‘माझी माती माझा देश’ उपक्रमामध्ये ‘भव्य अमृत कलश यात्रे’तून नमुंमपा मुख्यालयात आठही विभागांतील मातीचे संकलन
‘माझी माती माझा देश’ अर्थात ‘मेरी माटी मेरा देश’ या राष्ट्रव्यापी उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालय क्षेत्रातून संकलित केलेली माती अमृत कलश यात्रेव्दारे महापालिका मुख्यालयात वाजतगाजत आणून मुख्यालय स्तरावरील अमृत कलशात मान्यवरांच्या शुभहस्ते एकत्रित करण्यात आली.
भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवित साज-या झालेल्या या अमृत कलश यात्रा सोहळ्याप्रसंगी विधानपरिषद सदस्य आमदार श्री. रमेश पाटील, अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, शहर अभियंता श्री. संजय देसाई, प्रशासन विभागाचे उपायुक्त श्री. शरद पवार, उपायुक्त तथा माझी माती माझा देश उपक्रमाच्या नमुंमपा नोडल अधिकारी श्रीम. मंगला माळवे, क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या उपायुक्त श्रीम. ललिता बाबर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, उदयान विभागाचे उपायुक्त श्री. दिलीप नेरकर, शिक्षण विभागाचे उपायुक्त श्री. दत्तात्रय घनवट, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, नॅशनल सिक्युरिटी गार्डचे डेप्युटी कमान्डन्ट मेजर इंद्रजित बरेव व सुभेदार अजय प्रकाश, वीर जवान फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी आर्मी ऑफिसर श्री.सुरेश काकडे व सचिव श्री. महेन्द्र गवई आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी समारोपीय पर्वाचे औचित्य साधून संपूर्ण देशभरात राबविल्या जात असलेल्या ‘माझी माती माझा देश’अर्थात ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहाने कार्यक्रमांचे आयोजन करीत पहिल्या टप्प्यात ‘वसुधा वंदन’, ‘शिलाफलकम्’, ‘पंचप्रण शपथ’, ‘शहीद वीरांच्या कुटुंबियांचा सन्मान’ असे नानाविध उपक्रम भव्यतम स्वरुपात राबविले.
उपक्रमाच्या दुस-या टप्प्यात वाजतगाजत मिरवणूकीव्दारे सांस्कृतिक अमृत कलश यात्रेचे भव्यतम आयोजन
या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वांना मातृभूमीप्रेमाच्या एकाच धाग्याने जोडणारा ‘अमृत कलश यात्रा’ हा अभिनव उपक्रम केंद्र सरकारमार्फत जाहीर करण्यात आला. सर्व विभाग कार्यालयांना देण्यात आलेल्या सूचनेप्रमाणे त्यांनी आपापल्या क्षेत्रात अमृत कलशाची उत्सवी स्वरुपात यात्रा काढून विभागांतील घरोघरी जाऊन या कलशांमध्ये घराघरांतील, विभागीय परिसरातील माती संकलित केली.
हे विभाग स्तरावरील माती संकलन केलेले अमृत कलश मुख्यालय स्तरावर आणताना आठही विभागातील मध्यवर्ती स्थळी नागरिकांनी पारंपारिक वेशभूषेत नटूनथटून यात्रेत सहभाग घेतला. विभागांमधील ‘अमृत कलश यात्रा’ बँड तसेच पारंपारिक वादये वाजवित परिसरामध्ये फिरविण्यात आली. पंचप्रण शपथ घेऊन सुरु झालेल्या या विभागीय यात्रेमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, विदयार्थी तसेच नागरिकांनी मोठया प्रमाणावर सहभाग घेतला. या आठही विभागांमधील माती संकलित केलेले अमृत कलश मुख्यालयाजवळील सर्व्हिस रोडवर एकत्रितपपणे सजवलेल्या गाडयांमधून आणण्यात आले. त्या ठिकाणी विभागांतील आठ अमृत कलशांची विदयार्थी व नागरिकांची बँड पथके, विदयार्थ्यांची लेझीम पथके याव्दारे मुख्यालय इमारतीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
अमृत कलशात संकलित नवी मुंबईची माती राजधानी दिल्लीतील शहीद स्मारकात वापरली जाणार
विभाग स्तरावरील कलशात संकलित केलेली तेथील घराघरातील माती नमुंमपा मुख्यालयात आठ अमृत कलशांतून आणून त्या ठिकाणी मुख्यालय स्तरावरील अमृत कलशात एकत्रित करण्यात आली.हा मुख्यालय स्तरावरील अमृत कलश राज्यस्तरावर मुंबई येथे पाठविला जाणार असून तेथून हा अमृत कलश राजधानी दिल्ली येथे पाठविला जाणार आहे. नवी मुंबईप्रमाणेच देशभरातील लाखो गाव-शहरांमधील संकलित माती दिल्ली येथे शहीदांच्या सन्मानार्थ बनविण्यात येणाऱ्या स्मारकामध्ये वापरली जाणार आहे.
नवी मुंबईतील कोणताही उपक्रम उत्साही नागरिक सहभागामुळे यशस्वी – आ.श्री. रमेश पाटील
कोणताही सामाजिक उपक्रम जाहीर झाल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका अत्यंत भव्यतम व सुयोग्य नियोजन करते आणि नवी मुंबईकर नागरिकही त्यामध्ये अतिशय उत्साहाने सहभागी होतात. त्यामुळे नवी मुंबईतील सर्व कार्यक्रमयशस्वी होतात असे सांगत विधान परिषद सदस्य आ.श्री.रमेश पाटील यांनी अतिशय उत्तम कार्यक्रम आयोजनाबद्दल प्रशंसा केली.
