नवी मुंबईतील रस्ते सुरक्षितता उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांनी घेतला आढावा

रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका, वाहतुक पोलीस, प्रादेशिक परिवहन कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभाग अशा सर्व प्राधिकरणांनी परस्पर समन्वय राखून आवश्यक उपाययोजना कराव्यात व त्या करतांना अपघातप्रवण क्षेत्राकडे विशेष लक्ष दयावे असे निर्देश देत नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी रस्त्यांवर टाकल्या जाणा-या स्पीड ब्रेकरच्या तांत्रिक तपशीलाचीही बारकाईने तपासणी करावी व स्पीड ब्रेकर्स हे नियमावलीनुसार प्रमाण आकारमानातच असावेत अशा सूचना दिल्या.
नवी मुंबई शहरातील अपघातप्रवण क्षेत्रात सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी डीआयएमटीएस यांच्या अहवालानुसार महानगरपालिकेच्या वतीने गठीत करण्यात आलेल्या विशेष समितीच्या आढावा बैठकीप्रसंगी समितीचे अध्यक्ष तथा नमुंमपा आयुक्त् श्री. राजेश नार्वेकर यांनी या अनुषंगाने झालेल्या व सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. याप्रसंगी समिती सदस्य शहर अभियंता श्री. संजय देसाई, वाहतुक पोलीस उपआयुक्त श्री. तिरुपती काकडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीम. हेमांगी पाटील, अतिरिक्त शहर अभियंता श्री. मनोज पाटील व श्री. शिरीष आरदवाड, आयआयटी मुंबईचे तज्ज्ञ प्राध्यापक के व्ही के राव, अभियांत्रिकी महाविदयालयाच्या प्रतिनिधी समिती सदस्य प्रा. मंजुला देवी तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
मा. सर्वोच्च न्यायालयाने याचिका क्र. 295 / 2012 मध्ये रस्ता सुरक्षेबाबत दिलेल्या निर्देशानुसार गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने रस्ते सुरक्षा संदर्भात अभ्यास करुन उपाययोजना सूचविण्यासाठी दिल्ली इंटिग्रेटेड मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट सिस्टीम (DIMTS) या संस्थेची नियुक्ती केली होती. सदर संस्थेच्या शिफारशीनुसार स्थानिक पातळीवर अपघातप्रवण क्षेत्राचा (Black Spot) अभ्यास करुन त्या ठिकाणी अपघात होऊ नयेत याकरिता प्राधान्याने आवश्यक उपाययोजना करण्याचे सूचित केले होते. त्यास अनुसरुन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली संबधित सर्व प्राधिकरणांची रस्ते सुरक्षा समिती गठीत करण्यात आली व याबाबत आवश्यक उपाययोजनांची पाहणी, तपासणी करुन आवश्यक कार्यवाही तत्परतेने करण्यास सुरूवात करण्यात आली.
नवी मुंबईतील पामबीच मार्ग हा वाहन चालकांचा पसंतीचा रस्ता म्हणून सुपरिचित आहे. तथापि या रस्त्यावर होणारे अपघात हा चिंतेचा विषय असून या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका वाहतुक पोलीसांच्या सहयोगाने प्रयत्नशील आहे. याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृ्ष्टीने रस्ते सुरक्षा समितीच्या मागील बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात येऊन पामबीचसह शहरातील इतर अपघातप्रवण जागांची आयआयटी मार्फत शास्त्रीय पध्दतीने अभ्यास करण्यात येऊन आवश्यक उपाययोजना सूचविण्यात आल्या होत्या. त्या सूचनांनुसार महानगरपालिकेमार्फत तत्परतेने कार्यवाही सुरू करण्यात आली. व मागील वर्षभरात अपघातांची संख्या कमी होऊन त्या उपाययोजनांची फलश्रुतीही निदर्शनास आली. याविषयीची सविस्तर आकडेवारी वाहतुक पोलीस उपआयुक्त श्री. तिरूपती काकडे यांनी सादर केली.
