नमुंमपा शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत होणार स्वत:चा रक्तगट शिक्षण आणि आरोग्य विभागाची नमुंमपा शालेय विद्यार्थी मोफत रक्तगट तपासणी मोहीम
आकस्मिक प्रसंगी रक्ताची गरज भासल्यास प्रत्येकाला आपला रक्सगट माहीत असणे गरजेचे असते हे लक्षात घेत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्याकरिता ‘विशेष रक्तगट तपासणी मोहीम’ नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक माहितीसह रक्तगटाची माहिती पोर्टलमध्ये नोंदविणे आवश्यक आहे. त्यानुसार आरोग्य विभागाचे प्रमुख वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांच्या नियंत्रणाखाली आरोग्य विभागाने शिक्षण विभागाचे उपआयुक्त श्री. दत्तात्रय घनवट यांच्या माध्यमातून शिक्षण विभागाच्या सहयोगाने 21 ते 27 ऑक्टोबर 2023 या कालावधीत रक्तगट तपासणी मोहीम राबविण्याचे नियोजन केले. त्यानुसार या दोन्ही विभागप्रमुखांच्या उपस्थितीत कार्यवाहीस प्रारंभ झाला आहे.
ही मोहीम यशस्वीरित्या राबविण्यासाठी वाशी, ऐरोली व नेरुळ येथील सार्वजनिक रूग्णालयातील पॅथॉलॉजिस्ट व प्रत्येकी एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्या समवेत शिक्षणाधिकारी व शिक्षण विभागाचे सर्व केंद्र समन्वयक यांची 20 ऑक्टोबरला बैठक घेऊन रक्तगट तपासणी मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता सूक्ष्म नियोजन करण्यात आले.
या मोहिमेंतर्गत एकूण 44269 विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करावयाची असून याकरिता सार्वजनिक रुग्णालय वाशी, ऐरोली व नेरुळ येथील पॅथॉलॉजिस्ट यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या समवेत संबंधित रुग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ व पर्यवेक्षकीय जबाबदारी करिता राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकारी यांचीदेखील नियुक्ती करण्यात आलेली आहे.
या मोहीमेच्या नियोजनामध्ये प्रत्येक नो़डल अधिकारी यांना विद्यार्थी संख्या निश्चित करून देण्यात आलेली असून डॉ. शुभांगी मुनेश्वर यांच्या नियंत्रणाखील 14458 विद्यार्थ्यांची सार्वजनिक रुग्णालय वाशी येथे, डॉ. विश्वजीत पाटील यांच्या नियंत्रणाखाली 14240 विद्यार्थ्यांची माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय नेरूळ येथे तसेच डॉ. प्राजक्ता कुलकर्णी यांच्या नियंत्रणाखाली 15571 विद्यार्थ्यांची राजमाता जिजाऊ रुग्णालय ऐरोली येथे रक्तगट तपासणी करण्यात येत आहे.
नमुंमपा कार्यक्षेत्राकरिता 20 तपासणी पथके कार्यरत असणार असून एका पथकामध्ये एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ व एक सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे. या कार्यप्रणालीत सहाय्यक तंत्रज्ञामार्फतच तपासणीसाठी रक्त घेतले जात असून प्रयोगशाळा तंत्रज्ञामार्फत रक्तगट निश्चित करण्यात येत आहे. रक्तगट तपासणीच्या पहिल्याच दिवशी 4303 विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली.
आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करून घेण्याची जबाबदारी शाळेतील शिक्षकांची असून हजर सर्व विद्यार्थ्यांना रक्तगट तपासणीकरिता पाठविले जाईल याची त्यांनी काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या विद्यार्थ्यांच्या रक्तगट तपासण्या करून त्याचे अहवाल नोडल अधिकारी / पॅथॉलॉजिस्ट यांच्या स्वाक्षरीने शिक्षण विभागाचे केंद्र समन्वयक यांच्याकडे हस्तांतरीत करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची असून, सदरची रक्तगट तपासणी विनामूल्य करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी हा एक अनोखा आणि महत्वाचा उपक्रम असून प्रत्येक विद्यार्थ्याची रक्तगट तपासणी करून घ्यावी असे निर्देश शिक्षण व आरोग्य विभागास महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी दिलेले असून पालकांनीही महानगरपालिका शाळेत शिकणा-या आपल्या मुलाच्या रक्तगटाची माहिती करून घ्यावी व नोंदवून ठेवावी असे आवाहन केले आहे.
Published on : 25-10-2023 12:34:02,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update