नमुंमपा आपत्ती मदतकार्य यंत्रणेला नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे सतर्कतेचे आदेश


मागील तीन दिवसात संततधार पर्जन्यवृष्टीतही नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार सतर्कता दाखवित नवी मुंबईतील परिस्थिती व जनजीवन सुरळीत राहील याची संपूर्ण दक्षता घेण्यात आली आहे. स्वत: आयुक्त महोदय सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याने व सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत असल्याने महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा दक्षतेने कार्यरत आहे. अधिकारी, कर्मचारी यांनी आपले मोबाईल 24 तास कार्यरत राहतील याची काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देशित करीत त्यादृष्टीने चार्जींगची काळजी घेण्याचेही आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.
17 तारखेला सकाळी 8.30 वाजल्यापासून 18 तारखेला सकाळी 8.30 पर्यंत 88.20 मि.मि., 18 तारखेला सकाळी 8.30 वाजल्यापासून 19 तारखेला सकाळी 8.30 पर्यंत 45.83 मि.मि. आणि 19 तारखेला सकाळी 8.30 वाजल्यापासून 20 तारखेला सकाळी 8.30 पर्यंत 141.10 मि.मि. इतक्या मोठया प्रमाणावर तीन दिवसात 275.13 मि.मि. पर्जन्यवृष्टीची नोंद झालेली आहे.
काल 19 जुलै रोजी पहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाल्याचे लक्षात घेत आयुक्तांनी सर्व यंत्रणांना दक्ष राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अतिरिक्त् आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी स्वत: आपत्ती व्यवस्थापन उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्यासमवेत दिघ्यापासून बेलापूरपर्यंत संपूर्ण महापालिका क्षेत्राचा प्रत्यक्ष पाहणी दौरा करत सर्व यंत्रणांना कार्यान्वित केले. विशेषत्वाने पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणांना भेटी देत त्याठिकाणी पाणी उपसा पंपाची संख्या वाढविण्यात आली. तसेच विभागीय आपत्ती नियंत्रण कक्षांना मदतकार्य करण्यासाठी कृतीशील करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेची मदतकार्य पथके इर्शाळवाडीत कार्यरत – आयुक्त श्री. राजेश नार्वेकरही इर्शाळवाडीत
19 जुलै रोजी मध्यरात्री रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे झालेल्या भूस्खलन दुर्घटनेच्या ठिकाणी मदतीसाठी तत्परतेने नवी मुंबई महानगरपालिकेची अग्निशमन सेवा व मदतकार्य पथके आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या आदेशानुसार रात्रीच उपलब्ध करुन देण्यात आली. यामध्ये 2 अधिकारी व 5 कर्मचारी यांचे नियंत्रण पथक, अग्निशमन विभागाची 4 रेस्क्यू टेंडर वाहने व जीप, 10 रुग्णवाहिका व त्यासोबत वैदयकीय पथके, 4 शोधकार्य व बचतपथके तसेच 50 कामगारांचे आवश्यक साहित्यासह मदतकार्य पथक तातडीने रात्रीच उपलब्ध् करुन देण्यात आले.
त्यानंतरही सकाळी 50 स्ट्रेचर आणि 50 हून अधिक फ्ल्युइड ॲब्सॉर्बन्ट बॉडी कव्हर बॅग, 5 रेस्क्यू किट व 50 सफाई कर्मचा-यांचे आणखी एक मदतकार्य पथक नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करुन देण्यात आले. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात बिस्किटीचे पु़डे व बिसलेरी बॉटल्सही उपलब्ध करून देण्यात आल्या. शिवाय स्वत: नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनीही शहर अभियंता श्री. संजय देसाई व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्यासमवेत घटनास्थळी भेट देत मदतकार्यात सहभाग घेतला.
