नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेत नमुंमपा शाळेची सुरुवातीपासूच मैदान गाजविण्यास सुरुवात
नवी मुंबई महानगरपालिकेस शालेय स्तरावरील क्रीडा स्पर्धांकरिता जिल्ह्याचा दर्जा प्राप्त असून नुकतीच नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांना उत्साहात सुरुवात झालेली आहे.
यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.36 कोपरखैरणे शाळेतील 17 वर्षाआतील मुलींचा फुटबॉल संघ पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी झालेला आहे. या स्पर्धेमध्ये मागील अनेक वर्षे स्पर्धांमध्ये अधिराज्य गाजविणाऱ्या क्वॉन्व्हेंट शाळांचे संघ सहभागी झाले आहेत. यातील जगात सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या फुटबॉल खेळामध्ये प्रथमच महानगरपालिका शाळा क्र.36, कोपरखैरणे संघ सहभागी झाला आहे.
या आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेत मुलींच्या पहिल्याच सामन्यात नमुंमपा शाळा क्रमांक 36, कोपरखैरणेच्या मुलींच्या संघाने विबग्योर हायस्कूल, ऐरोली या संघावर 4-0 असा एकतर्फी मोठ्या फरकाने विजय संपादन करीत आपल्या उत्तम खेळाची चुणूक दाखविली आहे. या सामन्यामध्ये नमुंमपा शाळेच्या पूर्वा नवघने हिने 2 तर पुजा जाधव व किरण सूर्यवंशी यांनी प्रत्येकी 1 गोल केले. राबिया शेख हिने या यशात अत्यंत मोलाची साथ दिली.
सामन्यादरम्यान उपस्थित अनुभवी प्रशिक्षकांनी नमुंमपा शाळेतील विद्यार्थिनी खेळाडूंच्या उत्तम खेळाचे कौतुक करित आगामी काळात नवी मुंबई महानगरपालिका फुटबॉलसारख्या खेळात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करेल व अनेक खेळाडू महानगरपालिका शाळांचा नावलौकिक उंचावताना दिसतील अशा शब्दात शुभेच्छा दिल्या.
मैदानावर उपस्थित सर्वच शाळांच्या प्रशिक्षकांनी सामना जिंकल्यानंतर महानगरपालिका शाळेतील मुलींचे अभिनंदन करत पुढील सामन्याकरिता शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे प्रथमच सीबीएससी बोर्डाच्या खाजगी शाळांसोबत खेळून जिंकल्यानंतर झालेला अनपेक्षित अभिनंदनाचा वर्षाव बघून महानगरपालिका शाळेतील मुली भारावून गेल्या.
नवी मुंबई मध्ये फिफा वुमन्स वर्ल्ड कप झाल्यापासून महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा फूटबाॅल खेळाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला असून आम्ही चांगल्या प्रकारे फुटबॉल खेळू शकतो असा विश्वास वाढताना दिसून येत असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव यांनी दिली आहे. शाळा क्र. 36 चा संघ तयार करण्यात शाळेचे मुख्याध्यापक श्री.प्रशांत गाडेकर आणि क्रीडा शिक्षक श्री. ज्ञानेश्वर घुगे यांनी विशेष मेहनत घेतली असून त्यांना शिक्षिका सौ. वर्षा शिंदे व सौ.अश्विनी सावले यांचे सहकार्य लाभले आहे. या संघास क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने फुटबॉल साहित्य व गणवेश आणि सरावसाठी मैदान उपलब्ध करून देत नेहमीच प्रोत्साहित करण्यात आले आहे.
Published on : 17-07-2023 07:45:41,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update