'माझी माती, माझा देश' अभियानांतर्गत नवी मुंबईतील प्रत्येक विभागातून माती संकलन
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता होत असताना 'माझी माती माझा देश' अर्थात 'मेरी माटी मेरा देश' हा मातृभूमीविषयी प्रेम व्यक्त करणारा व वीर योद्धांच्या समर्पणाचे स्मरण करणारा अभिनव उपक्रम संपूर्ण देशपातळीवर राबविला जात आहे.
या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार देशाच्या रक्षणार्थ बलिदान दिलेल्या स्थानिक शहीद वीरांची नावे असणाऱ्या शिलाफलकाची स्थापना, सामुहिक पंचप्रण शपथ, वसुधा वंदन करीत 75 देशी वृक्षरोपे असणाऱ्या अमृतवाटिकेची निर्मिती, ध्वजारोहण, 'वीरो को नमन' या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन असे अनेक कार्यक्रम नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उत्साहाने राबविण्यात आले. ज्यामध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग मिळाला.
या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील घराघरातून एका कलशात थोडी थोडी माती एकत्र करण्याचा 'अमृत कलश यात्रा' उपक्रम सर्व आठही विभाग कार्यालय क्षेत्रात राबविला जात आहे. या यात्रेमध्ये पंचप्राण शपथ घेऊन, शहीद वीर जवानांचे स्मरण करीत घरोघरी जाऊन माती संकलन केली जात आहे. बेलापूर ते दिघा अशा आठही विभागातील माती संकलन केलेले कलश नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात एकत्र आणण्यात येणार आहेत. या आठही कलशातील माती मुख्यालय स्तरावरील कलशात एकत्रित करून संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रातील माती असलेला कलश मुंबई येथे पाठविला जाणार आहे.
याबाबत नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी विशेष बैठक घेत घराघरापर्यंत पोहोचून माती संकलित करण्याचे काम विभाग कार्यालय स्तरावर करण्याचे निर्देश दिले आहेत. ही घराघरातून माती संकलित करताना उत्सवी स्वरूपात पारंपारिक वाद्य वाजविली जाणार आहेत. 22 सप्टेंबरपर्यंत विभाग कार्यालय स्तरावरून हे विभागांचे मातीचे कलश मुख्यालय स्तरावर आणण्यात यावेत अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
या देशातील प्रत्येक गाव, शहरातील माती एकत्रित करून राजधानी दिल्लीत नेली जाणार असून या माध्यमातून एकात्म भावनेचा विकास व मातृभूमीविषयीचे प्रेम वाढीस लागणार आहे. त्याचप्रमाणे वीरांच्या त्यागाविषयी व त्यांच्या बलिदानाविषयी मनात आदरभाव आणि कृतज्ञता वृध्दिंगत होणार आहे.
तरी सर्व सुजाण आणि सुज्ञ नवी मुंबईकर नागरिकांनी 'माझी माती माझी देश' या उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत विभाग कार्यालयामार्फत आपल्या घरी पोहोचणाऱ्या अमृत कलशात थोडीशी माती अथवा तांदूळ द्यावेत आणि मातृभूमीविषयीचे आपले प्रेम व शहीद वीरांविषयीचा आदर व्यक्त करावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 25-09-2023 15:56:10,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update