नमुंमपा ईटीसी केंद्रामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांची आषाढी दिंडी उत्साहात संपन्न

नवी मुंबई महानगरपालिका ईटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्राद्वारे दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांना समाजात स्वत:ची ओळख निर्माण करता यावी यादृष्टीने सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून नव्या शैक्षणिक वर्षामध्ये आषाढी एकादशीनिमित्त़ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 50 हून अधिक दिव्यांग मुलांनी मोठया उत्साहात सहभाग घेतला.
ईटीसी केंद्रातील दिव्यांग मुलांना आपल्या परंपरा, संस्कृती यांची माहिती व्हावी यादृष्टीने आषाढी एकादशी निमित्त वर्गामध्ये मुलांना संतसंप्रदायाचे महत्व, विविध संतांची माहिती तसेच वारक-यांची दिंडी याबाबत वर्गशिक्षकांकडून माहिती देण्यात आली. तसेच सर्व मुलांना याविषयीची चित्रफीत दाखवण्यात आली.
या दिंडीमध्ये सर्व मुले पारंपारिक वारकरी पोशाखात उपस्थित होती. काही मुलांनी विठ्ठल रूक्मिणीच्या रूपात या सोहळयात सहभाग घेतला. वारकरी ध्वज, डोक्यावर तुळस घेत या दिंडीची सुरुवात वरील तिस-या मजल्यावरील मुलांपासून करत पुढे प्रत्येक मजल्यावरील मुले, शिक्षक, निमवैद्यकीय कर्मचारी व पालक या दिंडीमध्ये सहभागी होत गेले. दिंडीची सांगता सभागृहामध्ये वारकरी परंपरेप्रमाणे रिंगण घालून करण्यात आली. यावेळी विठ्ठल, ज्ञानेश्वर, तुकाराम व हरीनामाच्या गजराने ईटीसी केंद्र दुमदुमले. महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ईटीसी केंद्रप्रमुख सहाय्यक आयुक्त श्रीम. मिताली संचेती यांच्या नियंत्रणाखाली या दिंडीचे नेटके आयोजन करण्यात आले.
Published on : 30-06-2023 06:55:01,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update