तथापि या अनुषंगाने मागील 5 वर्षात ज्या ज्या जागेवर अपघात झालेत त्याचे अचूक लोकेशन गुगल मॅपवर टाकून त्या जागांचा बारकाईने तांत्रिक अभ्यास करावा व त्याठिकाणी अपघात होऊ नये याकरिता आणखी उपाययोजना करण्यात याव्यात असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
पाम बीचवर झालेल्या अपघाताच्या विविध कारणांचा विचार करताना चालकाचे वेगावर नियंत्रण सुटणे ही बाब प्रामुख्याने दिसून येत आहे. या अनुषंगाने स्पीड गनव्दारे वेग मर्यादा ओलांडणा-या बेजबाबदार वाहनचालकांवर वाहतुक पोलीस विभागामार्फत कारवाई करताना स्पीड गनला वाहन संख्येची मर्यादा असल्याने पाम बीच मार्गावरील प्रमुख ब्लॅक स्पॉटवर ॲटोमॅटीक हाय स्पीड डिटेक्शन सीसीटिव्ही बसविण्याचे काम मागील बैठकीत निश्चित करण्यात आल्याप्रमाणे प्रगतीपथावर असल्याची माहिती अभियांत्रिकी विभागामार्फत देण्यात आली. याव्दारे वाहनांच्या वेग मर्यादेवर बारकाईने लक्ष दिेले जाणार असून वेगाचे उल्लंघन करणा-या वाहनांची नोंद स्वयंचलीत यंत्रणेव्दारे पोलीस नियंत्रण कक्षामध्ये होणार आहे. त्याव्दारे अशा वाहनांवर ई चलनामार्फत दंडात्मक कारवाई करणे सोपे होणार आहे. सदर काम जलद गतीने करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
वाहतुक सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेने 88 पैकी 63 चौकांच्या काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण केली असून 15 कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती शहर अभियंता श्री. संजय देसाई यांनी दिली. त्याचप्रमाणे शहरातील 4 अपघातप्रवण जागा तसेच इतर महत्वाच्या जागांवर वाहतुक पोलीस विभागाशी समन्वय राखून आवश्यक सिग्नल यंत्रणा वाढ व सक्षमीकरण, रस्त्यांवर टेबल टॉप क्रॉसींग, लेन मार्कींग, जॉमेट्री इम्प्रुव्हमेट, स्पीड ब्रेकर अशा उपाययोजना करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली. शहरात सायकलसारख्या प्रदूषणविरहित वाहन वापराला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने 100 किमी. सायकल ट्रॅकचे नियोजन असल्याची माहिती देत त्यांनी 21 किमी. सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात आली असल्याचे सांगितले.
दररोज साधारणत: 5 हजाराहून अधिक संख्येने जेएनपीटीकडे जाणा-या कंटेनरसारख्या जड वाहनांचा मोठा भार आम्रमार्गावर पडत असून त्या मार्गावर प्रमाणापेक्षा जास्त उंचीचे स्पीडब्रेकर्स आहेत. शहरातही अनेक जागांवर अशीच परिस्थिती आहे हे निदर्शनास आणून देत शहरातील रस्त्यांवर असलेल्या स्पीड ब्रेकर्सच्या तांत्रिक आकारमानावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. हे स्पीडब्रेकर त्यांच्या प्रमाणकानुसार असतील याची काळजी घेण्याच्या व प्रमाणानुसार ते करण्याचे निर्देश यावेळी आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी अभियांत्रिकी विभागास दिले.
कोणताही अपघात हा त्या व्यक्तीवर व त्याच्या कुटुंबावर होणारा फार मोठा आघात असून प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करून वाहन चालविणे आवश्यक आहे. पाम बीच मार्ग असो की इतर ठिकाणे येथे होणारे अपघात हे प्रामुख्याने वाहनाचा अतिवेग तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळेच घडत असल्याचे निदर्शनास येते. त्यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका वाहतुक पोलीस विभागाच्या सहकार्याने आवश्यक अशा उपाययोजना करीत आहे. यामध्ये वाहनचालकाची जबाबदारी अतिशय महत्वाची असून वेग मर्यादेचे पालन करीत व वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करून प्रत्येकाने सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 12-07-2023 09:56:17,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update