नमुंमपा मुख्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन
स्वातंत्र्यपूर्व काळात प्रतिसरकारच्या अर्थात बोलीभाषेतील पत्रीसरकारच्या माध्यमातून ब्रिटीश सत्तेला सळो की पळो करून सोडणारे स्वातंत्र्यलढ्यातील सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे प्रशासन विभागाचे उपायुक्त श्री. शरद पवार यांच्या शुभहस्ते प्रतिमेस पुष्पमालिका अपर्ण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी श्री. उत्तम खरात व श्री. संजीव पवार, अधिक्षक श्री. प्रशांत नेरकर आणि इतर नमुंमपा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
क्रांतीसिंह नाना पाटील यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी 1930 साली घर सोडले आणि सविनय कायदेभंग चळवळीत झोकून दिले. गावागावातील लोकांना स्वातंत्र्यांची जाणीव व्हावी या कळकळीने त्यांनी जनजागृतीचा वसा घेतला आणि लोकांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनात त्यांनी महत्वाची कामगिरी केली.
या आंदोलनादरम्यानच ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आपले स्वत:चे व हक्काचे वेगळे सरकार असावे हा विचार त्यांच्या मनात रूजला आणि बोलीभाषेत पत्रीसरकार म्हणून संबोधल्या जाणा-या प्रतिसरकारचा उदय झाला. ‘आपुला आपण करु कारभार’ हे धोरण नजरेसमोर ठेवत पत्रीसरकारने लोकन्यायालय, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था अशी अनेक लोकोपयोगी कामे केली. गावागावांमध्ये स्वतंत्र फौज उभी केली. 1942 पर्यंत आठ
वेळा तुरूंगवास भोगणारे नाना पाटील नंतर भूमिगत चळवळीत सहभागी झाले आणि क्रांतीचा एल्गार घुमवित राहिले.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी महत्वाची कामगिरी केली. लोकसभेत खासदार म्हणूनही त्यांची कारकीर्द गाजली. शिक्षण प्रसार, ग्रंथालय स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती असे समाजसुधारणेचे भरीव कार्य त्यांनी केले. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचे स्मरण करीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांस अभिवादन करण्यात आले.
Published on : 03-08-2023 10:35:28,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update