क्रांतिवीर लहुजी वस्ताद यांच्या चरित्रापासून प्रेरणा घेऊन सामाजिक दायित्व जपण्याचा प्रयत्न करूया – डॉ. बळीराम गायकवाड



‘जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी’ अशी शपथ घेणारे क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे हे आपापल्या संस्थानांच्या, राज्याच्या संरक्षणापुरत्या मर्यादित विचारसरणीच्या त्या काळात संपूर्ण देशाच्या संरक्षणाचा विचार करणारे पहिले देशाभिमानी सेनानी होते असे सांगत कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच आंतरराष्ट्रीय किर्तीचे व्याख्याते डॉ. बळीराम गायकवाड यांनी लहुजींच्या तालमीत नवभारताच्या निर्मितीमध्ये अनमोल योगदान देणारे क्रांतीकारक घडले आणि सामाजिक समतेच्या कार्यालाही गती मिळाली अशा शब्दात लहुजींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ऐरोलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ‘विचारवेध’ व्याख्यान शृंखलेअंतर्गत व्याख्याते डॉ. बळीराम गायकवाड बोलत होते. थोर क्रांतिकारक आणि अग्रणी समाजसुधारक क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या 229 व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘लहुजी वस्ताद साळवे यांचे सामाजिक समतेचे स्वप्न’ या विषयावर त्यांनी लहुजींचा प्रेरणादायी जीवनपट खुला करीत त्यांच्या चरित्रातून आजच्या पिढीने काय बोध घ्यावा याचेही मार्गदर्शक विवेचन केले.
1621 ते 1690 या काळात छत्रपती शिवरायांच्या सैन्यात असलेल्या लहुजींच्या खापरपणजोबांपासूनचा अर्थात थोरले लहुजींपासूनचा वारसा कथन करीत शिवरायांच्या राज्याभिषेकप्रसंगी 6 जून 1674 रोजी अनेक शूरवीरांना गौरविण्यात आले, त्यावेळी थोरल्या लहुजींना ‘राऊत’ ही पदवी प्रदान करण्यात आल्याची माहिती डॉ. बळीराम गायकवाड यांनी दिली. पेशवाईच्या काळात लहुजींच्या वडिलांकडे राघोजींकडे शिकारखान्याची व शस्त्रागाराची जबाबदारी होती व केवळ एका दांडक्याच्या आधाराने हिंस्त्र वाघाशी लढणा-या व त्याला जेरबंद करणा-या राघोजींचा शौर्याचा वारसा लहुजींनी तितक्याच ताकदीने जपला व देशाच्या संरक्षणासाठी लढाऊ बाण्याचे तरूण उभे करण्याचे काम केले अशीही माहिती त्यांनी लहुजींच्या बालपणापासूनचे किस्से सांगत दिली.
दांडपट्टा, तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदुकबाजी, निशाणेबाजी अशा विविध युध्दकलांमध्ये निपूण असणा-या ‘क्रांतिकारकांचे क्रांतिकारक’ असे संबोधल्या जाणा-या लहुजी वस्ताद यांनी महात्मा फुले, तात्या टोपे, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके, सदाशिवराव गोवंडे असे नवभारताच्या निर्मितीत योगदान देणारे शेकडो लढवय्ये सेनानी घडविले आणि ब्रिटीशांविरोधातील लढाईला कृतीशील गती दिली अशीही माहिती विविध उदाहरणे त्यांनी सांगितली.
लहुजी जसे लष्करी तज्ज्ञ होते त्याचप्रमाणे त्यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक समतेच्या चळवळीला सर्व प्रकारचा आधार दिला आणि ज्यांच्यापर्यंत शिक्षण पोहचत नव्हते अशा समाज घटकांपर्यंत व विशेषत्वाने महिलांपर्यंत शिक्षणाचा ज्ञानस्त्रोत पोहचविण्यासाठी 1850, 1851 व 1853 मध्ये 3 शाळा सुरू केल्या, प्रौढ शिक्षणासाठी पुढाकार घेतला. महत्वाचे म्हणजे तेथील शिक्षकांना सामाजिक संरक्षण देण्याचे काम त्यांनी केले तसेच स्वत:ची पुतणी मुक्ता हिला त्या शाळेत टाकून स्त्री शिक्षणाला स्वकृतीतून चालना दिली असेही डॉ. बळीराम गायकवाड यांनी सांगितले.
या सुधारकी वृत्तीमुळे व कृतीमुळे त्या काळात लहुजी वस्तादांना कर्मठ विचारांच्या समुहापुढे मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागले असे सांगत डॉ. बळीराम गायकवाड यांनी आजच्या व्यक्तिगत हिताला महत्व देण्याच्या काळात लहुजींच्या चरित्रापासून प्रेरणा घेऊन आपण आपापल्या परीने सामाजिक दायित्व जपण्याचा प्रयत्न केला पाहीजे व युवा पिढीनेही काळाची पावले ओळखून जगामध्ये अस्तित्व सिध्द करण्यासाठी अनेक विषयात पारंगत झाले पाहीजे असा संदेश त्यांनी दिला.
नवी मुंबई महानगरपालिकेने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या माध्यमातून ज्ञानाचे अफाट भांडार खुले केले आहे, त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात करून घेतला पाहिजे व प्रत्येकाने आपल्या मुलाबाळांना हे स्मारक दाखविले पाहिजे असे आवाहन करीत व्याख्याते डॉ. बळीराम गायकवाड यांनी इथे आल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा मिळते असा अनुभव सांगितला.
समाजविकास विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार यांनी महानगरपालिकेच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत केले व जनसंपर्क अधिकारी श्री. महेंद्र कोंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विचारवेध’ सारख्या व्याख्यानमालेतून नवी मुंबई महानगरपालिका सुजाण नागरिक घडविण्याचे जे काम करीत आहे ते ऐतिहासिक असून ही व्याख्याने उन्नतीच्या मार्गावर जाण्यासाठी उमेद वाढविणारी असल्याचेही मत डॉ. बळीराम गायकवाड यांनी व्यक्त केले.
Published on : 19-11-2023 07:59:48,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update