आसाम राज्य शासनाच्या अभ्यासगटाने जाणून घेतली नमुंमपामार्फत चालणारी लोकसेवांची कार्यप्रणाली राज्य सेवा हक्क आयोगाचे कोकण विभागीय आयुक्त श्री. बलदेव सिंह यांनी व्यक्त केले नमुंमपा कार्यप्रणालीबद्दल समाधान
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना पुरविण्यात येणा-या विविध लोकसेवांचा आढावा घेताना महाराष्ट्र शासनाच्या राज्य सेवा हक्क आयोगाचे कोकण महसुली विभाग आयुक्त श्री. बलदेव सिंह यांनी समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे 51 लोकसेवांपैकी 28 लोकसेवा सद्यस्थितीत सद्यस्थितीत ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या जात असून त्यामध्ये वाढ करीत जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याविषयी तत्पर कार्यवाही करण्यात यावी अशाही सूचना त्यांनी दिल्या.
आसाम राज्य शासनाच्या प्रशासकीय सुधारणा व कार्मिक प्रशासन विभागाच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम – 2015 बाबत माहिती घेण्यासाठी आयोजित अभ्यास दौ-यांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास अभ्यासगटाने भेट देत लोकसेवा पुर्ततेबाबतची कार्यप्रणाली जाणून घेतली. याप्रसंगी उपस्थित राहत राज्य सेवा हक्क आयोगाचे कोकण महसुली विभागीय आयुक्त श्री. बलदेव सिंह यांनी उपस्थित राहत महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणारी लोकसेवा वितरण प्रणाली अभ्यास गटासमवेत बारकाईने जाणून घेतली आणि मौल्यवान सूचना केल्या.
याप्रसंगी आसाम राज्य शासनाच्या प्रशासकीय सुधारणा व कार्मिक प्रशासन विभागाच्या अतिरिक्त सचिव श्रीम. पांचाली ककाती तसेच उपसचिव श्रीम. मिताली लाहकर तसेच राज्य सेवा हक्क आयोगाचे कोकण महसुली विभाग सहसचिव श्री. माणिक दिवे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आयुक्तांच्या शुभहस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ, राज्य लोकसेवा हक्क प्रणालीचे नमुंमपा नोडल अधिकारी श्री. शरद पवार, शहर अभियंता श्री. संजय देसाई आणि इतर विभागप्रमुख उपस्थित होते.
या दौ-याप्रसंगी उपस्थितांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या विकास वाटचालीचा आढावा घेणारी ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली. त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त् श्रीम. सुजाता ढोले यांनी सादरीकरणाव्दारे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पुरविण्यात येणा-या 51 लोकसेवांबाबत सविस्तर माहिती दिली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सदयस्थितीत 51 लोकसेवा पुरविल्या जात असून त्यापैकी 28 लोकसेवा ऑनलाईन पुरविल्या जात आहेत. उर्वरित 23 ऑफलाईन दिल्या जाणा-या सेवाही लवकरच ऑनलाईन पुरविण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेकडे एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीत 51 लोकसेवांकरिता 49520 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 48759 अर्ज निकाली काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे लोकसेवा पूर्ततेची महानगरपालिकेची टक्केवारी 98 टक्के इतकी असून ती समाधानकारक आहे मात्र ती 100 टक्के करण्याकडे वाटचाल सुरु ठेवावी असे राज्य सेवा हक्क आयोगाचे कोकण महसुली विभागीय आयुक्त श्री. बलदेव सिंह यांनी सूचित केले. प्राप्त लोकसेवा अर्जांवर विहित कालावधीत 100 टक्के कार्यवाही करणा-या पदनिर्देशित अधिका-यास पारितोषिक दिले जाते अशी माहिती देत श्री.बलदेव सिंह यांनी यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या पदनिर्देशित अधिका-याचा या पारितोषिक प्राप्त अधिका-यामध्ये समावेश व्हावा अशा शुभेच्छा दिल्या.
आसम राज्य शासनाच्या प्रशासकीय सुधारणा व कार्मिक प्रशासन विभागाच्या अतिरिक्त सचिव श्रीम. पांचाली ककाती तसेच उप सचिव श्रीम. मिताली लाहकर यांनी यावेळी लोकसेवापूर्ततेविषयी विविध प्रश्न विचारुन लोकसेवा पूर्ततेच्या कार्यवाहीची सखोल माहिती जाणून घेतली. वाशी विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्राला भेट देऊन त्यांनी लोकसेवा प्रदान करण्याच्या कार्यवाहीची प्रत्यक्ष पहाणी केली व लोकसेवा हक्क अध्यादेशाव्दारे देण्यात येणा-या लोकसेवांची कार्यप्रणाली जाणून घेतली.
Published on : 22-08-2023 14:35:52,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update