राष्ट्रीय स्वच्छहवा दिन कार्यक्रमांतर्गत कामांना गती देण्याचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे निर्देश
7 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्वच्छ आकाशदिन साजरा होत असून याअनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक परिवहन विभाग अशा संबंधित संस्थांनी लोकसहभागातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे व जनजागृतीवर भर दयावा असे निर्देश नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी दिले.
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत संबंधित सर्व घटकांची आढावा बैठक मुख्यालयातील विशेष समिती कक्षात संपन्न झाली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. विजयकुमार म्हसाळ, शहर अभियंता श्री. संजय देसाई, मुख्यलेखा व वित्तअधिकारी श्री. सत्यवान उबाळे, मुख्य लेखा परीक्षक श्री. जितेंद्र इंगळे तसेच नोडल अधिकारी अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड आणि इतर विभाग प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या व प्रगती पथावरील कामांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये महानगरपालिकेसह इतरही संस्थांवर प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असल्याचे अधोरेखित करीत आयुक्तांनी प्रत्येक संबंधित प्राधिकरणाने कृती आराखडयानुसार आपल्याकडून अपेक्षित असलेल्या कामांची 100 टक्के पूर्तता होईल याकडे काटेकोर लक्ष दयावे असे निर्देशित केले.
यामध्ये ई व्हेईकलला प्राधान्य देण्याच्यादृष्टीने नागरिकांना प्रोत्साहीत करण्यासाठी व्यापक स्वरुपात जनजागृती करावी असे आयुक्तांनी सूचित केले. त्यासोबतच प्रादेशिक परिवहन विभागाने पीयूसीबाबत मोठया प्रमाणात शिबीरे आयोजित करावी असेही निर्देशित करण्यात आले. विमानतळाच्या कामामुळे वाढलेले धुळीचे प्रमाण रोखण्यासाठी आणखी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्तांनी याप्रसंगी दिल्या.
यावर्षी 7 सप्टेंबर रोजी निळया आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिन साजरा करताना स्वच्छ हवेसाठी एकत्र येऊया. हे घोषवाक्य असून त्याअनुषंगाने अधिकाधिक कार्यक्रम आयोजित करावेत व त्यामध्ये व्यापक लोकसहभाग घ्यावा असे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी निर्देशित केले.
Published on : 06-09-2023 14:23:30,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update