राजर्षि शाहू महाराज यांचा गौरव ‘समाजपती’ म्हणून व्हावा – अभिनेते, वक्ते श्री. राहुल सोलापूरकर
छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण ‘गडपती’ म्हणून नावाजतो. त्याचप्रमाणे शाहू महाराजांचे सर्वस्पर्शी लोककल्याणकारी कार्य बघता त्यांना ‘समाजपती’ हीच उपाधी सार्थ शोभून दिसेल असे मत व्यक्त करीत सुप्रसिध्द अभिनेते व व्याख्याते श्री. राहुल सोलापूरकर यांनी शाहू महाराजांचा जीवनपट व त्यांचे अतुलनीय कार्य हे विविध घटना, प्रसंग, विचार व्याख्यानातून प्रभावीपणे मांडत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली येथे राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आयोजित ‘विचारवेध’ या व्याख्यान शृंखलेअंतर्गत ‘राजर्षि शाहू विचार वारसा’ या व्याख्यानातून श्री. राहुल सोलापूरकर यांनी छ्त्रपती शाहूंचे प्रेरणादायी विचार व व्यक्तित्व उभे केले. .
श्री. राहुल सोलापूरकर यांनी मालिका आणि चित्रपटांमधून छत्रपती शाहू महाराजांची भूमिका साकारली. ती साकारताना अनेक महिने शाहू महाराजांच्या व्यक्तित्वाचा, त्यांच्या विचारांचा, त्यापाठीमागील मानसिकतेचे सखोल चिंतन करून अभ्यास केला. त्या अभ्यासाचे फलीत म्हणजे आजच्या व्याख्यानामधून आपल्यासमोर उभे राहिलेले शाहू महाराजांचे अलौकिक व्यक्तिमत्व असून श्री. राहुल सोलापूरकर उत्तम अभिनेतेही असल्याने त्यांच्या रुपात प्रत्यक्ष शाहू महाराज आपल्याशी बोलत असल्याचा भास होत होता अशा शब्दात नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
छत्रपती शाहू महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेली अनेक माणसे जिवंत असल्याने त्यांची भूमिका साकारणे हे माझ्यासाठी फार मोठे आव्हान होते असे सांगत अगदी लंडन म्युझियमपर्यंत जाऊन, जूनी कागदपत्रे अभ्यासून, शाहू महाराजांचे व्यक्तिमत्व उभे केल्याचे श्री. राहुल सोलापूरकर यांनी सांगितले.
शाहू महाराज साकारताना त्यांच्यासारखे दिसण्यासाठी सुप्रसिध्द वेशभूषाकार भानू अथय्या यांनी घेतलेली मेहनत होतीच. त्यासोबतच शाहू महाराजांसारखे दिसण्याप्रमाणेच त्यांचे विचार व मानसिकतेचा अभ्यास करून ही भूमिका साकारली असे सांगताना श्री. राहुल सोलापूरकर यांनी त्या काळातील विविध आठवणी आपल्या कसदार अभिनय शैलीने व नाट्यमय दमदार आवाजाने शब्दश: जिवंत उभ्या केल्या.
शाहू महाराज हे दरबार भरविणारे राजे नव्हते तर ‘शासन तुमच्या दारी’ या वाक्याची त्या काळात प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे ‘लोकराजा’ होते असे सांगत शाहू महाराजांचा रथ म्हणजे लोकांमध्ये प्रचलित असलेला खडखडा आणि महाराजांची कार्यपध्दती, त्यांची लोकांशी बोलण्याची आपुलकीची पध्दत याचे मुर्तीमंत दर्शन श्री. राहुल सोलापूरकर यांनी घडविले.
