इर्शाळवाडीतील आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचा पुढाकार
20 जुलै रोजी मध्यरात्री इर्शाळवाडीतील घडलेल्या भूस्खलन दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्वरित नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेची अग्निशमन, आरोग्य व आपत्ती मदतकार्य पथके इर्शाळवाडीकडे मध्यरात्रीच रवाना झाली. सतत 4 दिवस चाललेल्या या मदतकार्यात एनडीआरएफच्या जवानांसोबत विविध शासकीय, स्वयंसेवी संस्थांच्या मदतकार्य पथकांसोबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदतकार्य पथकांनीही सक्रिय सहभाग घेतला. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय राखून आपद्ग्रस्तांसाठी जीवनाश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
दिनांक 20 जुलै रोजी 100 तसेच 21, 22 आणि 23 जुलै रोजी प्रत्येकी 50 अशी 250 हून अधिक नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छताकर्मींची मदत कार्यपथके दररोज 5 – 6 कर्मचा-यांसह एनडीआरएफच्या सूचनांनुसार त्याठिकाणी अथक कार्यरत होती.
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ज्या ज्या सूचना प्राप्त होतील त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक ते साहित्य आपद्ग्रस्तांसाठी उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीम.सुजाता ढोले व आपत्ती व्यवस्थापन उपायुक्त तथा इर्शाळगड मदतकार्यासाठी नियुक्त नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांना सुरूवातीलाच दिले होते. त्यानुसार पहिल्या दिवसापासूनच विविध प्रकारचे आवश्यक साहित्य घटनास्थळी उपलब्ध करून देण्यात आले.
यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपत्तीत सर्व असले - नसलेले नष्ट झालेल्या आपद्ग्रस्तांकरिता सर्व प्रकारच्या कपड्यांची व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नवी मुंबई महानगरपालिकेस सुचविण्यात आले. त्यांच्यामार्फत आपद्ग्रस्त व्यक्तीचे नाव व वय याची कुटुंबनिहाय यादी महानगरपालिकेस उपलब्ध करून देण्यात आली. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक व्यक्तीच्या वयानुसार त्याला आवश्यक असणारे अंतर्वस्त्रांसह सर्व प्रकारचे कपडे, टॉवेल, रूमाल यांची कुटुंबनिहाय कीट तयार करून ते किट्स रविवारीच 42 आपद्ग्रस्त कुटुंबांना वितरित करण्यात आले.
आपद्ग्रस्तांसाठी अनेकांकडून विविध साहित्य रूपात मदतीचा ओघ सुरू असून ही मदत देताना आपद्ग्रस्तांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी प्राधान्याने दिल्या गेल्या पाहिजेत याची काळजी घेतली गेली पाहिजे. या आपद्ग्रस्तांना आवश्यक गोष्टी देताना रायगड जिल्हा उपजिल्हाधिकारी तथा प्रांत यांच्याकडून त्यांना आवश्यक साहित्याची मागणी जाणून घेऊन त्यानुसार साहित्य उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने आवश्यक साहित्यपूर्ती करताना ही प्रक्रिया अवलंबिलेली आहे. त्यामुळे आवश्यक ते साहित्य आपद्ग्रस्तापर्यंत पोहोचत आहे.
याशिवाय नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार आपद्ग्रस्तांशी थेट संवाद साधून त्यांना आवश्यक असणाऱ्या आणखी काही गोष्टींचीही माहिती महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत घेतली जात असून त्यानुसार आज आपद्ग्रस्त व्यक्तीना योग्य नंबरच्या चपला उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
20 जुलै रोजी मध्यरात्री इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी तातडीने आदेश देत नवी मुंबई महानगरपालिकेची अग्निशमन वाहनांसह यंत्रणा तसेच रुग्णवाहिका व आपत्ती मदतकार्य पथके इर्शाळवाडीकडे रवाना केली. यामध्ये अग्निशमन विभागाचे 4 रेस्क्यू टेंडर हे नियंत्रणासाठी 2 अधिकारी आणि 5 कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले.
त्यांच्यासमवेत 10 रुग्णवाहिका आणि आवश्यक वैद्यकीय समूहही उपलब्ध होता. यासोबतच 50 स्वच्छताकर्मींचे आवश्यक साहित्यासह मदतकार्य पथकही पहाटे दीड वाजता घटनास्थळी दाखल झाले. त्यासोबत 4 शोध व बचाव पथकेही होती. त्याचप्रमाणे 50 स्ट्रेचर व 100 फ्ल्युईड अॅब्सॉर्बन्ट बॉडी कव्हर बॅग आणि 5 रेस्क्यू किटही त्या ठिकाणी पाठवण्यात आले. मदतकार्यासाठी जाताना नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन विभागाचे सहाय्यक केंद्र अधिकारी श्री. यशवंत ढुमणे यांचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू झाला.
त्यादिवशीच आधीच्या 50 स्वच्छताकर्मींमध्ये अधिक भर घालत सकाळी 9 वाजेपर्यंत आणखी 50 स्वच्छताकर्मी स्वच्छता निरीक्षक अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मदत कार्यास सुरुवात केली. प्रत्येक मदतकार्य पथकासोबत इतरही मदत कार्य करणाऱ्या व्यक्तींची जाणीव ठेवून सर्वांसाठी पुरेशा प्रमाणात बिसलेरी बॉटल्स आणि बिस्कीट पुडे यांची व्यवस्था करण्यात आली होती.
सकाळची मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापनाची बैठक झाल्यानंतर लगेचच महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी शहर अभियंता श्री. संजय देसाई व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्यासह इर्शाळवाडीकडे धाव घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदतकार्य पथकांना मार्गदर्शन केले.
त्या ठिकाणी चाललेल्या मदत कार्यासाठी एका जनसेटसह 25 छोट्या आणि 25 मोठ्या बॅटऱ्यांचा पुरवठा करण्यात आला. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी 21 जुलै रोजीही सकाळी 7 वाजता 5 स्वच्छता निरीक्षकांसह 50 स्वच्छताकर्मींचे मदत कार्यपथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासमवेत 400 ब्लँकेट, 400 बेडशीट, 2 हजार चिवडा पाकीटे, 3 हजार बिस्कीट पुडे व 1 लिटरच्या 1000 बिसलेरी बॉटल्स पाठवण्यात आल्या.
अशाच प्रकारे 22 व 23 जुलै रोजीही प्रत्येक दिवशी 50 स्वच्छताकर्मींचे पथक 3 स्वच्छता निरीक्षकांसह मदतकार्यात सहभागी झाले. केवळ महानगरपालिका क्षेत्रातच नव्हे तर राज्यातील इतरही आपत्कालीन प्रसंगात नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच मदतकार्य करण्यात आघाडीवर राहिलेली आहे. ईर्शाळवाडी दुर्घटनेतील आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठीही आवश्यक ती मदत करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा असे निर्देश महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागास दिले आहेत.
Published on : 24-07-2023 14:34:35,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update