ज्येष्ठ नागरिकांच्या कला-क्रीडा गुणांच्या कौतुकाने सजला नवी मुंबईत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन
ज्येष्ठ नागरिकांचा मानसिक आधार असणारी विरंगुळा केंद्रे, सवलतीत एनएमएमटी बस सुविधा, आरोग्य सेवा अशा विविध बाबीनी ज्येष्ठ नागरिकांप्रती आदरभाव व्यक्त करणारी नवी मुंबई महानगरपालिका प्रत्येक वर्षी ज्येष्ठांच्या अंगभूत कला-क्रीडा गुणांना उत्तेजन देणारे विविध उपक्रम राबवित जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करत असते. अशाच प्रकारे या वर्षीचा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन विष्णुदास भावे नाटयगृह, वाशी येथे आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये जल्लोषात साजरा झाला.
याप्रसंगी ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. गणेश नाईक, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, विधान परिषद सदस्य आमदार श्री. रमेश पाटील, महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त श्री. विजयकुमार म्हसाळ, समाजविकास विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार, वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत जवादे, माजी नगरसेवक श्रीम. नेत्रा शिर्के व श्री. जी एस पाटील, अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे उपाध्यक्ष तथा नवी मुंबई महानगरपालिका ज्येष्ठ नागरिक कक्षाचे सदस्य श्री. अण्णासाहेब टेकाळे, फेसकॉमचे सचिव श्री. सुरेश पोटे व इतर ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रे चालविणा-या संस्थांचे अध्यक्ष उपस्थित होते.
भारतातील पहिले ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र नवी मुंबईत सुरु झाले व नंतर भारतातील इतर शहरांनी त्याचे अनुकरण केले याचा अभिमान व्यक्त करीत ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. गणेश नाईक यांनी त्याच धर्तीवर प्रत्येक नोडमध्ये ज्येष्ठ नागरिक निवारा केंद्रे असावीत अशी सूचना केली.
बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई ही ज्येष्ठांना चांगल्या सुविधा पुरवित त्यांचा सन्मान करणारी महानगरपालिका असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिक निवारा केंद्रे ज्येष्ठांच्या सेवेसाठी लवकरात लवकर कार्यान्वित करावे असे सूचित केले.
विधान परिषद सदस्य आमदार श्री. रमेश पाटील यांनी निवासासाठी नवी मुंबईची निवड करणारे आपण चांगले नागरिक आहात असे उपस्थित ज्येष्ठांचे कौतुक करीत ज्येष्ठांच्या आयुष्यात समाधानाचे क्षण देणारे नवी मुंबई हे शहर असल्याचे सांगितले.
नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ नागरिकांना सेवा सुविधा पुरविण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करणारी नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका असल्याचा अभिमान व्यक्त करीत 29 इतक्या मोठया संख्येने असलेली विरंगुळा केंद्रे ही समवयस्क ज्येष्ठ मित्रांना आपल्या मनातले सांगण्याची आपुलकीची ठिकाणे झाली असल्याचे मत व्यक्त केले. ज्येष्ठांना अनेक उपयोगी सुविधा उपलब्ध करुन देताना ज्येष्ठ नागरिक निवारा केंद्र लवकरच सुरु होत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. ज्या मुलांना चार पाच दिवसांसाठी बाहेरगावी जावे लागल्याने आपल्या वृध्द आई वडीलांना कुठे ठेवाायचे हा प्रश्न पडतो, अशी मुले तात्पुरत्या कालावधीसाठी आई वडीलांना या केंद्रात ठेवू शक्तात अशी माहिती देत आयुक्तांनी ज्येष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या एकपात्री अभिनय, वेशभूषा, काव्यवाचन, गायन, नृत्य, कथाकथन, हास्य, टेलिफोन, टपाल पत्रलेखन, निबंध, कॅरम, बुध्दिबळ, ब्रिझ अशा विविध कला-क्रीडा गुणदर्शन स्पर्धांमधील विजेत्या ज्येष्ठ नागरिकांना मान्यवरांच्या शुभहस्ते रोख पारितोषिेके व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी विवाहास 50 वर्ष पूर्ण झालेल्या 15 ज्येष्ठ दांम्पत्यांचा विशेष सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे वयाचा अमृतमहोत्सव साजरा करणा-या 75 ज्येष्ठ नागरिकांनाही सन्मानित करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिकांच्या विविध स्पर्धांचे परीक्षण करणा-या श्रीम. माधवी देशमुख, श्री. प्रतिक सातपुते, श्रीम. सिंधू नायर, श्री. रविंद्र पारकर, श्रीम. शुभांगी साळुंके, श्री. संजय गडकरी, श्रीम. पल्लवी बुलाखे यांचाही सन्मान करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिक दिनाच्या नाट्यगृहातील कार्यक्रमापूर्वी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमांतर्गत आयोजित विशेष स्वच्छता मोहीमेत शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. याप्रसंगी स्वच्छ नवी मुंबई मिशनचे ब्रँड अँबेसेडर पद्मश्री शंकर महादेवन यांचे समवेत ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. गणेश नाईक, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर आणि इतर अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी आयोजित वादयवृंदाच्या कार्यक्रमातील गीत-नृत्याचा आस्वाद घेत ज्येष्ठ नागरिकांनी हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचा विशेष कार्यक्रम उत्साहात व आनंदात साजरा केला.
Published on : 01-10-2023 14:58:24,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update