डीडी सह्याद्री वाहिनीवर 7 जुलैला रात्री 8 वाजता नवी मुंबई महानगरपालिकेची ‘स्वच्छंद काव्य संगीत संध्या’
स्व्च्छतेमध्ये देशात नेहमीच मानांकन उंचाविणारे शहर म्हणून नवी मुंबई आघाडीवर असून महाराष्ट्र राज्यात सातत्याने पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून नावाजले जात आहे. यावर्षी 'स्वच्छ सर्वेक्षण 2023' ला सामोरे जाताना ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे ध्येय नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महानगरपालिकेची वाटचाल सुरु असून महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागावर भर देण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘वैष्णो व्हिजन’ या कला संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील नामांकित कवी व संगीतकार, गायकांना घेऊन 23 जून 2023 रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहात ‘स्वच्छंद काव्य संगीत संध्या’ आयोजित करण्यात आली होती.
या काव्य संगीतमय उपक्रमात सुप्रसिध्द कवी प्रा.अशोक बागवे, श्री.अरुण म्हात्रे, डॉ.महेश केळुसकर यांच्या एकाहून एक सरस कवितांचा आस्वाद रसिकांनी उत्कृष्ट दाद देत घेतला तसेच ‘लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी’, ‘हिच आमुची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे’ या लोकप्रिय गीतांचे संगीतकार श्री. कौशल इनामदार यांच्या सुश्राव्य गीत-संगीतात श्रोते रंगून गेले.
कविता व गीतांप्रमाणेच या कलावंतांनी सांगितलेले विविध किस्से आणि आठवणीही रसिकांना भावल्या. श्रीम. अस्मिता पांडे यांनी नेटके सूत्रसंचालन केलेल्या या काव्य संगीत मैफलीचे आयोजन दूरदर्शनचे माजी सहा. संचालक तथा निर्माता श्री. जयु भाटकर यांनी केले होते. तसेच या कार्यक्रमात नमुंमपा शाळा क्रमांक 92, कुकशेत येथील विद्यार्थी समुहाने विद्यार्थी कीर्तनकार मनीष राजभर यांच्यासह कीर्तनरंग उजळले होते. अशा या अभिनव कार्यक्रमाची दखल शासकीय पातळीवरून घेण्यात आली असून ‘स्वच्छंद काव्य संगीत संध्या’ कार्यक्रमाचे प्रसारण मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार, दि. 7 जुलै 2023 रोजी, रात्री 8 ते 9 या वेळेत करण्यात येत आहे.
विष्णूदास भावे नाटयगृहात रसिकांच्या भरगच्च उपस्थितीत संपन्न झालेली ही स्वच्छंद काव्य संगीत संध्या प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी इच्छा असूनही उपस्थित न राहू शकलेल्या रसिकांसाठी डी डी सहयाद्री वाहिनीवर 7 जुलै रोजी रात्री 8 वा. होणारे प्रक्षेपण ही आनंदपर्वणी असून ज्यांनी हा कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवलेला आहे त्यांनाही या प्रक्षेपणामुळे पुनर्प्रत्ययाचा आनंद घेता येईल.
डी डी सहयाद्री वाहिनीवरून प्रक्षेपित होणारी ‘स्वच्छंद काव्य संगीत संध्या’ ही एकप्रकारे नवी मुंबईच्या स्वच्छता कामगिरीला मिळालेली कौतुकाची दाद असून नागरिकांनी 7 जुलै रोजी दूरदर्शन सहयाद्री वाहिनीवरील या कार्यक्रमाचा रात्री 8 ते 9 या वेळेत आवर्जून आस्वाद घ्यावा असे आवाहन नमुंमपा आयुक्त् श्री. राजेश नार्वेकर यांचेमार्फत करण्यात येत आहे.
Published on : 05-07-2023 13:30:16,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update