सेक्टर 17, वाशीच्या मार्केटमध्ये कापडी पिशवी वेंडींग मशीन आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या हस्ते कार्यान्वित
प्लास्टिकमुक्त नवी मुंबईसाठी एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमांसोबत कापडी पिशव्यांच्या वापराबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती केली जात असताना आज सेक्टर 17, वाशी येथील महाराजा भाजी व फळ मार्केट येथे सीएसआर उपक्रमांतर्गत कापडी पिशवी वेंडींग मशीन सुविधेचे लोकार्पण महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. विजयकुमार म्हसाळ, शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, वाशीचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. सागर मोरे, कार्यकारी अभियंता श्री. अजय संखे, माजी नगरसेवक श्री. संपत शेवाळे आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
नवी मुंबई सिटी डॉट कॉम या सोशल नेटवर्कच्या सीएसआर उपक्रमामधून ही कापडी पिशवी वेंडिंग मशीन मार्केटच्या ठिकाणी बसविण्यात आली असून वेंडिंग मशीनमध्ये 10 रुपयाचे नाणे टाकल्यानंतर मशीनवरील लाल बटण दाबल्यावर त्यामधील ॲटोमॅटीक प्रणालीव्दारे कापडी पिशवी दिली जाते. साधारणत: 5 ते 6 किलो वजन पेलू शकेल अशा क्षमतेची ही कापडी पिशवी असून जर navimumbaicity.com हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये मोफत डाऊनलोड करुन घेतल्यास ॲपमधील कोड स्कॅन केल्यानंतर मशीनव्दारे मोफत कापडी पिशवी प्राप्त होते.
महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी 10 रुपयाचे नाणे टाकून तसेच 5 रुपयाची दोन नाणी टाकून त्याचप्रमाणे ॲपव्दारे कोड स्कॅन करुन प्रत्यक्ष पिशवी प्राप्त करुन घेतली व या मशीनची कार्यप्रणाली जाणून घेतली. नवी मुंबई सिटी डॉट कॉम सोशल नेटवर्कच्या वतीने संस्थापक श्री. मेहुल जैन व सह संस्थापक श्रीम. पुजा पवार व श्रीम. श्रुती कांबळे यांनी मशीनच्या कार्यपध्दतीची माहिती आयुक्तांना दिली.
मशीनमधून मिळणा-या कापडी पिशव्यांवर यापुढील काळात संस्थेच्या कामांचा व नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक संदेशाचा प्रचार करण्यात येईल असे संयोजकांनी सांगितले. आगामी कालावधीत इतरही मार्केटमध्ये अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील असेही सांगण्यात आले.
यावेळी आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी तेथील विक्रेत्यांशी संवाद साधत हे मार्केट एकल वापर प्लास्टिक पिशवीमुक्त ठेवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले तसेच त्यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून ग्राहकांनी कापडी पिशव्यांचा वापर करण्याबाबत आग्रही असावे असे आवाहन केले. ग्राहकांनी सोबत कापडी पिशवी आणली नसेल तर त्यांना तेथील वेंडिंग मशीनचा वापर करुन कापडी पिशवी उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रोत्साहित करावे असे विक्रेत्यांना सांगतानाच आयुक्तांनी नागरिकांशीही संवाद साधत त्यांना कापडी पिशव्यांचा वापर निग्रहपूर्वक करावा असे आवाहन केले.
Published on : 04-01-2024 06:55:08,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update