अण्णा भाऊ साठे हे तत्वशील, विचारशील, कृतीशील साहित्यरत्न – लेखक डॉ. सोमनाथ कदम
अण्णा भाऊंनी सामान्य माणसाच्या आयुष्याला स्पर्श करणारे जीवनस्पर्शी साहित्य लिहिले, त्यामुळे अण्णा भाऊंचे मानवतावादी साहित्य हे जागतिक दर्जाचे ठरले आणि ‘साहित्यरत्न’ या उपाधीने सन्मानित झाले असे सांगत सुप्रसिद्ध साहित्यिक व्याख्याते डॉ. सोमनाथ कदम यांनी कथा, कादंबऱ्या, शाहिरी कवने, लोकगीते, लोकनाट्य अशा वैविध्यपूर्ण साहित्यकृतींतून माणसाचे माणूसपण जागवणाऱ्या अण्णा भाऊंच्या साहित्याचा विविध उदाहरणे देत सविस्तर आढावा घेतला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात विचारवेध या व्याख्यान शृंखलेंतर्गत आयोजित साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य व समाज या विषयावर महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र साधने समितीचे सदस्य तथा अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य व तत्वज्ञान अशा अनेक पुस्तकांचे लेखक, वक्ते डॉ. सोमनाथ कदम यांनी अण्णा भाऊंच्या समाजस्पर्शी सर्वव्यापी साहित्याचा विस्तृत पट खुला केला.
नवी मुंबई महानगरपालिकेने उभे केलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे वरील बाजूस ध्यानकेंद्र आणि खालील बाजूस ज्ञानकेंद्र असे सर्वार्थाने ज्ञानस्मारक असल्याचे सांगत डॉ. सोमनाथ कदम यांनी जगातील बाबासाहेबांच्या सर्वोत्कृष्ट स्मारकांपैकी हे एक असल्याचे सांगितले. येथील समृद्ध ग्रंथालय व त्याची मांडणी आणि आधुनिक ऑडिओ व्हिज्युअल सुविधा पाहून भारावून गेल्याचे सांगत अभ्यासकांना आणि युवकांना बाबासाहेबांचे विचार समजून घेण्यासाठी ही एक पर्वणी असल्याचेही ते म्हणाले.
समाजाला विचारप्रणव बनवण्याची भूमिका घेऊन लिहिणारे साहित्यिक ही अण्णा भाऊंची खरी ओळख असल्याचे अधोरेखित करीत डॉ. सोमनाथ कदम यांनी श्रमिकांचे, स्त्रियांचे, शोषितांचे जगणे अण्णा भाऊंनी साहित्यातून साकारले व आपल्या साहित्यकृतीतून महामानवांच्या चळवळीचा वारसा पुढे नेला हे वेगळेपण ठशठशीपणे मांडले.
वंचितांच्या चळवळीला बळ देणारे सुधारणावादी साहित्यिक असणारे अण्णा भाऊ आपल्या साहित्यातून दैववादाला, अंधश्रद्धेला नकार देतात आणि व्यवस्था परिवर्तनाचा ध्यास घेत जाती, धर्मापेक्षा माणूस श्रेष्ठ असतो हे तत्त्वज्ञान मांडतात. अन्यायाने व गुलामगिरीने पिडलेल्या गावगाड्यातील सामान्य माणसाच्या मनामनात स्वाभिमान पेरणारे अण्णा भाऊ हे संविधानिक मूल्याचा आग्रह धरणारे व आपल्या लेखणीचा चळवळीचे हत्यार म्हणून वापर करणारे साहित्यिक, कलावंत आणि कार्यकर्ते होते असेही डॉ. सोमनाथ कदम यांनी विविध कथा, लोकगीते यांची उदाहरणे देत स्पष्ट केले.
अण्णा भाऊंच्या सोन्याचा मणी, विठू महार, कोंबडीचोर अशा विविध कथांची उदाहरणे देत डॉ. सोमनाथ कदम यांनी अण्णा भाऊंच्या लेखनातील सर्वात्मक विचार सुटे सुटे करीत सहजपणे उलगडून दाखविले. मुंबई कोणाची? हे लोकगीत, माझी मैना गावाकडे राहिली सारखी छक्कड, मुंबईची लावणी, शिवारी चला अशा विविध गीतांमधील गर्भित अर्थ डॉ. सोमनाथ कदम यांनी सोपे करून सांगितले.
अण्णा भाऊंच्या जीवनाचे व त्यांनी साकारलेल्या साहित्याचे 3 कालखंड सांगताना 1920 ते 42 हा अण्णा भाऊंचा कामगार जीवनाशी संबंध आला असा पहिला कालखंड, सन 1942 ते 56 हा स्वातंत्र्यलढ्याचा, स्वातंत्र्यसैनिकांचा दुसरा कालखंड तसेच 1956 ते 1969 हा आंबेडकरमयी विचारांनी व जाणिवांनी भारलेला तिसरा कालखंड असे तीन टप्पे सांगत डॉ. सोमनाथ कदम यांनी बाबासाहेब गेल्यानंतर जग बदल घालूनी घाव या अण्णा भाऊंच्या साहित्याचा कळस असणाऱ्या कवनातून अण्णा भाऊंनी आंबेडकरी विचार मांडत चळवळीला दिशा दिली हे गीतातील चारही कडव्यांचे अर्थ समजून सांगत उलगडून दाखवले.
‘जग बदल…’ मध्ये शेवटी अण्णा भाऊंनी बिनी मारायची अजून राहिली असे लिहिले असताना काही लोक हे सादर करताना वेणी माळायची अजून राहिली असे सादर करतात. मूळ रचनेतील हा विडंबनात्मक बदल अण्णा भाऊंना अभिप्रेत असलेला चळवळीचा अर्थ मारणारा असल्याचे स्पष्ट करीत डॉ. सोमनाथ कदम यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
अण्णा भाऊंचे साहित्य म्हणजे क्रांतीसाठी आसुसलेल्या माणसाचे साहित्य असे विविध उदाहरणे देत स्पष्ट करीत डॉ. सोमनाथ कदम यांनी या महामानवांचे विचारच समाजाला योग्य दिशेने नेऊ शकतात असे ठामपणे सांगितले.
ज्ञानस्मारक म्हणून ओळख दृढ होत असल्याबद्दल आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला आनंद
याप्रसंगी बोलताना नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची ओळख आता सर्वत्र ज्ञानस्मारक म्हणून होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करीत विविध मान्यवरांच्या व्याख्यानांतून महामानवांच्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करण्याचा प्रयत्न विचारवेध या व्याख्यानशृंखलेंतर्गत महानगरपालिका करीत असल्याचे सांगितले. आपल्या अजरामर साहित्यकृतींतून व कार्यातून समाजाला नवी दिशा देणारे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना वैचारिक अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविल्याबद्दल श्रोत्यांचे आभार व्यक्त करीत आयुक्तांनी या व्याख्यानांना श्रोत्यांचा मिळणारा उदंड प्रतिसाद हा उत्साह वाढवणारा असल्याचे मत व्यक्त केले.
Published on : 02-08-2023 10:21:31,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update