सफाईमित्रांनी एनडीआरएफ कडून घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
नवी मुंबई शहर स्वच्छतेमध्ये नावाजले जात असताना स्वच्छतेची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणा-या स्वच्छताकर्मींकडेही महानगरपालिकेच्या वतीने लक्ष दिले जात आहे. मलनि:स्सारण वाहिन्या व सेप्टिक टँक सफाई करणा-या सफाईमित्रांना विशिष्ट पोशाख देण्यात आलेला असून त्यांना आपल्या कामाचा अभिमान वाटेल अशा वातावरण निर्मितीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
या अनुषंगाने स्वच्छ सर्वेक्षणामधील ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने, घनकचरा व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी विभागाच्या सहयोगाने सफाईमित्र यांच्याकरिता एनडीआरएफमार्फत आपत्ती विषयक प्राथमिक प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रात्यक्षिकासह घेण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरात 250 हून अधिक सफाईमित्रांनी उत्साहाने सहभागी होत आपत्ती काळातील व्यवस्थापनाबाबत बारकाईने माहिती जाणून घेतली.
महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्र येथे एनडीआरएफच्या आरआरसी मुंबई येथील पाचव्या बटालियनमार्फत हा प्रशिक्षण उपक्रम राबविण्यासाठी विशेष योगदान देण्यात आले. एनडीआरएफ निरीक्षक श्री गौरव चौहान तसेच सहा. निरीक्षक श्री. विजय म्हस्के यांनी व त्यांच्या सहका-यांनी शिबिरात सहभागी 250 हून अधिक सफाईमित्रांना आपत्ती विषयक मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणात आपत्ती व आपत्तीचे प्रकार, तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्धता, प्राथमिक वैदयकिय प्रतिसादक, सीपीआर, अग्निसुरक्षा व बचाव अशा विविध विषयांवर माहिती देण्यात आली तसेच सफाईमित्रांकडून प्रात्यक्षिके करुन घेण्यात आली. या माध्यमातून सफाईमित्रांना सुरक्षा साधने व साहित्याची ओळख करुन देण्यात आली. तसेच प्रात्यक्षिकातून त्यांच्या वापराचे ज्ञानही त्यांना देण्यात आले.
याप्रसंगी शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, अतिरिक्त शहर अभियंता श्री. मनोज पाटील यांनी प्रशिक्षण शिबिरास उपस्थित राहून सफाईमित्रांचा उत्साह वाढविला. घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांचे अधिकारी, कर्मचारी यांनीही आयोजन कार्यात महत्वाची भूमिका बजावली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सफाईमित्रांना आपत्ती व्यवस्थापन विषयक माहिती व प्रात्यक्षिक स्वरुपातील प्रशिक्षण एनडीआरएफ सारख्या मान्यताप्राप्त् संस्थेमार्फत देऊन नवी मुंबई महानगरपालिकच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने एक चांगला उपक्रम हाती घेतला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
Published on : 11-10-2023 14:55:14,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update