे त्यांच्या नव्याकोऱ्या पाऊस कवितेने श्रोत्यांना प्रेक्षागृहात बसून पावसात भिजण्याचा अनुभव दिला.
प्रा.अशोक बागवे यांनी आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई शहर ज्या पध्दतीने प्रयत्न करीत आहे, ते बघता नवी मुंबईचा देशात पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर ठरण्याचा निश्चय प्रत्यक्षात येईल असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी सादर केलेल्या 'नदीच्या किनारी नदीला म्हणावे' या गज़ल स्वरूपातील नदीच्या प्रार्थनेला रसिकांनी प्रचंड दाद दिली.
संगीतकार श्री. कौशल इनामदार यांनी मंचावर उपस्थित तिन्ही कवींच्या गीतकाव्यरचना अप्रतिम शैलीत सादर केल्या. प्रा.अशोक बागवे लिखित 'वासाचा पयला, पाऊस अयला' या संगमेश्वरी बोलीतील गीतकाव्यासोबत रसिकांनी टाळ्यांचा नाद धरला. श्री.अरुण म्हात्रे यांचे 'स्पंदनांचे नेटके घर बांधतो पाऊस हा' हे गीतकाव्य चिंब भिजवून गेले. डॉ. महेश केळुसकर लिखित 'रानात झिम्म पाऊस उन्हाला फूस तुझ्या पिरतीची' या गीतकाव्याने प्रीतीचे पाऊस ओले रंग उधळले.
या स्वच्छंद काव्य संगीत संध्येची सांगता 'हीच आमुची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे' या उंबुटू या चित्रपटातील श्री.कौशल इनामदार यांनी संगीत दिलेले गीत सादर करताना विष्णुदास भावे नाट्यगृह कौतुक करावे इतके स्वच्छ व सुंदर ठेवणाऱ्या नाट्यगृह व्यवस्थापकापासून स्वच्छताकर्मींपर्यंत सर्वांचा आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन विशेष सन्मान करण्यात आला. शहर स्वच्छतेप्रमाणेच आपली मनेही स्वच्छ असायला हवीत असा आगळावेगळा संदेश या स्वच्छंद काव्य संगीत संध्येने दिला.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी नमुंमपा शाळा क्रमांक 92, कुकशेत येथील इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थी समूहाने सादर केलेल्या स्वच्छता कीर्तनाला व त्यातही विशेषत्वाने बाल विद्यार्थी कीर्तनकार मनीष राजभर याच्या प्रबोधनात्मक उत्तम सादरीकरणाला रसिकांनी व उपस्थित मान्यवर कवी, कलावंतांनी उत्कट दाद दिली. त्याचाही विशेष सन्मान याप्रसंगी करण्यात आला.
कविता, गीतांप्रमाणेच या कलावंतांनी सांगितलेले विविध किस्से आणि आठवणीही रसिकांना भावल्या. या काव्य संगीत संध्येतील तबलावादक श्री. मंदार पुराणिक आणि गिटार वादक श्री. संजय महाडिक यांनाही सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे निर्माता श्री. जयु भाटकर यांनीही स्वच्छतेवरील कविता सादर केली. कार्यक्रमाचे अत्यंत नेटके आणि काव्यात्म सूत्रसंचालन श्रीम.अस्मिता पांडे यांनी केले.
वैष्णो व्हिजनच्या वतीने नमुंमपा आयुक्त श्री.राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त श्रीम.सुजाता ढोले व श्री.संजय काकडे, शहर अभियंता श्री.संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ.बाबासाहेब राजळे, जनसंपर्क अधिकारी कवी श्री.महेंद्र कोंडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्रमांची दखल शासकीय पातळीवर घेतली जात असून या स्वच्छंद काव्यसंगीत संध्येचे प्रसारण मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून दिनांक 7 जुलै 2023 रोजी रात्री 8 वाजता करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांनी दिली. जे रसिक नागरिक कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहू शकले नाहीत त्यांनी दूरदर्शनवरून 7 जुलै रोजी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयुक्तांनी केले.
Published on : 26-06-2023 06:59:50,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update