जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त डॉ अभिजीत म्हापणकर यांची नमुंमपा मार्फत फेसबुक लाईव्ह जनजागृती

1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात येत असून यानिमित्त बाळाच्या सर्वांगीण वाढीसाठी स्तनपानाचे महत्व महिलांना वेगवेगळ्या माध्यमांतून पटवून दिले जात आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
यावर्षी जागतिक स्तनपान सप्ताहाचे घोषवाक्य ‘स्तनपानाचे सक्षमीकरण : नोकरदार पालकांसाठी एक बदल (Enabling Breasfeeding : Making Diffrence for Working Parents)’ हे असून त्याविषयी जनजागृती होण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सुप्रसिध्द बालरोग तज्ज्ञ व नवजात अर्भकतज्ज्ञ डॉ. अभिजीत म्हापणकर यांच्या फेसबुक लाईव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये त्यांनी स्तनपानाचे महत्व विशद करीत मातांनी स्तनपान करताना कोणती काळजी घ्यावी या विषयी महत्वाची माहिती दिली.
जागतिक स्तनपान सप्ताहात घोषवाक्याच्या अनुषंगाने प्रामुख्याने नोकरदार महिलांसाठी सूचना करताना डॉ. म्हापणकर यांनी महिलांनी स्वत:चा हक्क बजावून प्रसुती रजा घेण्याचा प्रयत्न करावा व जास्तीत जास्त वेळ बाळासोबत राहण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले. त्यापुढील कालावधीतही शक्य झाल्यास पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ वर्क फ्रॉम होम करावे असेही ते म्हणाले. काही कारणास्तव कामावर रूजू व्हावे लागल्यास सकाळी कामावर निघण्यापूर्वी व कामावरून आल्यानंतर लगेच स्वच्छ होऊन बाळाला स्तनपान करावे असे त्यांनी सांगितले.
दूध तयार करण्यासाठी आवश्यक असलेला प्रोलॅक्टिन हार्मोन्स रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणात स्त्रवतो, त्यामुळे रात्रीच्या वेळी जास्तीत जास्त् वेळा स्तनपान करण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले. प्रसुती झालेल्या महिलांनी घरी नसतांना अंगावरील दूध स्वच्छ स्टीलच्या भांडयात काढून जतन करावे. दूध काढल्यानंतर त्या भांडयावर तारीख व वेळ नमूद करून ठेवावी. साधारण तापमानाला दूध 4 ते 6 तास बाहेर ठेवता येऊ शकते, फ्रीजमध्ये 12 तास तसेच फ्रीजरमध्ये जास्तीत जास्त 7 दिवस ठेवता येऊ शकते अशीही माहिती त्यांनी दिली. फ्रीजमध्ये ठेवलेले दूध बाळाला पाजण्यापूर्वी काही काळ सामान्य तापमानाला ठेवून ते साधारण तापमानाला आले की वाटी चमच्याने बाळाला पाजता येऊ शकते अशी माहिती त्यांनी दिली.
अशा विविध प्रकारची महत्वाची माहिती देत असताना त्यांनी नोकरदार महिलांसमोर येणा-या अडचणी लक्षात घेऊन काही मौल्यवान व फायदेशीर सूचना केल्या. पीपीटीच्या माध्यमातूनही सादरीकरण करत त्यांनी स्तनपान करताना कोणती काळजी घ्यावी या विषयी टिप्स दिल्या. यावेळी फेसबुक लाईव्हवरुन व्याख्यानाचा अनुभव घेणा-या महिलांमार्फत विविध शंका विचारण्यात आल्या त्या सर्वांची समाधानकारक उत्तरे देत डॉ. अभिजीत म्हापणकर यांनी त्यांचे शंका निरसन केले.
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित नमुंमपा आरोग्य विभागाच्या वतीने आणखी एका विशेष फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे 8 ऑगस्ट 2023 रोजी आयोजन करण्यात आले असून स्तनपानाचे महत्व या विषयावर, सायं. 4 वाजता डॉ सुचेता किजवडेकर श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम नवी मुंबई महानगरपालिकेच्या https:/www.facebook.com/NMMConline या फेसबुक पेजवर भेट देऊन विनामूल्य अनुभवता येऊ शकतो. अशाप्रकारे महिलांच्या या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 04-08-2023 14:13:17,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update