नवी मुंबई महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात योग प्रशिक्षण सत्रे
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत नमुंमपा कार्यक्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग सत्र आयोजित करण्यात आले आहे. 01 सप्टेंबर 2023 रोजी पासून या योग सत्रास सुरुवात करण्यात आलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या 23 नागरी प्राथमिक आरोग्य केद्रांमध्ये योग सत्राची सुरुवात करण्यात आलेली असून, या योग सत्राचा लाभ प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, कार्यक्षेत्रातील गरोदर माता व असंसर्गजन्य आजारांनी व्याधीग्रस्त नागरिकांना घेता येणार आहे.
नागरिकांना रुग्ण सेवा देण्यासोबतच आरोग्य संवर्धनासाठी हे योगाचे प्रशिक्षण देण्यात येत असून या धावपळीच्या व दगदगीच्या जीवनात लोकांना काही वेळ स्वतःच्या आरोग्यासाठी देता यावा हा या योग सत्राचा उद्देश आहे.
प्रत्येक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येक महिन्यात पाच सत्रे घेण्यात येणार असून त्यात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक सत्र, कार्यक्षेत्रातील गरोदर मातांकरिता दोन सत्रे, असंसर्गजन्य आजारांनी व्याधीग्रस्त असलेल्या नागरिकांसाठी व इतर रुग्णांसाठी दोन सत्रे अशा प्रकारे नियोजन करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मान्यतेने योग सत्राची सुरुवात करण्यात आली असून याकरिता प्रशिक्षित योग प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे. या सत्राचा लाभ मोठ्या प्रमाणावर घ्यावा असे आवाहन नमुंमपा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 06-09-2023 13:22:53,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update