नवी मुंबईला एकात्मतेच्या धाग्याने जोडणारा उपक्रम – अति. आयुक्त श्रीम. सुजाता ढोले
अतिरिक्तआयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी याप्रसंगी बोलताना ‘माझी माती माझा देश’ हा उपक्रम प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलीत करणारा असल्याचे सांगत नवी मुंबईतील उत्साही नागरिक, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे यांच्या एकजुटीने मिळणाऱ्या सहभागामुळेच विविध उपक्रमांमध्ये नवी मुंबई स्वत:च स्वत:चे रेकॉर्ड मोडते असे म्हटले. नवी मुंबईतील नागरिकांमध्ये आपण एक कुटुंब आहोत अशी भावना असल्यामुळेच कोणत्याही उपक्रमात मोठया संख्येने लोकसहभाग मिळतो असे सांगत त्यांनी सर्व नागरिकांचे आभार मानले.
प्रास्ताविकपर मनोगतामध्ये उपायुक्त तथा उपक्रमाच्या नोडल अधिकारी श्रीम. मंगला माळवे यांनी आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात यशस्वीरित्या राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच सक्रिय योगदानाबद्दल नागरिकांचे आभार मानले.
शहीद वीरांच्या कुटुंबियांचा सन्मान
याप्रसंगी देशाच्या संरक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या शहीद वीर जवानांच्या कुटुंबियांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ज्यामध्ये सन 2001 साली जम्मू आणि काश्मीर येथे संरक्षण कार्य करताना वीरमरण प्राप्त झालेले इंडियन आर्मीमधील नायक लक्ष्मण शेळके यांचे सुपुत्र श्री. अर्जून शेळके, सन 2006 साली से.7 ऐरोली येथील पंजाब व महाराष्ट्र बँकेवर पडलेल्या दरोडयात गुन्हेगारीविरोधी कार्यवाही करताना वीरमरण प्राप्त झालेले पोलीस हवालदार भिकू मारुती कराडे यांच्या पत्नी तसेच सन 2007 साली एमएससीबी पॉवरहाऊस रबाळे येथे दरोडेखोरांशी लढताना वीरमरण प्राप्त झालेले पोलीस नाईक गोपाळ सैंदाणे यांच्या पत्नी यांना सन्मानीत करण्यात आले. त्याचप्रमाणे इर्शाळवाडीदरड कोसळण्याच्या दुर्घटनेप्रसंगी मदतकार्य करताना वीरमरण प्राप्त झालेले नमुंमपा अग्निशमन विभागातील सहाय्यक केंद्र अधिकारी शिवराम ढुमणे यांच्या पत्नी श्रीम. कविता ढुमणे यांनाही सन्मानीत करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमातून देशभक्तीचे कलात्मक दर्शन
यावेळी सादर झालेल्या देशभक्तीने भारलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा सुरेल प्रारंभ शिक्षणाधिकारी श्रीम. अरुणा यादव यांनी गायलेल्या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ‘अनामविरा जिथे जाहला तुझा जीवनांत’ या कविता सादरीकरणाने झाला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज विदयालय नमुंमपा शाळा क्र.55 कातकरीपाडा राबाडे यांचे समुहगान, नमुंमपा शाळा क्र.36 कोपरखैरणे गाव व नमुंमपा शाळा क्र.18 सानपाडा आणि नमुंमपा शाळा क्र.92 कुकशेत या तीन शाळांची देशभक्तीपर गीतांवरील समुहनृत्ये तसेच नमुंमपा शाळा क्र.98 गौतमनगर या शाळेचे काव्यनाटय याव्दारे सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्तीची भावना जागृत करीत उत्तरोत्तर रंगत गेला. उल्का झगडे या दिव्यांग विदयार्थीनीचे गायन व भाषण उपस्थितांची कौतुकाची दाद मिळवून गेले. प्रवेशव्दारावर श्रीहरी पवळे या रंगावलीकारांनी रेखाटलेली रांगोळी लक्षवेधी होती.
यावेळी केंद्र सरकारमार्फत ‘माझी माती माझा देश’ उपक्रमाच्या अनुषंगाने बनविण्यात आलेल्या दोन व्हिडिओ चित्रफितींचेही प्रसारण करण्यात आले. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेने उपक्रमाच्या दोन्ही टप्प्यात विभागीय स्तरावर तसेच मुख्यालय स्तरावर आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांची व्हिडिओ चित्रफितही प्रदर्शित करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी अतिरिक्तआयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्या समवेत सामुहिकरित्या पंचप्रण शपथ ग्रहण केली.
‘माझी माती माझा देश’ अर्थात ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमाच्या दुस-या टप्प्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील विभागाविभागात अमृत कलश यात्रा काढूनघराघरांतून करण्यात आलेले माती संकलन व यासाठी नागरिकांनी दिलेला उत्स्फुर्त प्रतिसादयामधूननवी मुंबईकरांचे मातृभूमीविषयीचे प्रेम व राष्ट्रीय एकात्मता यांचे दर्शन घडले.
Published on : 06-10-2023 11:29:59,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update