स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. सुचेता किंजवडेकर यांनी ऑनलाइन संवादात दिले सुयोग्य स्तनपानाचे धडे
9 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेचा काळ व त्यानंतर बाळंतपणाच्या कळा या सगळ्यांतून बाहेर पडल्यानंतर कुठल्याही आई बनलेल्या महिलेच्या आयुष्यात बाळाचे पहिले स्तनपान हा अत्युच्च आनंदाचा क्षण असतो. बाळ जेव्हा स्तनपानास सुरुवात करते तेव्हा हॅप्पी हार्मोन म्हणून संबोधल्या जाणाऱ्या प्रोलाक्टीन नामक हार्मोनची निर्मिती होती. या कालावधीत मातेचा आत्मविश्वास वाढविण्याकरता स्तनपानाचे कौशल्य प्रसूतीपूर्वकाळात मातेला शिकवणे गरजेचे आहे अशी माहिती देत जागतिक स्तनपान दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित फेसबुक लाईव्हद्वारे सहभागी झालेल्या महिलांशी सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुचेता किंजवडेकर यांनी ऑनलाईन थेट संवाद साधला.
1 ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत संपूर्ण जगभरात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. यानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनेही सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. अभिजीत म्हापणकर आणि नामांकित स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुचिता किंजवडेकर यांची स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित करणारी व्याख्याने फेसबुक लाईव्हद्वारे आयोजित करण्यात आली होती.
यावर्षी जागतिक स्तनपान सप्ताहाचे घोषवाक्य 'स्तनपानाचे सक्षमीकरण : नोकरदार पालकांसाठी एक बदल (Enabling Breast feeding : Making Difference for Working Parents)' हे असून त्याविषयी व्यापक जनजागृती होण्याकरिता हे नोकरदार महिलांसाठी महत्त्वाचे असल्याचे लक्षात घेत ऑनलाईन व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ. सुचेता किंजवडेकर यांनी आपल्या संवादामध्ये नोकरदार महिलांनी शक्य असल्यास प्रसूतीपूर्व सुट्टी न घेता प्रसुतीनंतर सुट्टी घ्यावी जेणेकरून त्यांना आपल्या बाळासोबत अधिक वेळ राहता येते तसेच यामुळे स्तनपान चांगल्या रितीने होऊन बाळासोबत चांगल्या प्रकारे भावनिक जवळीक होते असा सल्ला दिला. नोकरदार महिलांसाठी गरजेची गोष्ट म्हणजे दूध काढून कशाप्रकारे जतन करावे याबाबत महत्त्वाची माहितीही त्यांनी दिली.
एखाद्या मातेला क्षयरोग अथवा एचआयव्ही असेल तरी स्तनपान करता येते अशी माहिती देत केवळ कॅन्सरची काही औषधे सुरू असतील तरच दूध पाजता येत नाही असे डॉ. सुचेता किंजवडेकर यांनी सांगितले. आईचे दूध हा बाळाचा हक्क असून मातेला त्रास असल्यास काही वेळा बाळाला बाहेरच्या दुधाची शिफारस केली जाते असे सांगत त्यांनी अतिजोखमीचे औषध देताना ज्याप्रमाणे दोन डॉक्टरांची सही असते त्याप्रमाणे बाहेरच्या दुधाची शिफारस करतानाही दोन डॉक्टरांची सही असणे आवश्यक असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी फेसबुक लाईव्हच्या ऑनलाईन संवादातून सहभागी महिलांनी त्यांच्या मनातील विविध शंका उपस्थित केल्या. त्या सर्वच शंकांवर डॉ. सुचेता किंजवडेकर यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
Published on : 14-08-2023 10:35:20,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update