'स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी' अंतर्गत पहाटे 1 ते 5 वाजेपर्यंत राबविलेल्या विशेष स्वच्छता मोहीमेची नागरिकांकडून प्रशंसा
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात येत असल्याने सगळीकडच्या बाजारपेठा व दुकाने गजबजून गेलेली दिसतात. यामुळे कच-याच्या प्रमाणातही मोठया प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. या अनुषंगाने स्वच्छ शहर म्हणून असलेला नवी मुंबईचा नावलौकिक लक्षात घेऊन महापालिका आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार केंद्र सरकारच्या 'स्वच्छ भारत अभियान 2.0' अंतर्गत 'स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी' या अभियानामध्ये स्वच्छताविषयक विविध उपक्रम राबविले जात आहेत.
दिवाळीच्या दिवसात मोठया प्रमाणात फटाकेही वाजविले जात असल्याने रस्त्यावरील कच-यात नेहमीपेक्षा अधिक भर पडल्याचे निदर्शनास येते. यादृष्टीने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके वाजविण्याचे प्रमाण जास्त असल्याने नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर मार्गदर्शनाखाली, लक्ष्मीपूजनाच्या रात्री नवी मुंबई महानगरपालिका परिसरात बेलापूर ते दिघा अशा आठही विभाग कार्यालय क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या नियंत्रणाखाली, 13 नोव्हेंबर रोजी पहाटे 1 ते 5 वाजेपर्यंत स्वच्छतेची विशेष मोहीम राबविण्यात आली.
या विशेष स्वच्छता मोहीमेकरिता आठही विभाग कार्यालय क्षेत्रात 375 सफाई कर्मचारी यांची विशेष नेमणूक करण्यात आली होती. 10 रिफ्युज कॉम्पॅक्टर वहाने आणि 13 मिनी टिपर वहाने यांच्या माध्यमातून या स्वच्छता मोहीमेत गोळा करण्यात आलेला प्रामुख्याने फटाक्यांच्या कच-यासह इतर कचरा तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी शास्त्रोक्त प्रक्रियेसाठी त्वरित वाहून नेण्यात आला.
स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे या संपूर्ण साफसफाई मोहीमेच्या नियोजनबध्द कार्यवाहीवर मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत सर्व ठिकाणी भेटी देत बारकाईने लक्ष ठेवून होते.
शहरातील आठही विभागातील मुख्य रस्ते, बाजारपेठा, मुख्य चौक, वर्दळीची ठिकाणे अशा नागरिकांची गजबज असलेल्या स्थळांवर पहाटे 1 ते 5 या कालावधीत राबविलेल्या या विशेष साफसफाई मोहीमेमध्ये हार, फुले. खादयपदार्थ यांचा 9 टन 600 किलो ओला कचरा तसेच विशेषत्वाने फटाके,कागद, पुठ्ठे, कापड यांचा 18 टन 100 किलो सुका कचरा गोळा करून एकुण 27 टन 700 किलो कचरा स्वतंत्र वाहनांमध्ये तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेण्यात आला.
नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने सकाळी दिवस उजाडण्याच्या आत मध्यरात्रीपासून पहाटेच्या कालावधीत ही विशेष साफसफाई मोहीम राबविल्याने सकाळी मॉर्निग वॉक करणा-या नागरिकांनी स्वच्छ रस्ते, चौक पाहून या महानगरपालिकेच्या विशेष स्वच्छता मोहीमेची प्रशंसा केली
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी या मध्यरात्रीच्या विशेष स्वच्छता मोहीमेचे सुव्यवस्थित नियोजन करुन तसेच स्वत: सर्व विभागांमध्ये फिरुन साफसफाईवर लक्ष देतानाच सकाळच्या नियमित साफसफाईवर कोणताही परिणाम होऊ दिला नाही. मध्यरात्री व पहाटे ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असली तरी दररोज सकाळी होत असलेली साफसफाई नेहमीप्रमाणेच सुरु असल्याने नागरिकांनी प्रशंसा करीत समाधान व्यक्त केले.
Published on : 13-11-2023 09:54:22,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update