नमुंमपाच्या ‘आयुष्मान भव’ आरोग्य मेळाव्यात 1449 गर्भवती माता व 1076 बालकांची आरोग्य तपासणी
केंद्र शासन देशभर १७ सप्टेंबरपासून ‘आयुष्मान भव’ मोहीम राबवित आहे. या मोहिमेच्या माध्यमातून विविध स्तरावर आरोग्यविषयक सेवा देण्यात येत आहे. या राष्ट्रीय मोहिमेचा शुभारंभ राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते १३ सप्टेंबर रोजी करण्यात आला.
त्यास अनुसरून महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शननुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही या मोहीमेचे प्रभावी आयोजन करण्यात येऊन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांच्या नियंत्रणाखाली सर्व आरोग्य अधिकारी,कर्मचारी यांना अवयवदानाची प्रतिज्ञा देऊन मोहिमेस सुरवात करण्यात आली. यामध्ये आयुष्मान भव शब्दाप्रमाणे सर्वांना सुदृढ आरोग्य मिळावे या हेतूने मोहिमेच्या माध्यमातून आरोग्य सेवांचा जागर करण्यात येत आहे.
सदर मोहिमेमध्ये दर आठवड्यातील शनिवारी आरोग्य मेळावा आयोजित केला जात आहे. या मेळाव्यात पहिल्या आठवड्यात असंसर्गजन्य आजार, दुसऱ्या आठवड्यात क्षयरोग, कुष्ठरोग आणि अन्य संसर्गजन्य आजारांची तपासणी करण्यात आली. तिसऱ्या आठवड्यात माता व बाल आरोग्य, चौथ्या आठवड्यात डोळ्यांची तपासणी व डोळ्यांचे आरोग्य या संकल्पनेनुसार कार्यवाही केली जाणार आहे.
या मेळाव्यादरम्यान आभा कार्ड तयार करण्यात येणार आहे. या माध्यमातून सर्वसमावेशक आरोग्य सेवा, आयुष, मानसिक आरोग्य, वाढत्या वयातील आजार व उपचार, मौखिक आरोग्य, नेत्र, कान, नाक व घसा यांचे आरोग्य, समुपदेशन सेवा, योगा व वेलनेस उपक्रम, मोफत औषधी, प्रयोगशाळा तपासणी तसेच टेली कन्सल्टेशन सेवा देण्यात येत आहेत.
‘निरोगी आयुष्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ या उद्देशाने १८ वर्षावरील पुरुषांची उंची, वजन, मधुमेह, रक्तदाब, हिमोग्लोबिन, रक्तक्षय, मोखिक कर्करोग याबाबतची तपासणी करण्यात येत असून तंबाखू, गुटखा, सिगारेट, दारू या व्यसनांविषयी समुपदेशन करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने नमुंमपा आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आयुष्मान भव आरोग्य मेळावा’ आयोजित करण्यात येत आहे.
दि. ७ ऑक्टोबर रोजी माता, बाल आरोग्य व पोषण आरोग्य सुविधा राबविणे याविषयी नमुंमपाची रुग्णालये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या स्तरावर व्यापक रितीने आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यामध्ये १४४९ गर्भवती मातांची तज्ज्ञांमार्फत वजन, मधुमेह, रक्तदाब, हिमोग्लोबिन, लघवी तपासणी अशी विविध प्रकारची तपासणी करण्यात आली तसेच याबाबतचे समुपदेशन देखील करण्यात आले. त्यांना बाळाचे वजन, आहार, व्यायाम याविषयी आरोग्य शिक्षण देण्यात आले.
त्याचप्रमाणे १०७६ बालकांचीही तज्ज्ञांमार्फत आरोग्य तपासणी करून वजन, लसीकरण, अनेमियामुक्त भारत अंतर्गत देण्यात येणारी औषधे याबाबतची स्थिती जाणून घेऊन त्याबाबतची महत्तवपूर्ण माहिती देण्यात आली. स्तनपान, आहार, कुपोषण याविषयी समुपदेशन करण्यात आले. ७ सप्टेंबर २०२३ रोजीच्या आरोग्य मेळाव्यास गरोदर माता व पाच वर्षाआतील बालकांचा मोठया प्रमाणावर उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
यापुढील आयुष्मान भव आरोग्य मेळाव्यास नागरिकांनी अशाच प्रकारे मोठया संख्येने प्रतिसाद द्यावा व १८ वर्षावरील पुरुषांनी नजिकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आरोग्य तपसणी करून घ्यावी असे आवाहन नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 09-10-2023 14:58:21,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update