श्री गणेशमूर्ती विसर्जन व्यवस्थेचे सुव्यवस्थित नियोजन करीत नवी मुंबई महानगरपालिका सज्ज



'श्रीगणेशोत्सव 2023' पर्यावरणपूरक रितीने उत्साहात साजरा करावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. त्यास अनुसरून नवी मुंबई महानगरपालिकेने श्री गणेशमूर्ती विसर्जनाची सुयोग्य व्यवस्था केली असून नैसर्गिक 22 विसर्जन स्थळांव्यतिरिक्त विविध विभागांमध्ये 141 कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात आलेली आहे. नागरिकांची गर्दी टाळावी व जलप्रदूषणाला प्रतिबंध होऊन इकोफ्रेन्डली गणेशोत्सव साजरा व्हावा यादृष्टीने श्रीगणेशमूर्ती विसर्जन स्थळांची संख्या मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार श्रीगणेशोत्सवामध्ये मंडप उभारणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारण्याचा निर्णय महापालिका आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांनी जाहीर केला असून त्याचे सर्व गणेशोत्सव मंडळांमार्फत स्वागत करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सवाकरिता मंडप उभारण्यासाठी परवानगी अर्ज करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्याकरिता प्रत्येक विभाग कार्यालयात मंडप परवानगीसाठी विशेष कक्ष स्थापित करण्यात आला होता. त्यास अनुसरून 185 मंडळांना परवानगी देण्यात आली असून यामध्ये बेलापूर विभागात 28, नेरुळ विभागात 24, वाशी विभागात 17, तुर्भे विभागात 21, कोपरखैरणे विभागात 48, घणसोली विभागात 10, ऐरोली विभागात 27 व दिघा विभागात 10 अशाप्रकारे एकूण 185 गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यात आलेली आहे.
गतवर्षी कृत्रिम तलावामध्ये श्रीमूर्ती विसर्जनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे यावर्षी नागरिकांच्या मागणीनुसार 7 नवीन ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलाव निर्माण करण्यात आले आहेत. मागील वर्षी कृत्रिम तलावात मोठ्या संख्येने श्रीमूर्ती विसर्जित करून नवी मुंबईकर नागरिकांनी आपल्या पर्यावरण विषयक जागरुकतेचा प्रत्यय दिला.
महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानामध्ये नवी मुंबई हे 'क' वर्ग महानगरपालिकांमध्ये राज्यातील प्रथम क्रमांकाचे पर्यावरणशील शहर म्हणून मानांकित असून यामध्ये जागरुक नवी मुंबईकर नागरिकांचा मोलाचा वाटा आहे. हीच जागरुकता कृत्रिम तलावात श्रीगणेश मूर्ती विसर्जन करून दाखवत जलप्रदूषणाला प्रतिबंध करण्यात महत्त्वाची भूमिका बजावावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
याशिवाय आधीपासूनच तलावातील जलप्रदूषण रोखण्यासाठी 14 मुख्य तलावातील जलाशयाच्या साधारणत: 30 टक्के भागात नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत गॅबियन वॉल उभारण्यात आल्या असून या विशिष्ट क्षेत्रात श्रीमूर्ती विसर्जन करावे या आवाहनासही सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे.
विसर्जन स्थळांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी आठही विभागांमध्ये मोठ्या संख्येने तब्बल 141 कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये - बेलापूर विभागात 19, नेरुळ विभागात 26, वाशी विभागात 16. तुर्भे विभागात 17, कोपरखैरणे विभागात 15, घणसोली विभागात 21, ऐरोली विभागात 18 व दिघा विभागात 9 अशाप्रकारे एकूण 141 कृत्रिम विसर्जन तलाव उभारण्यात आले आहेत.
पारंपारिक 22 व कृत्रिम 141 अशा 163 विसर्जन स्थळांवर दीड दिवस कालावधीच्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. मागील वर्षी दीड दिवस कालावधीच्या विसर्जनामध्ये 9077 श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते.
त्यास अनुसरून श्रीगणेशोत्सव सुनियोजित पध्दतीने संपन्न व्हावा याकरिता महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी तसेच संबंधित पोलीस विभाग, एमएससीडीसीएल अशा प्राधिकरणांनी परस्पर समन्वय राखून सुयोग्य कार्यवाही करावी असे निर्देश आयुक्तांनी यापूर्वीच घेतलेल्या तीन आढावा बैठकांमध्ये दिलेले आहेत व त्यानुसार सर्व यंत्रणा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा याकरिता सज्ज आहे.
या व्यवस्थेमध्ये -
• नैसर्गिक व कृत्रिम अशा 163 सर्व विसर्जन स्थानांवर पुरेशा संख्येने स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
• सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यात आलेली आहे.
• सर्व ठिकाणी पुरेशी विद्युत व्यवस्था, जनरेटर व्यवस्था करण्यात आली आहे.
• 22 विसर्जन स्थळांवर नजिकच्या नागरी आरोग्य केंद्रामार्फत वैद्यकीय पथके तैनातअसणार आहेत.
. • 22 विसर्जन स्थळांवर संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून स्वयंसेवक, लाईफगार्ड्स व्यवस्था अधिक कृतिशीलपणे कार्यरत असणार आहे. त्यासोबतच अग्निशमन दलाचे जवानही कार्यरत असणार आहेत.
• मुख्य विसर्जन स्थळांवर उपस्थित भाविकांना महत्वाच्या सूचना देण्यासाठी व्यासपीठ व्यवस्थाही करण्यात आलेली आहे.
• सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळांवर श्रीमूर्तींच्या विसर्जनासाठी तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये आयुक्त महोदय यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे वाढही करण्यात आलेली आहे.
• विसर्जनस्थळी भाविकांनी जलाशयामध्ये निर्माल्य टाकू नये असे आवाहन करण्यासोबतच प्रत्येक विसर्जनस्थळी ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी स्वतंत्र कलश ठेवण्यात आलेले आहेत तसेच निर्माल्याचे पावित्र्य राखून त्याची विल्हेवाट लाण्यासाठी प्रकल्पस्थळी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे निर्माल्याच्याच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र वाहने ठेवण्यात आलेली आहेत.
• पोलीस यंत्रणाही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने दक्षतेने सज्ज आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विसर्जनाची सुयोग्य व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात कृत्रिम तलावांचा वापर करून जलाशयांच्या शुध्दतेमध्ये आपले योगदान द्यावे व इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 25-09-2023 15:44:36,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update