हवा गुणवत्तेच्या मानकांचे पालन न करणा-यांवर कारवाईचे आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचे निेर्देश
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील हवा गुणवत्तेबाबत मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने तत्पर कार्यवाही करण्यास सुरुवात केली असून नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी संबधित अधिका-यांची तातडीने बैठक घेत डेब्रीज नियंत्रणासाठी भरारी पथके 24 तास अधिक कृतीशील करण्याचे तसेच बांधकाम साईट्सवर विशेष लक्ष देत त्याठिकाणीही आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याची खात्री करुन घेण्यासाठी विभागनिहाय विशेष पथके त्वरित स्थापन करण्याचे निर्देश दिलेले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने हवा गुणवत्ता नियंत्रण आराखडा तयार केला असून नवी मुंबई महानगरपालिकेनेही देखील हा आराखडा अंगीकृत करीत असल्याचे सांगत आयुक्तांनी याबाबत मोठया प्रमाणावर जनजागृती करण्याचेही निर्देश दिले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, शहर अभियंता श्री. संजय देसाई, परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार, शिक्षण विभागाचे उपआयुक्त श्री. दत्तात्रय घनवट, अतिरिक्त शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड आणि इतर अधिकारी प्रत्यक्ष तसेच अतिरिक्त आयुक्त श्री. विजयकुमार म्हसाळ, सहा.संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकाण व आठही विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
शहराचे पर्यावरण व हवा गुणवत्ता चांगली रहावी ही आपल्या सर्वांचीच प्राधान्याने जबाबदारी असून त्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना गांभीयाने कराव्यात असे निेर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. मा.उच्च न्यायालयाने विभाग अधिका-यांवर याबाबतची जबाबदारी निश्चित केली असून क्षेत्रीय स्तरावर सतर्क राहण्याचे आयुक्तांनी निर्देशीत केले. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आयुक्तांमार्फत निर्गमित करण्यात आल्या आहेत. हवा गुणवत्तेच्या मानकांचे उल्लंघन करणा-या व्यक्ती / संस्था यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही यावेळी सूचित करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 7 ठिकाणी हवा गुणवत्ता मापन केंद्रे कार्यान्वित असून याठिकाणच्या रिडींगचे दर दोन तासांनी निरीक्षण करावे व त्यामध्ये आढळणा-या रिडींगप्रमाणे आवश्यक कार्यवाही करावी असेही आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. बांधकाम साईट्स तपासण्यासाठी नगररचना व अभियांत्रिकी विभागातील अभियंत्यांची विशेष पथके विभागनिहाय गठीत करण्यात आली असून त्यांनी दररोज केलेल्या कार्यवाहीचा तपशील वेबपेजवर नियमीत अपलोड करावयाचा आहे असेही निर्देश देण्यात आले.
या कालावधीत बांधकाम साईट्सवरील डेब्रीज वाहतूक पूर्णपणे बंद राहील असे निर्देशीत करीत डेब्रीज विरोधी पथके अधिक कृतीशील करावीत व वाशी आणि ऐरोली या दोन्ही टोलनाक्यांवर काटेकोर लक्ष ठेवावे असेही आयुक्तांनी निर्देशीत केले. बांधकाम साहित्याची वाहतूक करावयाची झाल्यास ते वाहन पूर्णत: झाकलेले असावे याची दक्षता घेण्याचे निर्देश देत याबाबत अधिक सतर्क रहावे असे आयुक्तांमार्फत स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
यासोबतच रस्ते, दुभाजक या ठिकाणीही स्प्रिंकलरव्दारे सफाई करुन धुळीचे प्रमाण कमी करण्यावर भर द्यावा तसेच 100 हून अधिक चौकांमध्ये बसविलेली कारंजी कार्यान्वित करुन वाहतुकीच्या वर्दळीमुळे होणारे धूळीचे प्रमाण कमी करण्याकडे विशेष लक्ष देण्याचे सूचित करण्यात आले.
दिवाळी सणात मोठया प्रमाणावर फटाके वाजवले जातात, त्यामुळे हवा प्रदूषणात भर पडते हे लक्षात घेत इकोफ्रेन्डली फटाक्यांचा वापर करावा तसेच मा. उच्च न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे रात्री 7 ते 10 याच वेळेत फटाके वाजवावेत असे नागरिकांना आवाहन करतांनाच याचे उल्लंघन होणार नाही याकडे पोलीसांप्रमाणेच विभाग अधिकारी यांनीही विशेष लक्ष द्यावे असे आयुक्तांनी निर्देशीत केले.
नवी मुंबई शहराची हवा गुणवत्ता स्थिती चांगली रहावी याकरिता नागरिकांचेही सहकार्य अतिशय मोलाचे असून शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यामार्फत व्यापक स्वरुपात जनजागृती करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला देतानाच नवी मुंबई क्षेत्रात ठिकठिकाणी मायकींगव्दारे तसेच पोस्टर्स व सोशल मिडीयाव्दारे नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी तत्पर कार्यवाही करावी असेही आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले.
नवी मुंबई शहराची ओळख स्वच्छ शहराप्रमाणेच पर्यावरणशील शहर अशीही असून माझी वसुंधरा अभियानामध्ये मानांकित असलेल्या आपल्या शहराची ओळख हवा गुणवत्तेतही उत्तम असावी याकरिता संबधीत प्रत्येक घटकाने आपापली जबाबदारी पार पाडावी असे अधिका-यांना निर्देश देत सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी याकामी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
Published on : 08-11-2023 13:38:12,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update