दिघा विभागात अतिक्रमण निर्मुलनाचा धडाका
दिघा विभागात खारकर वाडी, ईश्वरनगर दिघा येथे खाजगी जमिनीवर गेली अनेक दिवसांपासून पत्र्याच्या झोपड्या नव्याने तयार होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या.
या तक्रारींची शहानिशा करुन एच विभाग दिघा कार्यालयामार्फत सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. कैलास गायकवाड यांनी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या कलम 54 अंतर्गत ह्या बांधकामांना नोटीसा बजावल्या होत्या. मात्र तरीही नव्याने झोपड्या बांधणे सुरुच होते.
त्यामुळे नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शखाली, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या निर्देशानुसार दिघा विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. कैलास गायकवाड यांनी 16 झोपड्या निष्कासित केल्या. त्याचप्रमाणे ईश्वरनगर भागातील बांधकाम वस्तू विक्री व्यावसायिकांनी पदपथावर ठेवलेले बांधकाम साहित्य हटविण्याची धडक कारवाई देखील करण्यात आली.
ह्या कारवाईत एक जेसीबी, पिकअप व्हॅन, 15 मजूर, अतिक्रमण विभागाचा पोलीस बंदोबस्त तसेच रबाले पोलीस ठाण्याचा फौजफाटा सहभागी होता. या कारवाईमुळे भूमाफियांचे धाबे दणाणल्याची चर्चा दिघा विभागात सुरु झाली आहे.
Published on : 12-01-2024 13:13:55,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update