नवी मुंबई महानगरपालिकेची ओळख 'स्वच्छ शहर' म्हणून देशभरात केली जात असून ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, तशीच जबाबदारी वाढवणारीही गोष्ट आहे. आता नवी मुंबई हा स्वच्छतेचा ब्रँड झाला असून यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांसह आपले स्वच्छताकर्मी, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे तसेच उत्साही नागरिक यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगत नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी आपण रहात असलेल्या इमारतीच्या दोन्ही बाजूच्या दोन इमारती आणि आपल्या परिसरातील स्वच्छतेवर काटेकोर लक्ष द्यावे व शहर स्वच्छतेत सक्रिय सहभागी होत 'स्वच्छतेला योगदान देणारा कर्मचारी' व्हावे अशी नवी संकल्पना मांडली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'माझी माती माझा देश' अभियानात भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्ताने महापालिका मुख्यालयातील अॅम्फिथिएटर येथे 'स्वच्छ सर्वेक्षण 2023' अंतर्गत आयोजित 'स्वच्छतेची थ्री आर त्रिसूत्री' या विशेष कार्यक्रमामध्ये आयुक्त श्री राजेश नार्वेकर यांनी फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांशी थेट संवाद साधला.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ, घनकचरा व्यवस्थापन व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे विभागप्रमुख उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेचा नावलौकिक येथील अधिकारी, कर्मचारी यांनी उत्तम कामगिरी केल्यामुळे वाढला. चांगले काम केल्यामुळे सगळ्यांच्या अपेक्षाही वाढल्या. त्यामुळे आपली जबाबदारीही वाढली. ही जबाबदारी पेलण्यासाठी आपण सारे सक्षम आहोत याची जाणीव ठेवूनच आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या स्वच्छता कार्याची नोंद त्यांच्या सीआर मध्ये घेतली जाईल अशीही संकल्पना मांडली.
त्याचप्रमाणे स्वच्छता विषयक नवनवीन कामे करताना विविध प्रकारे विचार मंथन केले जाते, मात्र त्याच त्याच मंडळींनी विचार केल्याने त्यामध्ये तोचतोचपणा येण्याचा धोका लक्षात घेत यामध्ये काही नवीन संकल्पना मांडल्या जाव्यात याकरिता महानगरपालिका मुख्यालयातील तळमजल्यावर सूचनापेटी ठेवण्याचे आयुक्तांनी जाहीर केले. या सूचनापेटीत 30 ऑगस्टपर्यंत महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांनी तसेच नागरिकांनीही स्वच्छतेविषयी आपल्या काही नाविन्यपूर्ण संकल्पना मांडाव्यात अशीही एक वेगळी संकल्पना आयुक्तांनी यावेळी अभिव्यक्त केली.
कोणत्याही विधायक कामात उत्साहाने सहभागी होणारे नागरिक हे आपल्या शहराचे बलस्थान असल्याचे प्रामुख्याने नमूद करीत प्रत्येक नागरिकाने आपल्या दिनक्रमातील काही मिनिटे स्वच्छतेसाठी द्यावीत व घरापासूनच ३ प्रकारे कचरा वर्गीकरणासारख्या गोष्टींतून आपल्या स्वच्छतामित्रांवर पडणारा अतिरिक्त कामाचा भार आपल्या परीने हलका करावा असेही आवाहन आयुक्तांनी यावेळी केले.
शहरात कुठेही उभे राहून 'निश्चय केला' असे म्हटले की समोरून 'नंबर पहिला' असा प्रतिसाद मिळेल हे आपल्या नवी मुंबईचे वैशिष्ट्य असल्याचे सांगत आयुक्तांनी 'फिश फेड, ड्राय वेस्ट बँक, झिरो वेस्ट स्लम मॉडेल, मानवतेचे देणे घेणे ही ९२ थ्री आर सेंटर्स, थ्री आर ऑन व्हिल्स, रिसायकल मार्ट व रिसायकल बाजार, टर्शिअरी ट्रिटमेंट प्लांट' अशा विविध उपक्रमांविषयी माहिती देत यांची व्याप्ती यापुढील काळात वाढविणार असल्याचे सांगितले.
स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने विभागाविभागांमध्ये स्वच्छतेची निकोप स्पर्धा व्हावी याकरिता राबविण्यात येत असलेल्या 'स्वच्छ मंथन ३.०' या स्पर्धात्मक स्वच्छता उपक्रमात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विभागास देण्यात येणारा फिरता चषक बेलापूर विभागास आयुक्त महोदयांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. शशिकांत तांडेल, कार्यकारी अभियंता श्री अरविंद शिंदे यांनी आपल्या सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांसमवेत तो स्वीकारला.
यावेळी इर्शाळवाडी येथे आपत्ती प्रसंगात तत्पर मदतकार्य करणाऱ्या विविध पथकांना प्रतिनिधिक स्वरूपात सन्मानीत करण्यात आले. त्यापूर्वी इर्शाळवाडी दुर्घटनेत मदतकार्य करताना निधन झालेले नमुंमपा अग्निशमन विभागाचे सहाय्यक केंद्र अधिकारी शिवराम ढुमणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आपत्ती प्रसंगात धाडसाने मदतकार्य करणारे अग्निशमन अधिकारी श्री. पुरुषोत्तम जाधव व अग्निशमन विभागाचे सहकारी पथक, आपत्ती मदतकार्य व घनकचरा व्यवस्थापन समूह सहा. आयुक्त श्री. शशिकांत तांडेल आणि सहकारी पथक, तसेच डॉ. सोनल बंसल व समूह यांचे आरोग्य पथक यांचा प्रातिनिधीक सन्मान करण्यात आला.
त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र स्वच्छतेमध्ये योगदान देणाऱ्या १६ दैनंदिन समग्र साफसफाई कामातील पर्यवेक्षक आणि शौचालय सफाई कामातील पर्यवेक्षक यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आयोजित या विशेष कार्यक्रमात नमुंमपा शाळा क्र. ६, करावे येथील विद्यार्थी समुहाने राष्ट्रभक्तीपर समूहगीत तसेच दृष्टी अमोल मेचकर या गायिकेने देशभक्तीपर गीत सादर करून कार्यक्रमात स्वररंग मिसळला.
'सदैव स्वच्छ ठेवू आपला देश, माझी माती माझा देश' हा संदेश प्रसारित करणारे आरंभ क्रिएशनच्या कलावंतांनी सादर केलेले नृत्यनाट्य उपस्थितांची दाद मिळवून गेले.
भारत सरकारच्या आदेशानुसार स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू मुक्तीची सामूहिक शपथ यावेळी ग्रहण करण्यात आली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करताना घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी आयुक्त महोदयांनी स्वच्छता परीक्षणाविषयी अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करू असा विश्वास दिला. फेसबुक व यु ट्युब लाईव्हवरूनही अनेक नवी मुंबईकर नागरिकांनी हा कार्यक्रम अनुभवला.