नवी मुंबई महानगरपालिका तात्पुरत्या शिक्षक भरती प्रक्रियेला उदंड प्रतिसाद


नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील शिक्षणाची गुणवत्ता लक्षात घेऊन विद्यार्थी व पालकांचा या शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी वाढता कल आहे. त्याकरिता या शाळांमध्ये शिक्षकांची आवश्यकता लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत आज तात्पुरत्या स्वरूपात घड्याळी तत्वावर (तासिका तत्वावर) शिक्षक नियुक्तीसाठी आयोजित करण्यात आलेल्या थेट मुलाखतीसाठी 1500 हून अधिक शिक्षक उमेदवारांनी उपस्थिती दर्शवली.
नमुंमपा आयुक्त श्री राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त श्री संजय काकडे यांच्या नियंत्रणानुसार, शिक्षण विभागाचे उपआयुक्त श्री दत्तात्रय घनवट व शिक्षणाधिकारी श्रीम अरुणा यादव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सुव्यवस्थितरित्या केलेल्या नियोजनामुळे शिक्षक नियुक्तीसाठीची थेट कागदपत्रे पडताळणीची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झाली.
सकाळी 9 वाजल्यापासूनच शिक्षक भरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी महानगरपालिका मुख्यालयासमोर शिस्तीत रांग लावून एकच गर्दी केली. त्यांच्या नोंदणीचे तसेच कागदपत्र तपासणीचे सुव्यवस्थित नियोजन शिक्षण विभागामार्फत करण्यात आल्याने ही प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. सायंकाळी 4 वाजेपर्यंत प्राथमिक शिक्षक पदासाठी 722 व माध्यमिक शिक्षक पदासाठी 605 उमेदवारांची नोंदणी झालेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या 53 प्राथमिक व 23 माध्यमिक शाळा असून या शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षणाकरिता तासिका तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक नियुक्ती केली जात आहे. यामध्ये प्राथमिक विभागात मराठी माध्यमात 88, हिंदी माध्यमात 31, ऊर्दू माध्यमात 4 अशाप्रकारे एकूण 123 शिक्षकांची भरती केली जात आहे.
तसेच माध्यमिक विभागासाठी मराठी माध्यमात 37, हिंदी माध्यमात 11, उर्दू माध्यमात 2 व इंग्रजी माध्यमात 10 अशा 60 शिक्षक पदांवर तात्पुरती भरती केली जात आहे. ही भरती पूर्णतः तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्वावर असून याद्वारे नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील शिक्षकांची गरज पूर्ण केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेला उमेदवार शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने महानगरपालिकेच्या शाळांतील शिक्षकांची गरज पूर्ण होणार असून विद्यार्थ्यांनाही उत्तम शिक्षक उपलब्ध होणार आहे.
Published on : 10-07-2023 15:09:44,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update