आधुनिक नवी मुंबई शहराला पारंपारिक कुस्तीचा साज नवी मुंबई महानगरपालिकेच्या सानपाडा कुस्ती आखाड्यातील कुस्तीगीर राज्य, राष्ट्रीय स्तरावर गाजताहेत




सुनियोजित बांधणीचे आधुनिक शहर म्हणून नावाजल्या जाणाऱ्या नवी मुंबई सारख्या आधुनिक महानगरात नवी मुंबई महानगरपालिका कुस्तीसारख्या पारंपारिक खेळाची मनापासून जपणूक करीत असून सानपाडयातील महानगरपालिकेच्या कुस्ती आखाडयातून तयार झालेले तरूण पुरुष व महिला कुस्तीगीर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर विविध पदके संपादन करीत नवी मुंबईच्या नावलौकिकात लक्षणीय भर घालत आहेत.
विशेषत्वाने घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे भागात महाराष्ट्राच्या सांगली, सातारा, कोल्हापूर या कुस्तीगीर घडविणा-या जिल्ह्यांतील नागरिक मोठया प्रमाणावर राहतात. या मंडळींमध्ये कुस्ती खेळाविषयी विलक्षण प्रेम असल्याने आपल्या तरूण पिढीत कुस्तीगीर घडावेत या त्यांच्या मनातील इच्छेला नवी मुंबई महानगरपालिकेने सानपाडा येथे बांधलेल्या कुस्ती आखाडयामुळे बळ मिळाले आहे.
भौगोलिक दृष्ट्या सानपाडा विभाग हा नवी मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने कुस्ती आखाड्यात ये-जा करणे कुस्तीगीरांना सोयीचे होत आहे. तसेच सानपाडा रेल्वे स्टेशनपासूनही हे ठिकाण चालत जाण्याइतक्या अंतरावर असल्याने तसेच येथे कुस्ती खेळाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण उपलब्ध झाल्याने गुणसंपन्न कुस्तीगीर घडण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे.
मे 2018 मध्ये सानपाडा से. 2 येथे नवी मुंबई महानगरपालिकेने कुस्तीचा आखाडा उभा केला असून त्या ठिकाणी नवी मुंबई कुस्तीगीर असोसिएशनच्या माध्यमातून कुस्तीचे रितसर प्रशिक्षण दिले जात आहे. या कुस्ती आखाडयाचा फायदा घेऊन अनेक युवा कुस्तीगीरांनी उत्तम खेळाचे प्रदर्शन करीत अगदी राष्ट्रीय पातळीपर्यंत आपल्या खेळाची नाममुद्रा उमटवलेली आहे.
सदयस्थितीत कुस्तीसारख्या देशी खेळाला चांगले दिवस आल्याचे दिसून येत असून ज्यावेळी कुस्तीला तितकेसे महत्व दिले जात नव्हते अशा कालावधीत नवी मुंबई महानगरपालिकेने कुस्ती आखाडयाची निर्मिती करण्याचे ठरविले व ते यशस्वीही करुन दाखविले. नवी मुंबई कुस्तीगीर असोसिएशन चे अध्यक्ष कर्नल आर. के. शिरगावकर, ऑल इंडिया कुस्ती चॅम्पियन असलेले सचिव कृष्णा रासकर, खजिनदार दत्तात्रय ठुबे, उपाध्यक्ष हिंदुराव आवळेकर, किशोर गोळे ही सगळी कुस्तीविषयी आस्था असणारी पदाधिकारी मंडळी या कुस्ती आखाड्याकडे विशेष लक्ष देत आहेत.
सकाळी 5 ते 7 आणि सायंकाळी 6 ते 8 या वेळेत या आखाडयामध्ये नवी मुंबई कुस्तीगीर असोसिएशनच्या माध्यमातून एनआयएसचे पंच प्रशिक्षक श्री.संदीप दळवी यांच्याकडून सध्या 35 युवक आणि 15 युवती या प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत.
या ठिकाणी गुरुकुल वर्गांप्रमाणे शिस्तीसोबतच खेळीमेळीचे वातावरण असते. सकाळी मुलांना सोडण्यासाठी येणारे पालक पाहून हे तालीम केंद्र म्हणजे एखादी शाळा असल्याचा भास होतो. पालकांमध्ये असलेली जागरूकता महत्वाची असून या तालमीमुळे मुलांना व्यायामाची गोडी लागली व ही मुले व्यसनापासून दूर आहेत याचा आनंद पालकांकडून व्यक्त केला जातो.
विशेष म्हणजे नवी मुंबईत राहणारे अनेक माजी प्रौढ कुस्तीगीर या ठिकाणी उत्सुकतेने भेट देऊन स्वत:हून या मुलांना कुस्तीतले डावपेच शिकवत असतात. याशिवाय असोसिएशनच्या माध्यमातून या उदयोन्मुख कुस्तीगीरांसाठी दरवर्षी तुरुकवाडी, कोल्हापूर येथे 31 दिवसांचे उन्हाळी निवासी कुस्ती प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येत असते. या शिबिरामध्ये अनुभवी तज्ज्ञ कुस्तीगीरांचे मार्गदर्शन या मुलांसाठी उपलब्ध करुन दिले जाते. याशिवाय या मुलांना सुयोग्य आहार (डाएट) विषयक मागदर्शनही करण्यात येते.
