मदतकार्यासाठी इर्शाळवाडीत जात असताना सहा. अग्निशमन केंद्र अधिकारी श्री. शिवराम ढुमणे यांचे दुर्दैवी निधन
रायगड जिल्हयतील खालापूर तालुक्यात नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरण प्रकल्पानजिक असलेल्या इर्शाळवाडी येथे झालेल्या भूस्खलन दुर्घटनेत नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलाची मदतकार्य पथके रात्री 1 वाजताच्या सुमारास घटनास्थळी रवाना झाली होती. हा भाग अत्यंत दुर्गम असल्याने त्याठिकाणी कोणतेही वाहन जाऊ शकत नाही. अशावेळी मदतकार्य साहित्यासह पथकांमधील जवानांना पायीच चालत जावे लागत होते. यामध्ये मदतकार्यासाठी घटनास्थळाकडे चालत जात असताना नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलातील सहाय्यक केंद्र अधिकारी श्री. शिवराम यशवंत ढुमणे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले. वयाच्या केवळ 48 व्या वर्षी झालेल्या त्यांच्या आकस्मिक निधनाबददल सर्व स्तरांतून तीव्र शोक व्यक्त् करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सीबीडी बेलापूर अग्निशमन केंद्रात श्री. शिवराम ढुमणे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. यावेळी अग्निशमन दलाच्या वतीने उपस्थित अग्निशमन जवानांनी आपल्या दिवंगत साहसी सहका-याला सलामी देत भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
तातडीच्या आपत्कालीन बैठकीसाठी सकाळी लवकरच मंत्रालयात पोहचलेल्या महापालिका आयुक्त् श्री. राजेश नार्वेकर यांनीही श्री. शिवराम ढुमणे यांच्यासारख्या कार्यक्षम अधिका-याचे अशा प्रकारच्या दुर्घटनेत दुर्दैवी निधन व्हावे ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी कुटूंबासाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी अत्यंत धक्कादायक घटना असल्याचे सांगत शोक संदेशाव्दारे भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
सीबीडी अग्निशमन केंद्रात अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी महापालिका प्रशासनाच्या वतीने श्रध्दांजली व्यक्त करतांना महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील एक अत्यंत कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर अधिकारी आपण गमावल्याची खंत व्यक्त केली. केवळ नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दुर्घटनांमध्येच नव्हे तर महानगरपालिका क्षेत्राबाहेरही जेव्हा जेव्हा आपत्तीप्रसंगी मदतकार्याची गरज भासते तेव्हा तेव्हा आपले अग्निशमन दल मदतीसाठी धावून जाते असे सांगत श्रीम. सुजाता ढोले यांनी अशाप्रकारे मदत कार्यासाठी नेहमीच पुढाकार घेणा-या श्री. शिवराम ढुमणे यांचा कर्तव्य बजावण्यासाठी जात असताना दुर्दैवीरित्या झालेला मृत्यू दु:खदायक असल्याचे सांगत त्यांना व ईर्शाळवाडी दुर्घटनेत प्राणहानी झालेल्या दुर्दैवी मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, अग्निशमन विभागप्रमुख तथा अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, आपत्ती व्यवस्थापन उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परिवहन व्यवस्थापक श्री. योगेश कडुसकर, क्रीडा विभागाच्या उपआयुक्त श्रीम. मंगला माळवे, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, सहा. संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकाण, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. पुरूषोत्तम जाधव व इतर अधिका-यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. अग्निशमन दलाच्या वतीने अग्निशामक श्री. महादेव गावडे यांनीही श्रध्दांजलीपर शोक व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने महापालिका अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, अग्निशमन दलातील अधिकारी – कर्मचारी, नातेवाईक, नागरिक उपस्थित होते.
8 जुलै 1996 रोजी सिडको अग्निशमन दलात फायरमन या पदावर रुजू झालेले श्री. शिवराम यशवंत ढुमणे यांनी आपल्या कामातून मदतकार्यासाठी नेहमीच तत्पर असणारा अग्निशमन जवान म्हणून आपली ओळख निर्माण केली. एप्रिल 1999 मध्ये सिडकोकडून नवी मुंबई महानगरपालिकेकडे अग्निशमन सेवा हस्तांतरित झाल्यानंतर श्री. शिवराम ढुमणे नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलात रुजू झाले. सन 2010 पासून ते सहा. केंद्र अधिकारी पदावर कार्यरत होते. सध्या ते अग्निशमन केंद्र सीबीडी बेलापूर येथे कार्यरत होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वांशी मिळून मिसळून वागणारा एक कर्तव्यदक्ष अधिकारी हरपल्याबद्दल समाजाच्या सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मूळ गावी वरची खोपोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
Published on : 20-07-2023 14:32:13,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update