अतिरिक्त आयुक्त डॉ.अमरीश पटनिगीरे यांच्यासह १२ अधिकारी, कर्मचारी यांचा सेवानिवृत्तीप्रसंगी सन्मान
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेचा दीर्घ अनुभव असणारे अधिकारी, कर्मचारी महानगरपालिकेतून सेवानिवृत्त होत असताना ही एक प्रकारे महानगरपालिकेची हानी असल्याचे मत व्यक्त करीत नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जुलै महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्या सेवानिवृत्त समारंभनिमित्त महापालिका मुख्यालयातील अॅम्फिथिएटर येथे आयोजित विशेष समारंभ प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
जुलै महिन्यात महानगरपालिका सेवेतून निवृत्त होणारे अधिकारी अतिरिक्त आयुक्त डॉ. अमरीश पटनिगीरे, मुख्य शल्य चिकित्सक डॉ. हर्षद लोहार, अपघात वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय आठवले, प्र. मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनवणे, प्रशासकीय अधिकारी श्री. मोहन जाधव, सिस्टर इन्चार्ज श्रीम. चित्रा महाजन, स्टाफ नर्स श्रीम. सविता कणसे, आरोग्य सहाय्यक श्रीम. मेघा चव्हाण, वाहन चालक श्री. रमेश जमखंडी, आया श्रीम. पुष्पा साळवे व श्रीम. पुष्पलता भोई या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तसेच स्वेच्छानिवृत्ती घेणारे उप अभियंता (यांत्रिकी) श्री. जयवंत आहेर यांना महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, सेवानिवृत्त होणारे अतिरिक्त आयुक्त डॉ. अमरीश पटनिगीरे, नगरपरिषद प्रशासन संचालनालयचे सह आयुक्त तथा माजी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, शहर अभियंता श्री. संजय देसाई व प्रशासन विभागाचे उपायुक्त श्री. शरद पवार व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विभागप्रमुख डॉ. संजय पत्तीवार, श्री. जगन्नाथ सिन्नरकर, श्री. मोहन डगावकर, श्री. सुरेंद्र पाटील, श्री प्रकाश कुलकर्णी, श्री. दादासाहेब चाबुकस्वार, श्री. देशपांडे, श्री. अशोक मढवी आवर्जून उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी अद्ययावत ज्ञान आणि नवीन शिकण्याची आस असणारे अधिकारी अशा शब्दात डाॅ. अमरीश पटनिगीरे यांचा उल्लेख केला. महानगरपालिकेच्या अनेक विभागांमध्ये उत्तम कामगिरी केलेले पटनिगीरे विविध इम्पॉसिबल मिशन पॉसिबल करणारे मिशन मॅन असल्याचे आयुक्तांनी म्हटले. पटनिगीरे यांच्या कायदेविषयक सखोल ज्ञानाचा उपयोग यापुढील काळात नवी मुंबई महानगरपालिकेच्या नवीन कर्मचारीवृंदाला कार्यालयीन कामकाजाची माहिती व ज्ञान देण्यासाठी होईल असेही आयुक्त म्हणाले. महापालिका सेवेतून सेवानिवृत्त होणारे डॉ. लोहार व डॉ. आठवले तसेच मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे, प्रशासकीय अधिकारी श्री. मोहन जाधव आणि सेवानिवृत्त होणारे प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आजवरच्या नावलौकिकात व यशात मौलिक योगदान दिले असल्याचे आयुक्तांनी विशेषत्वाने नमूद केले.
यावेळी शहर अभियंता श्री संजय देसाई, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, विधी अधिकारी श्री. अभय जाधव, माजी अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय पत्तीवार, प्रशासन विभागाचे माजी उपायुक्त श्री. जगन्नाथ सिन्नरकर, माजी शहर अभियंता श्री मोहन डगावकर, माजी उपायुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांनीही मनोगत व्यक्त करीत सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचारीवृंदाला शुभेच्छा दिल्या.
सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचारीवृंदाच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त करताना अतिरिक्त आयुक्त डॉ. अमरीश पटनिगीरे यांनी महापालिका सेवेतून निवृत्त झालो असलो तरी नवी मुंबई महानगरपालिका कुटुंबातून निवृत्त झालेलो नाही अशा शब्दात भावना व्यक्त करीत महानगरपालिका कर्मचाऱ्याला बढतीने मिळू शकते अशा सर्वोच्च अतिरिक्त आयुक्त पदावरून सेवानिवृत्त होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. महानगरपालिकेच्या आजवरच्या नावलौकिकप्राप्त वाटचालीबद्दल गौरवोद् गार काढताना डॉ. पटनिगीरे यांनी विविध आठवणींना उजाळा दिला. ग्रामपंचायतीतून थेट महानगरपालिकेत रूपांतरित झालेली देशातील एकमेव महानगरपालिका असल्यामुळे सुरुवातीच्या काळात आलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कशाप्रकारे नियोजनबद्ध कार्यवाही केली याच्या आठवणी सांगत त्यांनी आयुक्त व प्रशासक यांच्या कालावधीत केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामांचा आढावा घेतला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या नावातच नवी म्हणजे नाविन्य असल्याने येथील प्रत्येक गोष्ट ही वैशिष्ट्यपूर्ण असते असे सांगत त्यांनी भविष्यात महानगरपालिका आणखी यशाची शिखरे पार करेल असा विश्वास व्यक्त केला.
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील अॅम्फिथिएटर येथील सेवानिवृत्ती समारंभप्रसंगी अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Published on : 01-08-2023 14:15:08,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update