‘माझी माती माझा देश’ उपक्रमांतर्गत विभागीय अमृत कलश यात्रांना नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे समारोपीय पर्व सुरु असून ‘माझी माती माझा देश’ अर्थात ‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम देशभरात अतिशय उत्साहात राबविला जात आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात ‘वसुधा वंदन’, ‘शिलाफलकम्’, ‘पंचप्रण शपथ’, ‘शहीद वीरांच्या कुटुंबियांचा सन्मान’ असे नानाविध उपक्रम अतिशय उत्साहात राबविण्यात आले. या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वांना मातृभूमी प्रेमाच्या एकाच धाग्याने जोडणारा ‘अमृत कलश यात्रा’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.
या अंतर्गत नवी मुंबईच्या घराघरातून माती संकलित केली जात असून अमृत कलश यात्रेमध्ये विभाग स्तरावरील कलशात संकलित केलेली घराघरातील माती नमुंमपा मुख्यालय स्तरावर आणली जाणार आहे. मुख्यालय स्तरावर आठही विभागांतून संकलित केलेली घराघरातील माती एका मोठया कलशात एकत्र केली जाणार असून हा मोठा कलश राज्यस्तरावर मुंबई येथे पाठविला जाणार आहे. तेथून ही माती राजधानी दिल्ली येथे पाठविली जाणार असून या मातीमधून दिल्ली येथे शहीदांच्या सन्मानार्थ अमृत वाटिका तयार करण्यात येणार आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये सर्व विभाग कार्यालयांना आपापल्या क्षेत्रात अमृत कलशांची उत्सवी स्वरुपात वाजतगाजत यात्रा काढून विभागांतील घरोघरी जात या कलशांमध्ये माती संकलित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी माती उपलब्ध होणे शक्य नाही अशा अपवादात्मक घरांतून प्रतिकात्मक स्वरुपात तांदळाचे दाणे संकलित करण्याचे सूचित करण्यात आले आहे, तथापि शक्यतो माती संकलन करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालयांच्या वतीने आपापल्या विभाग कार्यालय क्षेत्रात अतिशय उत्साहात ‘अमृत कलश यात्रा’ काढण्यात येत असून त्यामध्ये पारंपारिक वेशभूषा परिधान करीत पुरुष व महिला नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी होताना दिसत आहेत. आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार मिरवणुकीच्या स्वरुपात वाजत गाजत ही अमृत कलश यांत्रा आपापल्या विभागीय क्षेत्रातील घरापर्यंत पोहचून अमृत कलशात माती संकलित करीत आहे.
अतिरिक्त आयुक्त श्री. विजयकुमार म्हसाळ यांचे या विभागीय अमृत कलश यात्रा कार्यवाहीकडे बारकाईने लक्ष असून या उपक्रमाच्या नोडल अधिकारी तथा उपआयुक्त श्रीम. मंगला माळवे यांच्यामार्फतही विभाग कार्यालय या अनुषंगाने करीत असलेल्या कार्यक्रमांचा व कार्यवाहीचा नियमीत आढावा घेतला जात आहे.
नवी मुंबई शहरामध्ये देशातील विविध राज्याचे व प्रांताचे नागरिक एकात्म भावनेने राहत असून ‘मिनी भारत’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील घराघरांतील माती संकलन हे एकप्रकारे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे. अशाप्रकारे राष्ट्रीय भावना वाढीस लावणा-या व देशाच्या संरक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या शहीद वीरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणा-या ‘माझी माती माझा देश’ अर्थात ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होऊन विभाग कार्यालयामार्फत आपल्या घरापाशी येणाऱ्या अमृत कलशात थोडीशी माती टाकून या राष्ट्रीय कार्यक्रमात उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 26-09-2023 16:01:43,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update