पार्किंग नियोजनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची ठोस पावले

नवी मुंबई शहराला भेडसावणा-या पार्कींग समस्येची सोडवणूक करण्याकडे नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने विशेष लख दिले जात असून या विषयी वाहतूक पोलीस विभागाच्या सहकार्याने विभागवार मायक्रोप्लॅनिंग केले जात आहे.
यामध्ये वाहतूक नियोजना सोबतच सिडको कडून पार्किंग प्लॉट उपलब्ध करुन घेणे. तसेच मिळालेले प्लॉट पार्किंगच्या दृष्टींने विकसीत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामध्ये सेक्टर 15 ए सीबीडी येथे पार्किंग करीता बहुमजली इमारत बांधली असून येथील क्षमता 121 दुचाकी व 396 चार चाकी गाडया इतकी आहे. हा संपूर्ण परिसर विविध कार्यालये आणि वाणिज्य संस्था यांनी गजबजलेला असल्याने या पार्किंग इमारतीमुळे मोठया प्रमाणावर वाहने पार्किंगसाठी फायदा होणार आहे.
अशाच प्रकारे आणखी एक 6900 चौ.मी.चा भूखंड सेक्टर 15, सीबीडी बेलापूर येथे तसेच 11 हजार चौ.मी. चा भूखंड सेक्टर 30 वाशी येथे उपलब्ध झाला असून या दोन्ही भूखंडावर पार्किंग व्यवस्था नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत पीपीपी तत्वावर (सार्वजनिक खाजगी भागिदारी) विकसीत करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
अशा कामांमध्ये मोठया प्रमाणावर भांडवली खर्च होत असतो. यादृष्टीने या दोन्ही भूखंडावरील पार्किंग व्यवस्था पीपीपी तत्वावर विकसीत करण्याचे नियोजन करण्यात आलेले असून महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गतीमान कार्यवाही केली जात आहे. याबाबत आयुक्तांमार्फत वारंवार आढावा बैठकांचे आयोजन केले जात असून या प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यावर भर दिला जात आहे.
या दोन्ही पार्किंग भूखंडावरील पार्किंग व्यवस्थेच्या नियोजनाबाबत आर्थिक व्यवहार सलागार यांची नेमणूक करण्यासाठी महानगरपालिकेने प्रसिध्द केलेल्या जाहिरातीला मान्यताप्राप्त संस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून याव्दारे नेमणूक होणा-या सल्लागारांच्या रिपोर्टनुसार पीपीपी तत्वावर पार्किंगचे नियोजन करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पार्किंग व्यवस्था अद्ययावत असावी याकडे विशेष लक्ष दिले जात असून या पार्किंग व्यवस्थेचा लाफ जास्तीत जास्त लोकांना व्हावा यादृष्टीने महानगरपालिकेच्या निधीचीही बचत व्हावी याकरिता पीपीपी तत्वाचा वापर करुन वाहनतळ विकसीत केले जात असून इतर शहरातील पर्यटक वाहन चालकांनाही कोणते पार्किंग लॉट उपलब्ध आहेत याची माहिती सहजपणे उपलब्ध होण्याकरिता स्वतंत्र ॲप विकसीत केले जात असल्याचे सांगत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी आपले वाहन पार्किंगच्या योग्य जागीच उभे करावे असे आवाहन नागरिकांना केले आहे.
Published on : 04-09-2023 14:21:44,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update