हे मदतकार्य करण्यासाठी रात्री या दुर्गम घटनास्थळी चालत जात असताना नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलातील सहाय्यक केंद्र अधिकारी श्री. शिवराम यशवंत ढुमणे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले. त्यांना महानगरपालिकेच्या वतीने सीबीडी अग्निशमन केंद्रात सलामी देऊन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
पावसाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन नमुंमपा यंत्रणा सतर्क
आज सकाळपासून पावसाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी महानगरपालिकेसह सर्व प्राधिकरणांच्या यंत्रणांना सतर्क करीत दक्ष राहण्याचे निर्देश दिले. त्यामध्ये विशेषत्वाने अतिवृष्टीच्या वेळी भरतीची वेळ असल्यास अतिसखल भागात पाणी साचण्याचा धोका लक्षात घेऊन विशेष दक्षता घेण्याचे यंत्रणांना निर्देश दिले. याशिवाय बंद दगडखाणी व डोंगराळ भाग अशा ठिकाणी भूस्खलनाची शक्यता लक्षात घेऊन तेथे विशेष काळजी घेण्याचे निर्देशित केले.
मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतीमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या तसेच त्याठिकाणी रहिवास बंद अशा खुणा दर्शविणारी पट्टी लावण्याच्या अथवा बॅरेकेटींग करण्याच्या सूचना देण्यात आल्या. स्थलांतरित नागरिकांना तात्पुरत्या स्वरुपात हलविण्यासाठी निश्चित करुन ठेवलेली संक्रमण ठिकाणे सुस्थितीत आहेत याची पाहणी करण्याच्या तसेच त्याठिकाणी आवश्यक अन्नधान्य साठा व गॅस सिलेंडर, शेगडी यांचीही व्यवस्था करुन ठेवण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले.
यासोबतच पावसाचे पाणी वाहून जाण्यास कच-यामुळे अडथळा येऊ नये याचीही दक्षता घेण्याचे सूचित करण्यात आले. याशिवाय जोरदार वा-यामुळे झाडे व झाडाच्या मोठया फांदया उन्मळून पडण्याचे प्रकार मोठया प्रमाणात घडत असल्याने अशा फांदया तत्परतेने हटवून रस्ता रहदारीला मोकळा होईल याकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले. लहान मुले पावसाच्या पाण्यात खेळण्यासाठी घराबाहेर पडल्याने कोणत्याही दुर्घटना होऊ नयेत याकरिता दक्षता घेण्याच्या सूचनाही परिसरामध्ये प्रसारित करण्यात याव्यात असे आयुक्तांनी सूचित केले आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा दक्षतेने कृतीशील आहे.
आज 20 जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजल्यापासून सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत बेलापूर विभागात 20.80 मि.मि., नेरूळ विभागात 39.20 मि.मि., वाशी विभागात 34.80 मि.मि., कोपरखैरणे विभागात 34.00 मि.मि., ऐरोली विभागात 27.80 मि.मि. व दिघा विभागात 21.00 मि.मि. अशाप्रकारे संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात सरासरी 29.60 मि.मि. इतक्या पावसाची नोंद झालेली आहे.
मा. पालकमंत्री महोदय यांनीही घेतला पर्जन्यस्थिती व परिस्थितीचा आढावा
तीन दिवसाच्या अतिवृष्टीमध्ये ठाणे जिल्हयातील परिस्थितीचा आढावा महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. श्री. शंभूराज देसाई यांनी वेबसंवादाव्दारे घेतला. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील परिस्थितीची तसेच महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली.
नवी मुंबई महानगरपालिका पावसाळा कालावधीत नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरिता दक्ष असून नवी मुंबईकर नागरिकांनी कोणत्याही प्रकारची अडचण जाणवल्यास महापालिका मुख्यालयातील मध्यवर्ती नियंत्रण केंद्राशी 1800222309 / 1800222310 या टोल फ्री क्रमांकावर अथवा 022– 27567060 /7061 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 20-07-2023 14:41:38,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update