हे कुस्ती तालीम केंद्र उपलब्ध झाल्यामुळे नवी मुंबईतील कुस्ती क्षेत्राला आकार आला असून दरवर्षी आयोजित करण्यात येणा-या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेप्रमाणेच या आखाड्यामुळे कुस्तीगीरांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. तालमीतील प्रणव रासकर या कुस्तीगीराने 17 वर्षाखालील 110 किलो वजनी गटात राज्य स्तरावर सुवर्ण पदक प्राप्त केले असून त्याची राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली आहे. त्याचप्रमाणे शुभम नरळे व ओंकार वाळके या दोन कुस्तीगीरांनी विभागीय स्तरावर सुवर्ण पदक पटकाविल्याने त्यांची राज्य स्तरावर निवड झालेली आहे.
अशाच प्रकारे हिंदवी घोरपडे या चौदा वर्षाखालील 62 किलो वजनी गटातील मुलीने विभागीय स्तरावर सुवर्ण पदक पटकाविल्याने तिची राज्य स्तरावर निवड झालेली आहे.
श्लोक पाटील याने विभागीय स्तरावर रौप्यपदक तसेच सारंग नरळे, विश्वजीत हाके यांनी विभागात सुवर्णपदक तसेच स्वरीत कांबळे व सुमित माने यांनी विभागात रौप्य पदक पटकाविले आहे.
आमीर खान यांच्या ‘दंगल’ चित्रपटामुळे कुस्तीगीर मुलींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन मोठया प्रमाणावर बदलला असून त्याचा परिणाम म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने निर्मिलेल्या कुस्ती आखाडयातही सध्या 15 मुली कुस्तीचे रितसर प्रशिक्षण घेत आहेत.
सदयस्थितीत सानपाडा येथील कुस्ती आखाडयात प्रशिक्षण घेणाऱ्या युवक व युवतींमधून नवी मुंबईला शालेय क्रीडांमध्ये जिल्ह्याचा दर्जा प्राप्त झाल्याने नवी मुंबई जिल्हयातून 15 मुले व 4 मुलींची विभागीय स्तरावर निवड झालेली आहे. तसेच 5 मुले व 2 मुलींची विभागातून राज्य स्तरावर निवड झालेली आहे. त्याचप्रमाणे प्रणव रासकर व तन्वी विभूते या दोन मुला-मुलींची राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली आहे.
या तरुण कुस्तीगीर मुला-मुलींनी संपादीत केलेले यश हे कुस्तीसारख्या देशी व लोकप्रिय पारंपारिक खेळात आधुनिक शहर म्हणून गौरविल्या जाणाऱ्या नवी मुंबईचा नावलौकीक उंचाविणारे असून त्यांचे अभिनंदन करीत नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी या खेळाडूंना व त्यांना घडविणाऱ्या प्रशिक्षकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
महानगरपालिकेचे शहर अभियंता श्री. संजय देसाई हे मूळचे कोल्हापूरकर असल्याने कुस्ती खेळाविषयी व कुस्तीगीरांविषयी त्यांना मूळचीच आस्था असून त्यांच्या आवडीचा व अनुभवाचा लाभही या युवा कुस्तीगीरांना होत असतो व या आखाड्याच्या विकासासाठीही त्यांचा उपयोग होत असतो.
नवी मुंबई सारख्या आधुनिक शहरात कुस्ती सारख्यादेशी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी 2018 मध्ये निर्माण केलेला हा कुस्ती आखाडा 114.51 चौ.मी. क्षेत्रफळाचा असून मातीचा आहे. या आखाड्यासमोर कुस्तीगीरांसाठी पत्रा शेड टाकून व्यायामाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच प्रसाधन गृहाचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे.
तथापि काळाची पावले ओळखत व आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅटवरील कुस्तीला दिले जाणारे प्राधान्य लक्षात घेऊन या आखाड्याच्याच बाजूच्या जागेत कुस्तीकरिता मॅटची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती शहर अभियंता श्री. संजय देसाई यांनी दिली. हा मॅट हॉल 22 मी. X 17 मी. असा विस्तृत असणार असून त्यामध्ये स्टेप पॅटर्नची बैठक व्यवस्था असणार आहे. आता मुलीही कुस्ती प्रशिक्षणाला मोठ्या प्रमाणात येत असल्याचे लक्षात घेऊन त्यांच्याकरिता स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या मॅट आखाडा सुविधेमुळे नवी मुंबईच्या कुस्तीगीरांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाची तालीम करणे सोयीचे होणार आहे.
एका बाजूला विविध गावा-शहरातील कुस्तीच्या तालमी बंद होत असताना नवी मुंबई सारख्या आधुनिक शहराने जपलेली कुस्तीसारख्या पारंपारिक देशी खेळाची परंपरा ही लक्षणीय असून नवी मुंबईने जपलेला हा सांस्कृतिक वारसा देशी खेळांना नवी ऊर्जा देणारा आहे.
Published on : 27-10-2023 11:12:58,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update