भाषा संवर्धन पंधरवड्याच्या वक्तृत्व स्पर्धेतून नमुंमपा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला संविधानाविषयीचा अभिमान
मराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त मराठी भाषेचा गौरव वाढविणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासोबतच यामध्ये नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांचा प्रत्यक्ष सहभाग असावा यादृष्टीने महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यामधील वक्तृत्व स्पर्धा आज उत्साहात संपन्न झाल्या.
भारतीय संविधानाचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून मराठी भाषा संवर्धन पंधरवडयात संविधानाचाही जागर व्हावा यादृष्टीने ‘माझे संविधान, माझा अभिमान’ या विषयावर अधिकारी, कर्मचारीवृंदांच्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 5 मिनिटांच्या मर्यादेत स्पर्धकाने आपले मनेगत व्यक्त करायचे होते. या अनुषंगाने 13 अधिकारी, कर्मचारी यांनी स्पर्धेत सहभागी होत संविधानाविषयी आपल्या मनात असलेल्या भावना व्यक्त केल्या.
संविधानाचे अभ्यासक आणि संविधान प्रचारक लोकचळवळीतील व्याख्याते ॲड. निलेश खानविलकर यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. त्यांचा महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर यांच्या शुभहस्ते, शिक्षणाधिकारी श्रीम. अरुणा यादव यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
स्पर्धेत सहभागी स्पर्धकांचे भारतीय संविधान या विषयाचे आकलन, त्यांनी विषयाची केलेली मांडणी, भाषा प्रावीण्य, सादरीकरण व त्याचा श्रोत्यांवरील प्रभाव या पाच निकषांच्या आधारे परीक्षण करण्यात आले. यातील विजेत्या स्पर्धकांना 25 जानेवारी रोजीच्या संयुक्त पारितोषिक वितरण समारंभात सन्मानीत करण्यात येणार आहे.
नमुंमपा अधिकारी, कर्मचारी वृंदाकरीता आयोजित विविध स्पर्धांमधील ‘परकाव्यवाचन स्पर्धा’ गुरुवार, दि. 25 जानेवारी 2024 रोजी, सकाळी 11 वाजता, नमुंमपा मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न होणार असून या स्पर्धेमध्ये आपल्या आवडत्या कवीच्या कवितेचे सादरीकरण करणे अपेक्षित आहे.
या स्पर्धेनंतर सायंकाळी 4 वाजता परकाव्यवाचन स्पर्धेसह वक्तृत्व स्पर्धा तसेच घोषवाक्य / चारोळी लेखन स्पर्धा अशा तिन्ही स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा ज्ञानकेंद्रातच मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
Published on : 14-03-2024 13:49:17,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update