मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आवाहनाला प्रतिसाद न देणा-या मालमत्ताकर थकबाकीदारांवर अटकावणीची कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील काही लघु उद्योजकांनी महानगरपालिकेचा मालमत्ता कर भरणार नाही अशी भूमिका घेऊन आधी मा.उच्च न्यायालयात व त्यानंतर मा.सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेऊन एप्रिल 2023 मध्ये सविस्तर आदेश पारित करताना मा.सर्वोच्च न्यायालयाने 2 ऑगस्ट 2023 रोजी पुढील सुनावणीची तारीख देऊन दरम्यानच्या कालावधीत थकबाकीदार लघु उद्योजकांनी मालमत्ता कर भरला नाही तर त्यादिवशी मा.सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेणार नाही असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
त्यासोबतच लघु उद्योजकांनी मालमत्ताकर भरणा केला नाही तर मालमत्ता कर वसूलीसाठी थकबाकीदारांची मालमत्ता सील करण्याचे आदेशही मा. सर्वोच्च न्यायालयामार्फत नवी मुंबई महानगरपालिकेस देण्यात आले होते. त्यानुसार नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार मालमत्ताकर विभागाच्या वतीने विभागप्रमुख तथा अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांचे स्वाक्षरीने थकबाकीदार लघु उद्योजकांस सौजन्यपत्रे ( Courtesy Letter ) देण्यात आली होती. सदर सौजन्यपत्रास अनुसरून थकबाकीदार मालमत्ताकर धारकांनी या सहामाहीच्या देयकासह थकबाकी 30 जूनपर्यंत भरणे अपेक्षित होते. तथापि लघुउद्योजकांकडून यास अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाल्याचे निदर्शनास येत आहे.
त्या अनुषंगाने मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार थकबाकीदार मालमत्ताकर धारकांची मालमत्ता अटकावणी करण्याची कार्यवाही नवी मुंबई महानगरपालिका मालमत्ताकर विभागाच्या वतीने सुरू करण्यात येत असून थकबाकीदार मालमत्ताकर धारकांनी याची नोंद घ्यावी असे महानगरपालिकेच्या वतीने सूचित करण्यात आलेले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उद्योग व्यवसाय करून उपजिविका करणा-या लघु उद्योजकांनी मालमत्ता करातून मिळणारी रक्कम ही महानगरपालिका क्षेत्राच्या विकासासाठी वापरली जाते हे लक्षात घेऊन तसेच महानगरपालिकेच्या वतीने एमआयडीसी क्षेत्रात रस्ते, गटारे अशी सुविधा कामे मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याचे लक्षात घेत मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आपला थकीत मालमत्ता कर भरणा करावा व शहर विकासाला हातभार लावावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी केले असून थकीत मालमत्ता कर भरणा न केल्यास महानगरपालिकेला मालमत्ता सील करण्याच्या कार्यवाहीची वेळ लघुउद्योजक थकीत मालमत्ताकर भरणा करून येऊ देऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Published on : 17-07-2023 16:31:08,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update