लक्षवेधी व आकर्षक गोवर्धनी माता मंदिर प्रवेशव्दाराचा भव्यतम शुभारंभ
नवी मुंबईला ऐतिहासिक परंपरा असून यामध्ये मूळच्या बेलापूर पट्टीचे श्रध्दास्थान असलेली आणि बेलापूर गाव व परिसरातील अनेकांची कुलदेवता असलेली आई गोवर्धनी माता मंदिरात नवरात्रौत्सव व अनेक कार्यक्रम आयोजन करण्याचे भाग्य मला मिळत असल्याचे सांगत बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी मंदिराकडे जाताना भाविकांच्या मनात भक्तीभाव उत्पन्न करणारे व देवदेवतांच्या आकर्षक मूर्ती असलेले भव्यतम प्रवेशव्दार आपल्या संकल्पनेतून अत्यंत उत्तम रितीने साकारण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोरील किल्ले गावठाण येथील गोवर्धनी माता मंदिराकडे जाणा-या मुख्य मार्गावर पामबिच नजीक उभारण्यात आलेल्या आकर्षक आई गोवर्धनी माता मंदिर प्रवेशव्दाराचे उद्घाटन नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या प्रसंगी बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, शहर अभियंता श्री. संजय देसाई, उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व डॉ. बाबासाहेब राजळे, कार्यकारी अभियंता श्री. अरविंद शिंदे, सहा. आयुक्त श्री. शशीकांत तांडेल, माजी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, श्री. रामचंद्र घरत, श्री. अशोक गुरखे, श्रीम. नेत्रा शिर्के, श्री. दिपक पवार, श्री. सुनिल पाटील, श्री. भरत जाधव, श्री. निलेश म्हात्रे व गोवर्धनी माता मंदिर ट्रस्टचे विश्वस्त ॲड. विनोद सोनटक्के, डॉ. राजेश पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबईच्या नावलौकिकाला साजेशा व चिमाजी अप्पांपासूनच्या 300 हून अधिक वर्षांच्या इतिहासाला उजाळा देणा-या आई गोवर्धनी माता मंदिर प्रवेशव्दाराचा शुभारंभ करण्याचा योग आज लाभला हा आपल्यासाठी आनंदाचा क्षण असून इतर प्रवेशव्दारांपेक्षा हे अत्यंत आगळेवेगळे व अतिशय मोक्याच्या ठिकाणी असणारे प्रवेशव्दार देवदेवतांच्या लक्षवेधी मूर्तींमुळे पाहता क्षणी मनात भक्तीभाव निर्माण करते अशा शब्दात महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या कार्यालयाच्या दालनातून दिसणा-या या प्रवेशव्दारामुळे देवतांचे नियमित दर्शन होईल तसेच उुर्जास्थान असणा-या गोवर्धनी मातेची नजरही आपल्यावर राहील असे आयुक्त म्हणाले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 29 गावांची ओळख जतन होण्याकरिता ठिकठिकाणी प्रवेशव्दारांची निर्मिती करण्यात येत असून आ. श्रीम. मंदाताई म्हात्रे यांच्या संकल्पनेतून गोवर्धनी माता मंदिराकडे जाणा-या मुख्य मार्गावर हे दाक्षिणात्य शैलीचे मंदिराला अनुरुप असे अतिशय सुंदर प्रवेशव्दार उभारण्यात आले आहे. मदुराई येथील शिल्पचित्रकारांनी या प्रवेशव्दार निर्मितीमध्ये कला योगदान दिले आहे. या प्रवेशव्दारामुळे गोवर्धनी माता मंदिर याठिकाणी आहे हे सहजपणे कळेल व भाविकांना शोधत बसावे लागणार नाही याचाही उल्लेख आमदार महोदयांनी केला.
नवी मुंबईचा क्विन नेकलेस म्हणून ओळखल्या जाणा-या पामबीच मार्गानजिक महापालिका मुख्यालयाच्या आयकॉनिक वास्तूसमोर राम, लक्ष्मण, सिता, हनुमान, शंकर, पार्वती, गणेश, विष्णू, श्रीकृष्ण, गरुड, हत्ती, शंख, चक्र अशा देवदेवतांच्या व प्रतिक चिन्हांच्या मूर्ती असलेले हे भव्यतम व आकर्षक प्रवेशव्दार पाहता क्षणी लक्ष वेधून घेते. रस्त्यापासून 6 मीटर उंच व 12.5 मीटर लांब असणा-या या प्रवेशव्दारामुळे या परिसराच्या सौंदर्यातही लक्षणीय भर पडलेली आहे.
Published on : 01-09-2023 12:05:57,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update