शिक्षणाचे महत्व ओळखून शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. मुलांच्या शिक्षणासाठी बोर्डींग सुरु केली. त्यांची दूरदृष्टी एवढी की 1922 साली शाहू महाराजांचे निधन झाल्यानंतर आजही ती बोर्डींग व्यवस्थित सुरु आहेत कारण त्यांनी बोर्डींग सुरु रहावीत म्हणून शेतजमीन राखीव ठेवली असे सांगत जातवार बोर्डींग सुरु करून प्रत्येक विद्यार्थ्याला आत्मसन्मान राखून शिक्षण घेता यावे याबाबतही शाहू महाराजांचा मानवतावादी दृष्टीकोन व तत्कालीन वर्तमानाचे भान श्री. राहुल सोलापूरकर यांनी सुस्पष्टपणे मांडले.
राधानगरी धरण निर्मितीची पार्श्वभूमी सांगताना त्यांनी धरणाचे सविस्तर अभियांत्रिकी विश्लेषण केले व त्या धरणाला अद्यापही तडा गेला नाही या पाठीमागील तांत्रिक प्रक्रिया उलगडून सांगितली.
छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे असलेला मनस्वीपणा हा लोकांशी त्यांच्या असलेल्या अनुभवातून आलेला होता असे सांगत महाराजांनी कोल्हापूरला ‘कलापूर’ बनविले यापाठीमागील त्यांची बहुश्रुतता उलगडून सांगितली.. संगीतकार गोविंदराव टेंबे, गायक अल्लादिया खाँसाहेब, कर्मविर भाऊराव पाटील, लक्ष्मणराव किर्लोस्कर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक प्रभुतींमधील वेगळे गुण ओळखून त्यांना महाराजांनी वेळोवेळी केलेली मदत व दिलेले प्रोत्साहन याची अनेक उदाहरणे श्री. राहुल सोलापूरकर यांनी साभिनय सांगितली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अंगभूत प्रतिभा आणि हुशारी छत्रपती शाहू महाराजांच्या लक्षात आली होती. त्यामुळेच गुणग्राहक असणारे महाराज बाबासाहेबांना शोधत त्यांच्या मुंबईतील घरी गेले. बाबासाहेबांची कोल्हापूरात मिरवणूक काढली, त्यांना उच्च शिक्षणासाठी विनाअट मदत केली, ‘तुझ्या बांधवांना शिक्षण दिले नाही तर तुझ्या शिक्षणाला अर्थ नाही’ असा संदेश दिला, एवढेच नव्हे तर यापुढे ‘बाबासाहेब बहुजनांचे नेतृत्व करतील’ असे जाहीर केले, अशाप्रकारे छत्रपती शाहू महाराज बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले याचे अनेक दाखले व प्रसंग श्री. राहुल सोलापूरकर यांनी कथन केले.
महाराजांनी त्या काळानंतरही लागू पडतील असे दूरगामी उपयोगी नियम बनविले. सर्वसामान्यांना न्याय देण्याकरिता आयुष्यभर टीकेची पर्वा न करता संघर्षा केला. मात्र समानतेचे व्रत सोडले नाही. समाज समृध्द करण्याचा सदैव विचार केला. म्हणूनच महाराज गेल्यानंतर प्रबोधनकारांनी “आज हिंदुस्थानचा सर्चलाईट गेला” अशा शब्दात अग्रलेखातून आपल्या भावना व्यक्त केल्या असे सांगत श्री. राहुल सोलापूरकर यांनी राजर्षि शाहू महाराजांचा भव्यतम लोककल्याणकारी जीवनपट आपल्या अनोख्या कथन शैलीत इतक्या प्रभावीपणे उभा केला की व्याख्यान झाल्यानंतर श्रोत्यांनी उभे राहत टाळ्यांच्या गजरात त्यांना मानवंदना दिली.
नवी मुंबई महानगरपालिकेने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ऐरोली येथे उभे केलेले हे स्मारक ज्ञान जागराचे स्मारक असल्याचे सांगत इतिहासाचे भान आजच्या काळात राखणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन महानगरपालिका याठिकाणी जो विचारांचा जागर व्याख्यानांचे आयोजन करून सातत्याने करीत आहे ही कौतुक करण्यासारखी गोष्ट असल्याचे श्री. राहुल सोलापूरकर यांनी आवर्जुन सांगितले. त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Published on : 26-06-2023 15:20:57,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update